दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने युगेंद्र पवारांनी खरं सांगितलं!
Yugendra Pawar: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर युगेंद्र पवार बोलले.
Yugendra Pawar on NCP Unity: बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबातील राजकीय समीकरणांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार (Parth Pawar) आणि जय पवार (Jay Pawar) यांच्याशी एकत्र येण्याबाबत चर्चा केल्याचा मुद्दा समोर आला आहे. मात्र, ही चर्चा संपूर्ण राजकीय एकत्रीकरणासाठी नव्हती, तर कारखाना आणि सभासदांच्या हितासाठी होती, असं युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
‘मोदी सरकार सहा महिन्यांत जाणार?’ संजय राऊतांचं मोठं भाकीत; CJP आंदोलनावरूनही केला घणाघात
रेवतीच्या घरी भेटीदरम्यान झाली चर्चा
युगेंद्र पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेवती लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी घरी आली होती. तिची भेट घेण्यासाठी पवार कुटुंबातील सदस्य एकत्र आले होते. यावेळी ताई, जय पवार, पार्थ पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात गप्पा सुरू असताना सहकार क्षेत्रातील एकत्र येण्याचा विषय निघाला.
याबाबत बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, आपण एकत्र आल्यास काय हरकत आहे, असा सहज प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यावर कार्यकर्त्यांची इच्छा नसल्याने एकत्र येणं शक्य नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. मात्र, आपण स्थानिक पातळीवर कारखान्याचा विचार करून सभासदांच्या हितासाठी एकत्र काम करू शकतो, अशी भूमिका मांडल्याचं युगेंद्र यांनी सांगितलं.
ही चर्चा अवघ्या एक-दोन मिनिटांची होती. त्यानंतर सर्वांच्या गप्पा पुन्हा रेवतीभोवतीच सुरू राहिल्या, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
‘राजकीय एकत्रीकरणाचा प्रस्ताव नव्हता’
पवार कुटुंबातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येणार का, या चर्चेवर युगेंद्र पवार यांनी स्पष्टीकरण दिलं. आपण एवढे मोठे नेते नाही की संपूर्ण राजकीय एकत्रीकरणाबाबत चर्चा करू, असं ते म्हणाले. सोमेश्वर कारखान्याची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. त्यामुळे या निवडणुकीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा स्थानिक आणि सहकार क्षेत्राच्या दृष्टीने पाहणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
वारंवार कोर्टात जाऊन थकलो, आता विश्वास राहिला नाही, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयावरच सवाल
सहकार क्षेत्रात सर्व जाणकार आणि अनुभवी लोकांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केलं पाहिजे, असं मार्गदर्शन साहेबांकडून नेहमी मिळत असल्याचंही युगेंद्र पवार यांनी नमूद केलं.
‘जास्तीत जास्त जागा किटलीच्या येतील’
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यंदा तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे कोणत्या पॅनेलला किती जागा मिळतील, याचा अंदाज बांधणं सध्या कठीण असल्याचं युगेंद्र पवार म्हणाले. मात्र, आपल्या पॅनेलला सर्वाधिक जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“जास्तीत जास्त जागा आमच्या किटलीच्या येतील आणि उद्याचा चेअरमन हा किटलीच ठरवेल,” असं विधान करत त्यांनी विजयाचा दावा केला.
21 जागांसाठी 83 उमेदवार रिंगणात
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण 83 उमेदवार नशीब आजमावत असून 93 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. कारखान्याचे 27 हजार 625 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 5 अशी आहे. मतदानानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे.
ब्रेकिंग: अभिजीत दिपकेची सुटका; दिल्ली पोलिसांना न्यायदंडाधिकाऱ्यांनी झापलं, नेमकं काय घडलं?
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आमनेसामने आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करून भाजपच्या मदतीने पॅनेल उभं केलेले पुरुषोत्तम जगताप यांचंही आव्हान आहे. त्यामुळे कारखान्याच्या सत्तेसाठी तिरंगी लढत रंगली आहे.
अजित पवारांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सोमेश्वर कारखान्याची ही पहिलीच निवडणूक असल्याने तिला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. पवार कुटुंबातील राजकीय मतभेद, राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटांची लढत आणि पुरुषोत्तम जगताप यांचं स्वतंत्र पॅनेल यामुळे निवडणुकीची चुरस वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने जगताप यांच्यावर केलेल्या कारवाईचा मतदारांवर काय परिणाम होतो आणि सभासद कोणत्या पॅनेलच्या बाजूने कौल देतात, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल केवळ सहकार क्षेत्रापुरता मर्यादित न राहता बारामतीतील राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे.