अंबानींच्या समर्थकांचे युक्तिवाद हास्यास्पद; एलन मस्क यांचा पुन्हा टोला
Elon Musk : भारतात स्टारलिंकसारखी सेवा उपलब्ध झाल्यामुळे सामान्य ग्राहकांना अधिक पर्याय मिळतील. स्पर्धा वाढल्याने ग्राहकांना फायदा होईल.
Starlink India Launch : भारतात स्टारलिंकच्या (Starlink) प्रवेशावरून एलन मस्क (Elon Musk) यांनी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्याविरोधात पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. अंबानींच्या इंटरनेट सेवेचे समर्थन करणाऱ्यांवर टीका करताना मस्क यांनी ‘दुटप्पीपणा आणि अतिशयोक्ती’ केल्याचा आरोप केला. स्टारलिंक भारतात स्पर्धा करू शकणार नाही, असे म्हणणारेच स्टारलिंक ही मोठी स्पर्धक ठरू शकते, असाही दावा करतात असे मस्क यांनी म्हटले आहे.
आज संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या! नाहीतर… एमपीएससी आंदोलनाच्या अकराव्या दिवशी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
अमेरिकेतील उद्योगपती आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलन मस्क यांनी रविवारी (11 ऑक्टोबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत मुकेश अंबानी यांच्यावर पुन्हा निशाणा साधलाय. भारतातील दूरसंचार क्षेत्रात अंबानींच्या रिलायन्स जिओचे मोठे स्थान आहे. अशा परिस्थितीत स्टारलिंकच्या प्रवेशावरून दोन्ही उद्योगपतींमध्ये वाद सुरू असल्याचे चित्र आहे.
अंबानींच्या समर्थकांचे युक्तिवाद हास्यास्पद
अंबानींच्या इंटरनेट सेवेचे समर्थन करणारे लोक एकीकडे भारतात अंबानींच्या मक्तेदारीमुळे मिळणाऱ्या कमी किमतींशी स्टारलिंक स्पर्धा करू शकणार नाही, असे सांगतात. मात्र, दुसरीकडे स्टारलिंक ही अत्यंत मजबूत स्पर्धक ठरू शकते, असाही दावा करतात. हे दोन्ही दावे परस्परविरोधी असून यात दुटप्पीपणा आणि अतिशयोक्ती असल्याचे मस्क यांनी एक्सवर म्हटले आहे. मस्क यांच्या मते, भारतात स्टारलिंकसारखी सेवा उपलब्ध झाल्यामुळे सामान्य ग्राहकांना अधिक पर्याय मिळतील. स्पर्धा वाढल्याने ग्राहकांना फायदा होईल आणि अंबानींच्या नफ्यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. मात्र, त्यामुळे त्यांचा व्यवसाय बंद पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
The ridiculous arguments by Ambani’s army of Internet shills make no sense
On the one hand, they say Starlink couldn’t possibly compete with the amazing low prices offered by Ambani’s de facto monopoly in India and then, in the same breath, they essentially claim that Starlink would be too strong of a competitor! This is absurd hypocrisy and hyperbole.
The reality is that competition would greatly benefit the average citizen in India by giving them more choices, as it always does. Ambani’s profits will be lower, but he is not going out of business. And, obviously, if Starlink is too expensive in India, no one will buy it, so SpaceX will need to make pricing affordable.
— Elon Musk (@elonmusk) October 10, 2026
‘स्टारलिंक महाग असेल, तर ग्राहक खरेदी करणार नाहीत’
स्टारलिंकची सेवा भारतात महाग असेल, तर ग्राहक ती खरेदी करणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांना परवडेल अशा किमतीत सेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्पेसएक्सवर असेल, असे मस्क यांनी म्हटले आहे. मुक्त बाजारपेठेत ग्राहकांना विविध कंपन्यांच्या सेवा निवडण्याची संधी मिळणे महत्त्वाचे आहे. स्टारलिंकच्या माध्यमातून भारतातील ग्राहकांना आणखी एक पर्याय उपलब्ध होऊ शकतो, असे मस्क यांनी म्हटले आहे.
अंबानींच्या कंपन्यांचा राजकीय देणग्यांशी संबंध असल्याच्या वृत्तांचा उल्लेख
शनिवारी मस्क यांनी ‘एक्स’वर काही माध्यमांच्या वृत्तांचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. या वृत्तांमध्ये रिलायन्सशी संबंधित कंपन्या आणि भाजपच्या सोशल मीडिया प्रचार तसेच राजकीय देणग्यांबाबत दावे करण्यात आले होते. यामध्ये 2022 मधील अल जझीराच्या एका वृत्ताचा आणि 2024 मधील ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्ताचा समावेश होता. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, रिलायन्सशी संबंधित क्विक सप्लाय कंपनीने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला 385 कोटी रुपये आणि शिवसेनेला 25 कोटी रुपये दिले होते. या वृत्तांतील दाव्यांवरून मस्क यांनी केलेल्या टीकेला रिलायन्सकडून सार्वजनिकरीत्या उत्तर देण्यात आलेले नाही.
‘डियर प्राइम मिनिस्टर अंबानी’; मस्क यांची उपरोधिक पोस्ट
यापूर्वीही मस्क यांनी मुकेश अंबानी यांना उद्देशून ‘डियर प्राइम मिनिस्टर अंबानी’ अशी उपरोधिक पोस्ट केली होती. भारतात मक्तेदारी कायम ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी स्टारलिंकला भारतीय बाजारपेठेत स्पर्धा करण्याची परवानगी देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. स्टारलिंकमुळे अशा लोकांचे जीवन अधिक चांगले होऊ शकते, असा दावा मस्क यांनी केला. नैसर्गिक आपत्तींच्या काळात इतर संपर्क यंत्रणा बंद पडल्यास उपग्रह इंटरनेट सेवा महत्त्वाची ठरू शकते आणि त्यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले.
भारतात मक्तेदारीला परवानगी नाही : ज्योतिरादित्य शिंदे
दरम्यान, केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी भारतात कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारीला परवानगी दिली जात नसल्याचे स्पष्ट केले. भारत सरकार तंत्रज्ञानाच्या बाबतीत तटस्थ भूमिका घेते. ग्राहकांना विविध सेवा उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम असून, कोणती सेवा आणि कोणत्या कंपनीची सेवा निवडायची, याचा निर्णय ग्राहकांनी मुक्त बाजारपेठेत घ्यायचा आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपग्रह इंटरनेट सेवा क्षेत्रात तीन कंपन्यांना परवाने मिळाले आहेत. यामध्ये एलन मस्क यांची स्टारलिंक, रिलायन्स जिओची उपग्रह सेवा ‘जिओ सॅटकॉम’ आणि भारती समूहाच्या पाठिंब्याने कार्यरत ‘युटेलसॅट वनवेब’ यांचा समावेश आहे.
या कंपन्यांना आवश्यक सुरक्षा अटी आणि निर्धारित टप्पे पूर्ण केल्यानंतर सेवा सुरू करता येईल. तसेच, अॅमेझॉनच्या ‘प्रोजेक्ट कुइपर’नेही या क्षेत्रात रस दाखवला असून, त्याला निर्धारित प्रक्रियेतून जावे लागणार आहे.