Download App

दु:खद वार्ता, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांचे निधन, मराठी चित्रपटसृष्टी शोकाकुल

Veteran actress Sulochnadidi Latkar passed away : आता मनोरंजनसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर (Sulochanadidi Latkar) यांचं आज वृध्दापकाळाने निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून सुलोचनादीदी आजारी होत्या. त्या श्वसनाच्या आजाराने त्रस्त होत्या. आज अचानक त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना सुश्रृषा रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, उपचारा दरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी त्यांचे वय हे 94 वर्ष होतं. दरम्यान, त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

सुलोचनादीदींचा जन्म 30 जुलै 1928 रोजी बेळगावमधील चिकोडी तालुक्‍यातील खडकलरत गावी झाला झाला. त्यांनी यांनी 1943 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केले. भालजी पेंढाकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांच्या आईच्या भूमिका ससंस्मरणीय ठरल्या. 1959 मध्ये आलेल्या ‘दिल देके देखो’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा आईची भूमिका साकारली होती. त्यानंतर 1995 पर्यंत दीदींनी देव आनंद, सुनील दत्त, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यासारख्या अनेक दिग्गज कलाकारांच्या ‘आई’ची भूमिका साकारली. आपल्या कामामुळे अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी नवे आयाम प्रस्थापित केले.

‘दादा, कार्यक्रम ऑनलाइन असता तर बरं झालं असतं’; मुख्यमंत्री शिंदे असं का म्हणाले?

त्यांनी मराठीत 50 आणि हिंदीत 250 चित्रपट केले आहेत. ‘वहिनीचे बांगड्या’, ‘मीठ भाकर’, ‘धाकडी जाऊ’ ‘सांगत्ये ऐका, ‘मोलकरीण’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘साधी माणसं’, ‘एकटी’ यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट हिट ठरले. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही सुलोचनादीदींनी आपली छाप सोडली. याशिवाय त्यांनी ए दिन बहार के, कट्टी पतंग, नाटक, चिराग, संबंध या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.

त्यांनी पृथ्वीराज कपूर, नाझीर हुसैन, अशोक कुमार यांच्यासोबत सहकलाकार म्हणून काम केले. सुलोचनादीदींनी तब्बल पाच दशकं मनोरंजनसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. आपल्या प्रत्येक भूमिकेवर त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाची छाप पाडली आणि म्हणूनच त्यांचे अनेक गाजलेले सिनेमे प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते.

सुलोचनादीदींच्या सिनेसृष्टीतील योगदानाची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना 1999 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरव केला. याशिवाय, 2003 मध्ये, चित्रभूषण पुरस्कार तर 2009 मध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने देखील सुलोचनादीदींना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या जाण्यानं केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीवरही मोठा दु:खांचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, सुलोचनादीदी यांच्या पार्थिवावर सोमवार, 5 जून रोजी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव प्रभादेवी येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

Tags

follow us