Raah Records : मूळ कलाकार आणि संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित यश राज फिल्म्सच्या नव्या ‘राह रेकॉर्ड्स’ या संगीत लेबलच्या लॉन्चची घोषणा केल्यानंतर अवघ्या एका दिवसात लेबलने आज आपले पहिले मूळ गीत ‘जादूगरी’ प्रदर्शित केले आहे. गायक-गीतकार अमनने लिहिलेले आणि सादर केलेले हे गीत आहे. काल ‘राह रेकॉर्ड्स’च्या लॉन्चसोबत ‘जादूगरी’च्या भावविश्वाची झलक श्रोत्यांसमोर आणण्यात आली होती. आता या गीताची संपूर्ण आवृत्ती सर्व प्रमुख ऑडिओ स्ट्रीमिंग व्यासपीठांवर उपलब्ध झाली आहे.
अमनने लिहिलेले आणि सादर केलेले ‘जादूगरी’ हे प्रेम, विरह आणि एखादी व्यक्ती दूर गेल्यानंतरच त्याची खरी किंमत जाणवणाऱ्या त्या शांत क्षणांवर आधारित भावस्पर्शी गीत आहे. आपल्या जोडीदाराच्या प्रेमाला गृहीत धरल्याची जाणीव खूप उशिरा होणाऱ्या एका व्यक्तीच्या दृष्टिकोनातून हे गीत मांडण्यात आले आहे. एखादे नाते हळूहळू हातातून निसटताना पाहण्याची वेदना या गीतातून व्यक्त होते. मनाला भिडणारे शब्द आणि भावपूर्ण चालीच्या माध्यमातून न बोललेले संवाद, कधीही व्यक्त न केलेली कृतज्ञता आणि दैनंदिन आयुष्यातील ते छोटे क्षण, ज्यांचे महत्त्व शेवटी सर्वाधिक असते, यांचा वेध या गीतातून घेतला जातो.
या भावनांना पडद्यावर साकारताना, संगीत व्हिडिओमध्ये अमनसोबत शिवांगी नेगी झळकत आहे. दोघांच्या नात्यातील आनंदी आठवणींना जिव्हाळ्याच्या आणि जुन्या आठवणी जागवणाऱ्या प्रसंगांतून मांडण्यात आले आहे. त्यानंतर हळूहळू दोघांमधील वाढत जाणारे भावनिक अंतर समोर येते. ‘जादूगरी’ हे शीर्षक जोडीदाराच्या प्रेमातील त्या जादूचे प्रतीक आहे, ज्याची खरी जाणीव मुख्य व्यक्तिरेखेला ते प्रेम गमावल्यानंतर होते.
या रिलीजसोबत राह रेकॉर्ड्समधील अमनच्या प्रवासाचीही सुरुवात झाली आहे. लेबलच्या प्रतिभा-विकास उपक्रमांतर्गत गेल्या वर्षभरापासून अमनसोबत सातत्याने सर्जनशील पातळीवर काम करण्यात आले. या काळात त्याने आपल्या गीतलेखनाला अधिक परिष्कृत केले, संगीताची स्वतःची शैली विकसित केली आणि स्वतंत्र कलात्मक ओळख निर्माण केली. अमनच्या लॉन्चमधून कलाकारांसोबत दीर्घकालीन सर्जनशील भागीदारी निर्माण करण्याबरोबरच प्रत्येक कलाकाराला त्याची स्वतःची वेगळी ओळख आणि आवाज जपण्यासाठी सक्षम करण्याची राह रेकॉर्ड्सची बांधिलकी अधोरेखित होते.
‘जादूगरी’बद्दल बोलताना अमन म्हणाला, “जादूगरी हे अतिशय प्रामाणिक भावनेतून आलेले गीत आहे. हे अशा नात्याबद्दल आहे, ज्यात नाते संपण्यापूर्वीच एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर जात असल्याची जाणीव होते; मात्र तरीही आपण सगळं पुन्हा पूर्वीसारखं होईल अशी आशा ठेवत राहतो. मला वाटतं, आपण सगळ्यांनी असे क्षण अनुभवले आहेत, जेव्हा खूप उशिरा लक्षात येतं की छोट्या-छोट्या गोष्टी आपण कधीच न केलेले संवाद, कधीच व्यक्त न केलेली कौतुकाची भावना आणि आपण गृहीत धरलेले क्षण खरंतर सर्वाधिक महत्त्वाचे होते. ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, त्यांना घट्ट धरून ठेवावं आणि त्यांच्या प्रेमाला कधीही गृहीत धरू नये, याची आठवण हे गीत करून देईल, अशी माझी आशा आहे.”
अमनने आपल्या अत्यंत वैयक्तिक आणि भावस्पर्शी गीतलेखनातून हळूहळू एक निष्ठावान प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. अनेकांना व्यक्त करता न येणाऱ्या भावनांना तो आपल्या संगीतामधून आवाज देतो. याच वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेले त्याचे चर्चेत आलेले ‘रोया था’ हे गीत स्पॉटिफायवर जवळपास 50 लाख वेळा ऐकले गेले, स्पॉटिफाय इंडियाच्या व्हायरल चार्टमध्ये 13व्या क्रमांकावर पोहोचले आणि या गीतावर इन्स्टाग्रामवर 19 हजारांहून अधिक रील्स तयार करण्यात आल्या. यामुळे अमनने भारतातील आशादायी आणि प्रतिभावान उदयोन्मुख गायक-गीतकारांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
‘जादूगरी’ च्या माध्यमातून अमन एका अत्यंत वैयक्तिक गीतासह आपल्या कारकिर्दीच्या नव्या अध्यायाला सुरुवात करत आहे. त्याचबरोबर राह रेकॉर्ड्सच्या अंतर्गत संगीत प्रदर्शित करणारा तो पहिला कलाकार ठरला आहे. ही रिलीज मूळ आणि स्वतंत्र आवाजांना प्रोत्साहन देणे, देशातील प्रतिभेला घडवणे आणि स्वतंत्र संगीत क्षेत्रात कलाकारांचे दीर्घकालीन करिअर उभारणे या राह रेकॉर्ड्सच्या दृष्टीकोनाची सुरुवात दर्शवते.
