ठाकरेंनी भाजपला शब्दावरून घेरलं होतं; आता अकाली दलाने शाहंकडून वदवून घेतलं…
2027 Punjab Election पंजाबमध्ये अकाली दलाला मोठ्या भावाची भूमिका आणि CM पदाचे संकेत देत भाजपने मोठी घोषणा केली आहे पण...
Amit Shah On Panjab CM Post : पंजाबमध्ये अकाली दलाला मोठ्या भावाची भूमिका आणि मुख्यमंत्रीपद देण्याचे संकेत देत भाजपने युतीतील सत्तावाटपाबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. मात्र भाजपचा राजकीय इतिहास पाहिला, तर मित्रपक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपद देण्याची उदाहरणेही आहेत आणि मुख्यमंत्रीपदाच्या आश्वासनावरून मित्रपक्षाशी वाद झाल्याचे उदाहरणही आहे. त्यामुळे अमित शाहांनी दिलेला ”जो बड़ा भाई होता हैं, वही चीफ़ मिनिस्टर होता हैं!” हा शब्द किती विश्वासार्ह आहे? अशी चर्चा आता सुरू झाली असून, यासाठी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भाजपचा सत्तावाटपाचा इतिहास काय सांगतो? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
तर, पंजाबमध्ये 2027 मध्ये धुराळा उडवून देणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि शिरोमणी अकाली दलाने तब्बल सहा वर्षांनंतर म्हणजेच 2,190 दिवसांनी पुन्हा हातमिळवणी केली आहे. विशेष म्हणजे 24 नोव्हेंबर 2026 रोजी युतीची घोषणा करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ”जो बड़ा भाई होता हैं, वही चीफ़ मिनिस्टर होता हैं!” असे अधोरेखित केले आहे. त्यामुळे पंजाबमध्ये युती सत्तेत आल्यास मुख्यमंत्रीपद अकाली दलाकडे राहील, असा स्पष्ट राजकीय संकेत त्यांनी दिला.
आता शाह यांची ही घोषणा महत्त्वाची आहे. कारण पंजाबमध्ये भाजपने यापूर्वी अकाली दलासोबत युती करताना तुलनेने लहान भागीदाराची भूमिका स्वीकारली होती. मात्र, 2020 मध्ये कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि घट्ट मैत्रीत फूट पडल्याने युती तुटली. पण, आता सहा वर्षांनंतर पुन्हा गट्टी करत भाजपने अकाली दलाला मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेला शब्द युतीच्या विश्वासाचा महत्त्वाचा भाग म्हणून बघितला जात आहे. कारण, भाजपने अनेक राज्यांमध्ये मित्रपक्षाच्या तुलनेने लहान संख्याबळाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपद देत स्वतःच्या नेत्यांना उपमुख्यमंत्रीपदावर बसवलं आहे. यात बिहार, जम्मू-काश्मीर, नागालँड आणि कर्नाटक ही राज्ये उदाहरणे आहेत. Amit Shah On Panjab CM Post For 2027 Election
बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासाठी भाजपची तडजोड
बिहारमध्ये भाजप आणि जनता दल युनायटेडची (JDU) युती अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या राजकीय टप्प्यांत सत्तेत राहिली आहे. 2005 पासून नितीश कुमार मुख्यमंत्री असताना भाजपचे सुशीलकुमार मोदी उपमुख्यमंत्री होते. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जेडीयूपेक्षा जास्त जागा मिळाल्या. भाजपचे 74, तर जेडीयूचे 43 आमदार निवडून आले. तरीही भाजपने नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीपद दिले. त्या सरकारमध्ये भाजपच्या तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. याशिवाय जानेवारी 2024 मध्ये नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये परतल्यानंतर भाजपने सम्राट चौधरी आणि विजयकुमार सिन्हा यांना उपमुख्यमंत्री केले. म्हणजेच बिहारमध्ये भाजपने संख्याबळ जास्त असतानाही मित्रपक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपद दिल्याची उदाहरणे आहेत.
Punjab Politics : जुन्या मित्रांची 2,190 दिवसांनंतर पुन्हा गट्टी; फायदा कुणाला?
जम्मू-काश्मीर : पीडीपीच्या मुख्यमंत्र्याखाली भाजप
2015 मध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) आणि भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये युतीचे सरकार स्थापन केले. पीडीपीचे मुफ्ती मोहम्मद सईद मुख्यमंत्री झाले, तर भाजपचे निर्मल सिंह उपमुख्यमंत्री झाले. 2016 मध्ये मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर मेहबूबा मुफ्ती मुख्यमंत्री झाल्या, तरी भाजपने निर्मल सिंह यांच्या माध्यामातून स्वतःकडे उपमुख्यमंत्रीपद कायम ठेवले. त्यानंतर 2018 मध्ये निर्मल सिंह यांच्या जागी कविंदर गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली. पण, जून 2018 मध्ये भाजपने सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि युती सरकार कोसळले.
नागालँड : एनडीपीपीच्या नेतृत्वाखाली भाजप
2018 मध्ये नागालँडमध्ये नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) आणि भाजपने युती केली. एनडीपीपीचे नेफ्यू रिओ मुख्यमंत्री झाले, तर भाजपचे वाय. पॅटन उपमुख्यमंत्री झाले. 2022 मध्येही भाजपने एनडीपीपीसोबत कनिष्ठ भागीदाराची भूमिका स्वीकारली. जागावाटपात एनडीपीपीला 40, तर भाजपला 20 जागा देण्यात आल्या.
कर्नाटक : भाजपने स्वीकारले होते उपमुख्यमंत्रीपद
2006 मध्ये भाजप आणि जनता दल सेक्युलर (JDS) यांनी कर्नाटकात सत्ता वाटपाचा करार केला. त्यानुसार जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले, तर भाजपचे बी. एस. येडियुरप्पा उपमुख्यमंत्री झाले. ठरलेल्या 20 महिन्यांनंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपद येणार होते. मात्र ऑक्टोबर 2007 मध्ये कुमारस्वामी यांनी सत्ता हस्तांतरित करण्यास नकार दिल्याने भाजपने पाठिंबा काढून घेतला आणि सरकार कोसळले. पण, या प्रकरणात भाजपने मित्रपक्षाला मुख्यमंत्रीपदाचा शब्द देऊन तो मोडला, असे म्हणता येणार नाही. कारण, ठरलेल्या करारानुसार भाजपला मुख्यमंत्रीपद मिळणे अपेक्षित होते; मात्र जेडीएसने सत्ता हस्तांतरित केली नाही.
मुख्यमंत्रीपदाच्या शब्दावरून महाराष्ट्रात 2019 मध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष
भाजपच्या सत्तावाटपाच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चेत राहिलेले उदाहरण म्हणजे 2019 मधील महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना संघर्ष. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 105, तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याचा निर्णय झाला होता, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. एवढेच नव्हे तर, भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत मातोश्रीवर झालेल्या चर्चेत हा फॉर्म्युला मान्य केल्याचे ठाकरे यांनी वारंवार सांगितले.
मात्र, निवडणुकीनंतर भाजपने मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिला. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार, अशी भाजपची भूमिका होती. उद्धव ठाकरे यांनी भाजपने दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप केला. या वादामुळे दोन्ही पक्षांची युती तुटली आणि पुढे तेव्हाची शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याचे आश्वासन दिल्याचा दावा केला; पण अमित शाह यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये हा दावा स्पष्टपणे फेटाळला. बंद खोलीत आपण आश्वासने देत नाही, असे सांगत मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही शब्द दिला नसल्याचे त्यांनी जाहीर केले.
पंजाबमध्ये भाजपची भूमिका वेगळी का?
आता पुन्हा मूळ पंजाबमध्ये अकाली दलाल दिलेल्या शब्दाकडे वळूया. पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजप यांची युती 1996 पासून 2020 पर्यंत टिकली होती. या काळात अकाली दल मोठा भाऊ होता आणि प्रकाशसिंह बादल मुख्यमंत्री होते. भाजपला उपमुख्यमंत्रीपदाऐवजी मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती मिळत होती. आता सहा वर्षांनंतर पुन्हा युती करताना भाजपने अकाली दलाला मोठ्या भावाची भूमिका देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे शाह यांचे वक्तव्य केवळ राजकीय औपचारिकता नसून, त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतही सार्वजनिकपणे संकेत दिला आहे. त्यामुळे अकाली दलाला युतीत नेतृत्वाची भूमिका मिळेल, असा संदेश गेला आहे. मात्र युतीचे जागावाटप, निवडणुकीतील निकाल आणि सरकार स्थापन करण्याची वेळ येईपर्यंत या आश्वासनाचे प्रत्यक्ष राजकीय स्वरूप काय असेल, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय, मुख्यमंत्रीपदाबाबतचा शब्द आणि प्रत्यक्ष सत्ता वाटप यात फरक असतो. निवडणुकीनंतरचे संख्याबळ, मित्रपक्षांची भूमिका आणि राजकीय परिस्थिती यांचाही निर्णयावर परिणाम होऊ शकतो.
भाजपच्या इतिहासात मित्रपक्षांच्या नेत्यांना मुख्यमंत्रीपद देण्याची बिहार, जम्मू-काश्मीर आणि नागालँडसारखी उदाहरणे आहेत. कर्नाटकात भाजपने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले, पण पुढे ठरलेले मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. तर, महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद झाले. त्यामुळे पंजाबमध्ये अमित शाह यांनी दिलेल्या शब्दाची विश्वासार्हता तपासताना हे सर्व उदाहरणं महत्त्वाची ठरतात जरी, महाराष्ट्रातील अनुभवामुळे मुख्यमंत्रीपदाच्या आश्वासनावर राजकीय प्रश्नचिन्हही निर्माण झाले असले तरी….त्यामुळे आता ठाकरेंनी भाजपला मुख्यमंत्री पदाच्या शब्दावरून घेरलं होतं त्यातून शहाणं होतं आता अकाली दलाने शाहंकडून मुख्यमंत्री पदाबाबत वदवून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.