तुंबाडची मंजुळा : हास्य आणि भयाची दमदार रोलरकोस्टर राईड…

Tumbadchi Manjula-देऊळ, व्हेंटिलेटर नंतर खूप पात्र असूनही त्या प्रत्येक कॅरेक्टरला स्वतःचा रंग दाखवण्याची संधी देणारा आणि तरीही गोष्टीचा प्रवाह कुठेही खंडित न होऊ देणारा असा हा सिनेमा आहे.

Tumbachi Manjula

Tumbachi Manjula

Tumbadchi Manjula Movie Review: इरसाल गावच्या इरसाल नमुन्यांची ही गोष्ट आहे… तुंबाडची मंजुळा (Tumbadchi Manjula)… हॉरर कॉमेडीचा फॉर्म मराठीत तसा अभावानेच हाताळला गेला आहे. पदार्पणातच झी स्टुडिओज (Zee Studios) आणि विविध कोरगावकर या दिग्दर्शकाने तो हाताळण्याचा केलेला प्रयोग हा रंगतदार आहे… देऊळ, व्हेंटिलेटर नंतर खूप पात्र असूनही त्या प्रत्येक कॅरेक्टरला स्वतःचा रंग दाखवण्याची संधी देणारा आणि तरीही गोष्टीचा प्रवाह कुठेही खंडित न होऊ देणारा असा हा सिनेमा आहे. पदार्पणातच हे आव्हान पेलण्यासाठी विविध कोरगावकरला स्पेशल ब्राऊनी पॉईंट्स द्यायला हवेत.

कन्नड सिनेमा सु फ्रॉम सो याचा रिमेक असलेल्या या सिनेमात मराठी मातीला साजेसे आणि त्याला अनुकूल ठरतील असे बदल केलेले निश्चित जाणवतात आणि काही पात्रांचा वाढवलेला वावर त्यांना दिलेले महत्व आणि त्यामुळे कथानकांला आलेली रंगत ही महत्त्वाची ठरते. ‘तुंबाडची मंजुळा’ ही उत्कंठावर्धक रोलर कोस्टर राइड आहे. योगेश शिरसाठ आणि ऋषिकेश तुरई यांचे संवाद सिनेमाची जमेची बाजू आहे … त्यामुळे सिनेमा अधिक रंगतदार झाला आहे.

एखादी भट्टी जमून यावी, तशा पद्धतीचा हा सांघिक प्रयत्न दिसतो. त्यासाठी बवेश जानवलेकर यांचे विशेष कौतुक करायला हवे की त्यांनी एका नव्या दिग्दर्शकावर विश्वास ठेवला आणि त्याला संधी दिली आणि विविध कोरगावकरने ही त्या संधीचं सोनं केलं आहे. एकापेक्षा एक मातब्बर सरस कलावंतांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवताना एकमेकांना पूरक ठरणारे आणि तितकंच रंगतदार होणारे सीन्स सिनेमाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातात.

केशवच्या (ओम भुतकर) आजीचा आकस्मित मृत्यू… नंतर गावात घडणारी एक घटना… त्याला असलेले अनेक कंगोरे आणि भावनिक पदर यामुळे गाव गाता गजाली… याचा अनुभव कोरेगावात यायला लागतो. आणि मग सुरू होतो अफवा, भीती, अंधश्रद्धा आणि संशय यांचा खेळ…
घटना आणि त्याचा डॉमिनो इफेक्ट यामध्ये हास्य भीती आणि रंजकतेचा मिलाफ आहे. विविध कोरगावकरने गोष्टीचा प्रवाहीपण जपत आपली छाप सोडली आहे.
जितेंद्र जोशीचा रवी अण्णा आपल्याला भावतो. वयाला साजेशी असणारी भूमिका करताना मी सहजता स्वाभाविकता अनेक भावनिक कंगोरे जपत त्याने साकारलेला रवी अण्णा हाडामासाचा वाटतो. दारू पिण्याचा मित्रांसोबतचा सिक्वेन्स असेल, सई ताम्हणकरसोबत तिच्या दरवाज्यातला स्थळ म्हणून बघायला आलो होतो… याचं कन्फेशन असेल… मकरंद अनासपुरे आणि ओम भूतकर याबरोबरचे काही सिक्वेन्सेस असतील, यामध्ये जितेंद्र त्यावर आपली छाप सोडतो.

स्टारडमच्या पलीकडे जाऊन सईने साकारलेल्या कॅरेक्टरला एक वेगळा उंचीवर नेले आहे. तिच्या नजरेत तिच्या डोळ्यात… त्या गावातलं अनोळखीपण दिसतं… तिचे जितेंद्रसोबतचे सिक्वेन्स अबोल असूनही मनातील घालमेल जाणवत राहते. उमेश जगतापने साकारलेला काका त्याचा तिटकारा येतो, ही उमेशच्या कामाची पावती आहे.

ओम भूतकरने साकारलेला केशव त्याची भावनिक आंदोलने आणि ‘लक्स” वाल्या प्रेमामुळे झालेला गोंधळ निस्तारताना जिवाची होणारी घुसमट अधोरेखित करताना त्यामधील स्वाभाविकता ही जमेची बाजू आहे.

मकरंद अनासपुरे याने साकारलेला बाबा त्यांच्या स्टाईलचा आहे, त्यातही रंजकता आणण्यासाठी विनोदाचेचे अनेक परम्युटेशन कॉम्बिनेशन त्यांनी केलेले आहेत. उषा नाडकर्णी यांनी साकारलेली डोळ्यांना कमी दिसणारी आजी पण तिच्या “एक्स-रेटिक कमेंट्स” सिनेमात रंजकता आणतात.

अंशुमन विचारे त्यांनी साकारलेला विनोद केवळ रवी अण्णाची साईड कीक … मित्र राहत नाही तर मिळालेल्या संधीचं सोनं करणारा हा अभिनेता याची जाणीव करून देतो. गणेश पंडितने साकारलेल्या रिक्षा ड्रायव्हर उपजत त्याला असलेली विनोदबुद्धी आणि अभिनयाचा अंग या जोरावर आपला ठसा उमटवतो. शार्दुल सराफ याने साकारलेला शिक्षक गावातील अघोषित नेतेपद मिळवण्यासाठी असणारी अहमिका तरीही त्या सगळ्या जुगलबंदीत हेकेखोरपणा पेक्षाही असणारा साधेपणा तितक्यात सफाईने अधोरेखित करतात.

वर्षा दांदळे यांच्या वाट्याला आलेले मोजके सीन्स आहेत पण चोखपणे वठवले आहेत. त्यामध्ये सहज आणि स्वाभाविकपणे त्यांनी रंग भरलेला आहे. सिद्धार्थ झाडबुके यांनी साकारलेला दारुड्या हा चांगलाच लक्षात राहतो… गंमत आणतो… सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व रुके याने साकारलेला भगतचा मुलगा हा देखील चांगला रंगला आहे.

जवळपास पन्नासेक कलाकारांचा फौजफाटा घेऊन ‘तुंबाडची मंजुळा’ उभं करणारा तालिम मास्तर’ म्हणून विविध कोरगावकर याचं कौतुक आहे. आणि तितकेच मार्क कास्टिंग डिरेक्टरला द्यायला हवेत. ‘गावच्या गजाली’पासून सुरू झालेला हा प्रवास मनोरंजन करतो, मनापासून हसवतो… भय आणि त्याभोवतीच्या कोंदणात प्रेक्षकांना विश्वासात घेतो ही फार मोठी जमेची बाजू आहे.

सायली खरे यांच्या आवाजातील हे देवा मला पावकी रे…गाणे आपला ठसा उमटवते. अवधूत गुप्ते यांच्या झाडान् धरलय भूत… हे गाणं जमून आलं आहे. चाललो ढगात… आज बुंगाट … हे विशाल ददलानीच्या आवाजातील गाणे चांगलेच चर्चेत आहे.

कौशल गोस्वामी यांच्या सिनेमॅटोग्राफीमध्ये दिसलेलं कोकण त्यांनी टिपलेल्या दृश्य चौकटी तितक्याच रंजक आहेत… मयूर हरदासनेही संकलनात आपली छाप सोडली आहे. गतवर्षी प्रदर्शित झालेल्या ‘सु फ्रॉम सो’या कानडी सिनेमाचा हा रिमेक आहे, ज्याचं लेखन-दिग्दर्शन जया प्रकाश थुमिनाड यांनी केलं होतं.हास्य आणि भयपटाच्या रोलर कोस्टर राईडसाठी या सिनेमाला मी देतोय चार स्टार्स.


का पाहावा ? दमदार स्टारकास्ट आणि अभिनयाची जुगलबंदी

का टाळावा ? ‘सु फ्रॉम सो’ पाहिला असेल तर…

थोडक्यात काय ? हास्य आणि भयपटाची रोलर कोस्टर राईड.

अमित भंडारी, चित्रपट समीक्षक


सिनेमा : तुंबाडची मंजुळा
निर्मिती : झी स्टुडिओज
दिग्दर्शक : विविध कोरगावकर
कलाकार : जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर, उषा नाडकर्णी, अंशुमन विचारे, अंशुमन विचारे, गणेश पंडित, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, सिद्धार्थ झाडबुके, उमेश जगताप
पटकथा रूपांतर : ऋषिकेश तुराई
संवाद : ऋषिकेश तुराई, योगेश शिरसाठ
छायांकन : कौशल गोस्वामी
संकलन : मयूर हरदास
स्टार्स -⭐⭐⭐⭐

Exit mobile version