उत्पन्नात ‘तूट’ नव्हे ‘तोटा’, एसटी महामंडळाचा खुलाशातही कांगावा; श्रीरंग बरगेंची घणाघाती टीका

MSRTC News : एसटी महामंडळाच्या उत्पन्नात कमालीची घट होत असून भाडेवाढीच्या तुलनेत अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचा निष्कर्ष काढून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत 25 कोटी रुपये इतकी उत्पन्नात तूट आली असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली होती. पण महामंडळाकडून बातमीचा खुलासा करताना तुटी ऐवजी “तोट्याचा “उल्लेख करण्यात आला. एसटीच्या उत्पन्नात वाढ होऊन ती अडचणीतून बाहेर निघावी या चांगल्या उद्देशाने दिलेल्या माहितीचा विपर्यास केला जात आहे. महामंडळाकडून दिलेला खुलासा म्हणजे उपाययोजना करण्याऐवजी कांगावा करण्याचा प्रकार आहे अशी टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.
महामंडळाचा तोटा 5 कोटींपर्यंत वाढला आहे. अशा आशयाच्या बातमी कुठल्याही वृत्तपत्रात आलेली दिसत नाही. एसटीने केलेला खुलासा वस्तुस्थितीशी सुसंगत नाही. या संभ्रभ निर्माण करणाऱ्या खुलाशाच्या बाबतीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांच्याकडे वस्तुनिष्ठ माहिती सादर करण्यात येणार असल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.
एसटीने महाराष्ट्राला खूप दिले आहे. त्यामुळे तिच्या विश्वासार्हतेला तडा जाईल किंवा संभ्रभ निर्माण होईल अशी कुठलीही कृती कधीच होणार नाही. आर्थिक अडचणींमुळे अनेक प्रश्न प्रलंबित असून एसटी अडचणीतून बाहेर निघावी या चांगल्या हेतूने माध्यमांना दिलेल्या माहितीचा विपर्यास करणारा विसंगत खुलासा द्यायला नको होता. दुर्दैवाने वास्तव स्वीकारण्याचा मोठेपणा दाखविण्याऐवजी चांगल्या हेतूचा अपभ्रंश केला जात आहे.
चिंताजनक! एसटीच्या दैनंदिन उत्पन्नातील घट 5 कोटींवर; महसुलाचा आलेख घसरला
महामंडळातील काही अधिकारी फक्त टोपल्या टाकू काम करीत आहेत. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दर महिन्याला सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कमेतून वेतन देण्यात येते पण त्या व्यतिरिक्त जादा उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा फरक मिळालेला नाही. महागाई भत्त्याचा फरक मिळालेला नाही. साधारण 2500 कोटी रुपये इतकी पीएफ व ग्रज्युटी रक्कम संबंधित ट्रस्टकडे भरणा करण्यात आलेली नाही.
मध्यंतरी सर्व कर्मचारी संघटनांची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती. त्यांनी म्हटले होते की महामंडळाने स्वतःचे उत्पन्न सुद्धा मिळविले पाहिजे. त्याचप्रमाणे मंत्रालयातील अर्थ खात्याचे व परिवहन खात्याचे अधिकारी सुद्धा वारंवार विविध बैठकांमध्ये महामंडळाने स्वतः सुद्धा उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले पाहजेत असे सांगतात. तरीही स्वतः काही न करता स्वतःचे अपयश लपविण्यासाठी खुलाशात परिवहन मंत्री आणि महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांचे नाव टाकून खुलासा देणे म्हणजे महामंडळाच्या काही अधिकाऱ्यांकडून स्वतःचा बचाव करण्यासाठी”चोर चोर म्हणून भुई थोपटण्याचा प्रकार आहे.
उत्पन्नात येणारी तुट ही निव्वळ काही अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेचे फलित आहे. यातही सर्वच अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन चालणार नाही. काही अधिकारी खरोखरच चांगले काम करीत आहेत. पण एसटीचे एक दोन महत्त्वाच्या पदावर बसलेले अधिकारी पूर्णतः नकारात्मक पद्धतीने काम करीत आहेत. अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी केलेला खुलासा हा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यामुळे वस्तुस्थिती व हेतू समजून न घेता अशा प्रकाराचे खुलासे हे एसटीच्या भविष्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे असे बरगे यांनी म्हटले आहे.
एसटी महामंडळाच्या जागांचा विकास करा, पण पॅकेज पद्धत नकोच : श्रीरंग बरगेंची मागणी काय..