2 ते 3 आठवड्यांत कच्चे तेल इतके महाग होईल की…दिग्गज कंपन्यांच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ
Crude Oil Price Hike अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्याने दररोज 1.2 ते 1.4 कोटी बॅरल तेल बाजारातून गायब झाले आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे आणि इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक कच्च्या तेलाचा साठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे जागतिक तेल बाजारपेठ सध्या एका मोठ्या वादळाच्या उंबरठ्यावर उभी आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता जेपीमॉर्गन, शेवरॉनसह इतर प्रमुख तेल कंपन्यांनी जून आणि जुलैमध्ये तेलाच्या किमती झपाट्याने वाढू शकतात. यामुळे सर्व सामान्य नागरिकांना गाड्यांमध्ये इंधन भरणे अवघड होईल असा सावधानतेचा इशार देण्यात आला आहे. दिग्गज कंपन्यांच्या या वॉर्निंगनंतर मोठी खळबळ उडाली आहे.
‘होर्मुज स्ट्रेट’ (Strait of Hormuz) बंद असल्यामुळे जगातील कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्याने दररोज 1.2 ते 1.4 कोटी बॅरल तेल बाजारातून गायब झाले आहे. दरम्यान, ‘शेवरॉन’ आणि ‘एक्सॉन’ सारख्या जगातील आघाडीच्या तेल कंपन्यांच्या प्रमुखांनी दिलेला इशारा जागतिक अर्थव्यवस्थेची झोप उडवणारा आहे. तेल साठे संपुष्टात आल्यास ‘ब्रेंट क्रूड’चे दर १५० ते १६० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचू शकतात, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तर, जेपी मॉर्गन आणि गोल्डमन सॅक्स यांसारख्या बलाढ्य इन्व्हेस्टमेंट बँकांच्या विश्लेषणाने या चिंतेत आणखी भर घातली आहे.
जेपी मॉर्गनचा धक्कादायक अहवाल
सुमारे दोन महिन्यांपूर्वी, अमेरिकन गुंतवणूक बँक जेपीमॉर्गनने एक विश्लेषण प्रसिद्ध केले होते. ज्यात विचारण्यात आले होते की, “जगातील कच्च्या तेलाचा किमान साठा संपायला किती वेळ लागेल?” त्याचा सारांश असा होता की, बाजारात अब्जावधी बॅरल तेल उपलब्ध असले तरी, जर उपलब्ध साठा खूप कमी झाला, तर संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडेल. हे विश्लेषण करताना जेपी मॉर्गनने आपल्या विश्लेषणामध्ये मानवी शरीराचे उदाहरण दिले आहे. शरीरात ब्लड प्रेशर राखण्यासाठी जसे रक्ताचे प्रमाण नाही तर त्याचा सततचा प्रवाह महत्त्वाचा असतो, तसेच तेलाच्या बाबतीत आहे.
बाजारात करोडो बॅरल तेल शिल्लक असले, तरी वापरासाठी उपलब्ध असलेला किमान साठा संपला तर संपूर्ण जागतिक व्यवस्था विस्कळीत होईल. बँकेच्या मते, 2026 च्या सुरुवातीला जागतिक तेल साठा 8.4 अब्ज बॅरल होता, पण त्यातील केवळ 0.8 अब्ज बॅरल तेलच प्रत्यक्ष वापरासाठी योग्य होते. त्यामुळे जर, स्ट्रेट ऑफ होर्मुज बंदच राहिला, तर जून-जुलै महिन्यापर्यंत OECD देशांच्या कमर्शियल तेल साठ्यावर प्रचंड दबाव येईल आणि सप्टेंबरपर्यंत जगातील तेल साठे ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचतील.
होर्मुज बंद तरीही तेलाच्या किमती घसरल्या
होर्मुज स्ट्रेट बंद असतानाही मार्च आणि एप्रिलनंतर मे महिन्यात तेलाच्या किमती घसरल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यात ‘डील’ होणार असल्याच्या अफवा होय. ट्रम्प सरकार बाजार शांत ठेवण्यासाठी कराराचे खोटे संकेत देत आहे, ज्यामुळे तेलाचे दर तात्पुरते कमी आहेत आणि देशांचा वापर वाढला आहे. परिणामी, जगातील तेल साठे अधिक वेगाने रिकामे होत आहेत.
बड्या तेल कंपन्यांच्या प्रमुखांनी फुंकले युद्धशिंग
1. मायकल वर्थ (CEO, शेवरॉन) : “सुरक्षेसाठी असलेला अतिरिक्त तेल साठा (Buffer Stock) आता संपत आला आहे. जून आणि जुलै महिन्यात हा दबाव थेट किमतींवर दिसेल. जर युद्ध संपले तरी मध्य-पूर्वेतील तेल आणि गॅस इन्फ्रास्ट्रक्चरच्या दुरुस्तीसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च होतील. यामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत लोटली जाऊ शकते.”
2. नील चॅपमन (वरिष्ठ उपाध्यक्ष, एक्सॉन) : “आम्ही अशा स्टोरेज लेव्हलच्या जवळ पोहोचलो आहोत जी इतिहासात कधीही पाहिली गेली नाही. साठे वेगाने संपत आहेत. जेव्हा साठा पूर्णपणे तळाला जाईल, तेव्हा किमतींचा प्रचंड भडका उडेल. त्यामुळे क्रूड ऑईल 150 ते 160 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकते. त्यानंतर तेलाचे दर एवढे वाढतील की लोकांना सक्तीने तेल खरेदी बंद करावी लागेल तेव्हाच बाजारात संतुलन येईल.”
युद्ध थांबले तरी 2027 पूर्वी परिस्थिती सुधारणार नाही
जरी अमेरिका-इराण संघर्ष तात्काळ संपला, तरी होर्मुज स्ट्रेटमधून तेलाची वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागेल. युद्धापूर्वीच्या क्षमतेच्या 80% पुरवठा बहाल करण्यासाठी किमान 4 महिने लागतील, तर पूर्ण क्षमतेने तेल प्रवाह सुरू होण्यासाठी 2027 ची पहिली किंवा दुसरी तिमाही उजाडेल असे युनायटेड अरब अमिरातीची सरकारी तेल कंपनी ‘Adnoc’ चे प्रमुख सुलतान अल-जाबेर यांनी स्पष्ट केले आहे.
चीनचे ‘गुप्त’ साठे ठरणार तारणहार?
या संपूर्ण संकटात चीनचे तेल साठे गेमचेंजर ठरू शकतात. कारण चीनच्या धोरणात्मक साठ्यांमध्ये (Strategic Reserves) सुमारे 1.4 अब्ज बॅरल तेल असल्याचा अंदाज आहे. चीनने आपले साठे आंतरराष्ट्रीय बाजारात उतरवले, तर हे संकट काही काळासाठी टळू शकते, अन्यथा येणारे काही महिने संपूर्ण जगासाठी महागाईची आणि इंधन टंचाईची भीषण लाट घेऊन येणारे ठरतील अशी भीती आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.