Unique song from the movie ‘Dashmi’ creates a buzz : रिक्षाच्या मागे लिहिलेली ‘बुरी नजरवाले.. तेरा मुँह काला’ ही ओळ आपण अनेकदा वाचली असेल. रस्त्यावर सहजपणे नजरेस पडणारी ही ओळ आता थेट मराठी चित्रपटाच्या गाण्यात ऐकायला मिळणार आहे. आगामी ‘दशमी’ चित्रपटातील ‘दुनियेवर राज करेल दिलवाला, बुरी नजरवाले.. तेरा मुँह काला’ हे हटके गाणं सध्या चर्चेत आलं आहे. देसी शब्दांचा तडका, जोशपूर्ण ठेका आणि नकाश अझीझचा दमदार आवाज यामुळे हे गाणं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
रिक्षाच्या मागे दिसणाऱ्या भन्नाट लिखाणाचा संदर्भ घेत या गाण्याला खास फिल्मी अंदाज देण्यात आला आहे. वैभव देशमुख यांनी या गाण्याचे शब्द लिहिले असून सुरेश पंडित यांनी संगीत दिलं आहे. आपल्या जोशपूर्ण गायकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नकाश अझीझच्या आवाजामुळे गाण्याची एनर्जी आणखी वाढली आहे. ‘दुनियेवर राज करेल दिलवाला, बुरी नजरवाले.. तेरा मुँह काला’ ही ओळ आणि त्याला मिळालेली संगीताची साथ गाण्याला वेगळा रंग देताना दिसते.
विशेष म्हणजे या गाण्यात अभिनेत्री गौरी इंगवले, राज कुंदन यांच्यासह मकरंद अनासपुरे आणि विजय निकम हे कलाकार भन्नाट ठेका धरताना दिसणार आहेत. या कलाकारांचा अंदाज आणि गाण्याचा उत्साही बाज यामुळे ‘बुरी नजरवाले.. तेरा मुँह काला’ हे ‘दशमी’मधील खास आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. ‘दशमी’ चित्रपटातील गाणी ‘व्हिडिओ पॅलेस’ने प्रकाशित केली आहेत.
भाषेत मराठीची शुद्धता पण विचारांचा इतरांना त्रास होणार नाही अशी अपेक्षा; फडणवीसांचा बापटांना सल्ला!
रिक्षा, ट्रक किंवा इतर वाहनांच्या मागे लिहिलेल्या हटके ओळी हा आपल्या रस्त्यांवरील एक परिचित भाग आहे. अशाच एका लोकप्रिय ओळीला गाण्याच्या माध्यमातून सिनेमाच्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न ‘दशमी’मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे गाण्याच्या शब्दांपासून त्याच्या सादरीकरणापर्यंत देसी अंदाज पाहायला मिळणार आहे.
वेगळ्या विषयामुळे चर्चेत असलेल्या ‘दशमी’ने आता या हटके गाण्यामुळेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. केएनके बॉक्स प्रस्तुत ‘दशमी’ हा मराठी चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केलं आहे. तर चित्रपटाच्या लेखन आणि संगीताची जबाबदारी सुरेश पंडित यांनी सांभाळली आहे.
मनोरंजनासोबतच ‘दशमी’च्या कथेत संघर्ष आणि सत्याची बाजू मांडण्यात आली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अन्याय, संघर्ष आणि सत्याची परीक्षा घेणारा प्रसंग येतो. अशा परिस्थितीत हार न मानता आणि परिस्थितीसमोर न झुकता सत्याच्या बाजूने उभं राहण्यासाठी लागणारं धैर्य या चित्रपटाच्या कथेतून मांडण्यात येणार आहे.
एका बाजूला गंभीर आशय आणि संघर्षाची कथा, तर दुसऱ्या बाजूला ‘बुरी नजरवाले.. तेरा मुँह काला’ सारखं उत्साही आणि देसी अंदाजातील गाणं, अशा वेगवेगळ्या पैलूंमुळे ‘दशमी’ प्रेक्षकांसाठी काय घेऊन येणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. आता ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला आणि त्यातील या हटके गाण्याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
