Institute of Pavtollogy : ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ (Institute of Pavtollogy) या शीर्षकापासूनच लक्ष वेधून घेणाऱ्या आगामी मराठी चित्रपटाच्या उत्सुकता वाढवणाऱ्या टिझर मागोमाग आता ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्याच्या शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात एका नव्या विषयावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. चित्रपटाचा विषय ‘पावटॉलॉजी’ आहे. हे नेमके काय? याचे ‘इन्स्टिट्यूट’ कसे असू शकते? ‘पावटे’ म्हणजे काय? त्यांना या इन्स्टिट्यूटमध्ये काय शिकवले जाईल? असे एक ना अनेक प्रश्न ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’चा ट्रेलर पाहिल्यावर मनात येतात.
या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना 11 एप्रिलला मिळणार आहे. याच दिवशी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. फटमार फिल्म्सच्या सहयोगाने हेमंत चव्हाण, प्रद्योत पेंढरकर आणि निखिल मगर यांच्या सिक्स पर्पल हार्टसची प्रस्तुती असलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या मराठी चित्रपटाची निर्मिती नेहा गुप्ता आणि प्रसाद नामजोशी यांनी केली आहे.
विजय नारायण गवंडे आणि श्रीकांत देसाई या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’चे दिग्दर्शन प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी केले आहे. या दिग्दर्शक द्वयींनी पुन्हा एकदा आपल्या चित्रपटाद्वारे उत्कंठावर्धक विषय सादर केला आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’च्या ट्रेलरमध्ये चित्रपटाबाबतची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. अभिनेते गिरीश कुलकर्णींनी चित्रपटात म्हटल्याप्रमाणे आता दिवस बदलले आहेत. याच बदललेल्या दिवसांचे प्रतिबिंब ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मनात मात्र ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’बाबत काही प्रश्न आहेत. यांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपटगृहांत मिळणार आहे. शिक्षकाच्या भूमिकेतील गिरीश कुलकर्णी या चित्रपटात कशा प्रकारची ‘पावटॅालॅाजी’ शिकवणार आहेत हे जाणण्याची उत्सुकता ट्रेलर पाहिल्यावर निर्माण होते. हा चित्रपट सध्याच्या शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारा आहे. येत्या उन्हाळ्यात कल्ला करण्यासाठी ‘पावटे’ सज्ज झाल्याचेही ट्रेलर पाहिल्यावर जाणवते. या ‘पावट्यांना’ सांभाळून त्यांना शिकवण्याचे वेगळेच आव्हान चित्रपटातील शिक्षकांसमोर असणार आहे.
या जोडीला ‘पावट्यांची’ धम्माल-मस्ती आणि कर्णमधूर गीत-संगीताची किनार चित्रपटाला जोडण्यात आली आहे. पावटॅालॅाजीतील एक्स फॅक्टर शिकवणारे तज्ज्ञही चित्रपटात दिसणार आहेत. त्यांचा एक वेगळाच ट्रॅक चित्रपटात धम्माल करणार आहे. ‘पावटेश्वर महाराज की जय…’ अशी घोषणा देत आणि ‘आपला अभ्यासक्रम सुपरहिट आहे…’, असे म्हणत ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
‘रंगा पतंगा’ आणि ‘रेडू’ या चित्रपटांच्या निर्मात्यांची ही कलाकृती आहे. अर्थपूर्ण संवाद आणि दोन विरोधी विचारधारांमधील संघर्ष हा या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे. संतोष शिंत्रे यांनी ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ची कथा लिहिली असून, तर प्रसान नामजोशी यांनी दिग्दर्शनासोबतच पटकथा, संवाद आणि गीतलेखनसुद्धा केले आहे.
सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, शशांक शेंडे, दीप्ती देवी, संदीप पाठक, पार्थ भालेराव, देवेंद्र गायकवाड, अपूर्वा चौधरी, प्रगल्भा कोळेकर, कृतिका देव, हरीश थोरात, सुयश झुंजुरके, छाया कदम, विजय निकम, शिवराज वाळवेकर आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहे. संगीतकार विजय नारायण गवंडे यांचे सुरेल संगीत या चित्रपटाची जमेची बाजू ठरणारे आहे. सागर वंजारी यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळर संकलनही केले आहे. कला दिग्दर्शन निलेश गोरक्षे यांनी केले असून, मंदार कमलापूरकर यांनी ध्वनी आरेखन केले आहे.
25 एप्रिलला धिंगाणा होणार, ‘देवमाणूस’ मध्ये सई ताम्हणकर थिरकणार पहिल्यांदाच लावणीवर
छायांकन गिरीश जांभळीकर यांचे, तर व्हीएफएक्स अमिन काझी यांचे आहेत. रश्मी रोडे यांनी वेशभूषा, श्रीकांत देसाई यांनी रंगभूषा केली असून, प्रशांत गाडे आणि सुमित कुलकर्णी यांनी निर्मितीव्यवस्था सांभाळली आहे.