एसटीच्या NCMC कार्डबाबत मोठा निर्णय! आता 50 रुपयांची अट संपली, फक्त 5 रुपयांतही करता येणार रिचार्ज
ST NCMC Card Recharge: आता या कार्डमध्ये रिचार्ज करण्यासाठी 50 रुपयांची अट राहणार नाही. अवघ्या 5 रुपयांपासून रिचार्ज करता येणार आहे.
ST NCMC Card Recharge: एसटीने प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्डच्या रिचार्जबाबत एसटी महामंडळाने मोठा बदल केला आहे. आता या कार्डमध्ये रिचार्ज करण्यासाठी 50 रुपयांची अट राहणार नाही. प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार अवघ्या 5 रुपयांपासून रिचार्ज करता येणार आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन महामंडळाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
परिवर्तनवादी चळवळ जातीवादी होतीये; समाजाचं वाटोळं सुरू, शरणकुमार लिंबाळेंचा परखड प्रहार
50 रुपयांची अट हटवली, 5 रुपयांपासून रिचार्ज
आतापर्यंत NCMC कार्डमध्ये रिचार्ज करण्यासाठी 50 रुपयांच्या पटीत पैसे भरावे लागत होते. त्यामुळे ज्यांचा एसटीचा प्रवास कमी असतो, अशा प्रवाशांचे पैसे कार्डमध्येच अडकून राहत होते. विशेषतः ग्रामीण भागातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास होत होता.
ही अडचण लक्षात घेऊन एसटी महामंडळाने रिचार्जचे नियम बदलले आहेत. आता प्रवाशांना 5 रुपयांच्या पटीत टॉप-अप करता येणार आहे. म्हणजेच 5, 10, 15, 20 किंवा 25 रुपये, अशा आपल्या गरजेनुसार कार्ड रिचार्ज करता येईल. त्यामुळे प्रवासासाठी लागतील तेवढेच पैसे कार्डमध्ये ठेवणं शक्य होणार आहे.
ठाकरेंनी भाजपला शब्दावरून घेरलं होतं; आता अकाली दलाने शाहंकडून वदवून घेतलं…
रिचार्जवरील 11.80 रुपयांचे कमिशनही रद्द होणार?
NCMC कार्ड रिचार्ज करताना यापूर्वी प्रत्येक व्यवहारातून 11.80 रुपये कमिशन म्हणून कापले जात होते. त्यामुळे कमी रकमेचा रिचार्ज करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसत होता. आता हे कमिशन रद्द करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, व्यवहारावर लागू असलेला कर भरावा लागणार आहे.
1 जानेवारी 2027 पासून NCMC कार्ड अनिवार्य
दरम्यान, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाने 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी 1 ऑक्टोबर 2026 पासून कार्ड अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र, कार्ड नोंदणी आणि वितरणातील अडचणी लक्षात घेऊन ही मुदत वाढवण्यात आली.
6 नोव्हेंबरपर्यंत तब्बल 1 कोटी 10 लाख कार्डांची नोंदणी आणि वितरण झालं होतं. आता 31 डिसेंबर 2026 पर्यंत सर्व महिला लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करून कार्ड देण्याचं उद्दिष्ट महामंडळाने ठेवलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे, 31 डिसेंबरपर्यंत ज्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडे NCMC कार्ड नसेल, त्यांनाही सवलतीत प्रवास करता येणार आहे. मात्र, 1 जानेवारी 2027 पासून कार्ड नसल्यास प्रवासासाठी तिकिटाचे पूर्ण पैसे मोजावे लागू शकतात. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी 31 डिसेंबरपूर्वीच कार्ड काढून घेण्याचं आवाहन एसटी महामंडळाने केलं आहे.