मुंबई : तुम्हाला चित्रपट पहायची आवड असेल तर तुम्ही ‘टायटॅनिक’ हा चित्रपट पाहिला नाही असं होणार नाही. भारतात हॉलिवूडचे चित्रपट पाहण्याचे क्रेज ‘टायटॅनिक’ या चित्रपटापासूनच वाढले आहे. 25 वर्षांपूर्वी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. त्याची जादू आजही कायम आहे. आजही प्रेक्षकांना या चित्रपटातील सीन जसेच्या तसे पाठ आहेत.
त्यामुळे आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, 25 वर्ष झाल्यानिमित्ताने म्हणजेच चित्रपटाच्या रजत महोत्सवानिमित्त हा चित्रपट पुन्हा एकदा रिलीज करण्यात येणार आहे. येत्या 10 फेब्रुवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चाहते ‘टायटॅनिक’ पुन्हा एकदा 4K,3D मध्ये पाहू शकणार आहेत.
रिलीज अगोदर या चित्रपटाचे पोस्टर आणि नवीन ट्रेलर रिलीज कऱण्यात आला आहे. पोस्टरमध्ये जॅक (लियोनार्डो डिकॅप्रियो) आणि रोज (केट विंसलेट) दिसत आहेत. तर यावेळी सोशल मीडियावर यूजर्स केट विंसलेटची हेअर स्टाईल पाहून कन्फ्यूज झाले आहेत. मेकर्सने नवीन पोस्टर रिलीज केले आणि नेटिजन्स एक्साइटेड झाले. चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रत्येकजण वाट पाहत आहे. त्याचवेळी पोस्टरमधील केटच्या हेअरस्टाइलकडे अनेकांचे लक्ष वेधले. हे जाणूनबुजून किंवा चुकून केले गेले का, असा प्रश्न लोकविचारत आहेत
यापूर्वी हा चित्रपट 19 डिसेंबर 1997 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात 2 अब्ज डॉलरचा व्यवसाय केला. या चित्रपटाने 11 ऑस्कर पुरस्कार जिंकले. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्र, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स यांचा समावेश होता. याला ऑस्करमध्ये एकूण 14 नामांकने मिळाली होती. चित्रपटाचे लेखक, सहनिर्माता आणि दिग्दर्शक जेम्स कॅमेरून आहेत.