यश चोप्रा फाउंडेशनच्या स्कॉलरशिप प्रोग्रामचा विस्तार; 300 हून अधिक अर्जांमधून 11 विद्यार्थ्यांची निवड
Yash Chopra Foundation : यश चोप्रा फाउंडेशननं यंदाच्या शिष्यवृत्तीचा विस्तार करत 300 हून अधिक अर्जांमधून 11 विद्यार्थ्यांची निवड केली.
Yash Chopra Foundation : यश चोप्रा फाउंडेशननं यंदाच्या स्कॉलरशिप प्रोग्रामचा विस्तार करत 11 विद्यार्थ्यांची निवड केली आहे. (Foundation) विशेष म्हणजे, पहिल्यांदाच रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर टेक्नॉलॉजीवर आधारित अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. 2026–27 या शैक्षणिक वर्षासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कासाठी फाउंडेशनकडून आर्थिक मदत केली जाणार आहे.
यश राज फिल्म्सची परोपकारी शाखा असलेलं यश चोप्रा फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित कुटुंबांच्या शैक्षणिक गरजांना मदत करत आहे. नोंदणीकृत हिंदी फिल्म इंडस्ट्री आणि FWICE युनियनच्या सदस्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी या प्रोग्रामच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिलं जातं. प्रत्येक विद्यार्थ्याला 5 लाख रुपयांपर्यंत मदत देण्याची तरतूद या उपक्रमात आहे.
नाटकातलं घर नाही… घराघरातलं नाटक! ‘शुभं करोति’मधून उलगडणार आजच्या कुटुंबाची गोष्ट
यापूर्वी या स्कॉलरशिपच्या माध्यमातून प्रामुख्यानं मीडिया, फिल्म आणि क्रिएटिव्ह क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत केली जात होती. मात्र, यंदापासून या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससोबत इंजिनिअरिंग, आयटी, मॅनेजमेंट, लॉ आणि मेडिकल क्षेत्रातील अभ्यासक्रमांचाही आता या स्कॉलरशिपमध्ये समावेश करण्यात आला आहे.
यंदा 300 हून अधिक नोंदणीकृत अर्जांमधून गुणवत्ता आणि आर्थिक गरज लक्षात घेऊन निवड प्रक्रिया राबवण्यात आली. त्यातून 11 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. यामध्ये आर्यन सिंह, अस्मा चौधरी, जैद कलीम, जय सिद्धेश्वर जंगम, निधी सुभाषचंद्र यादव, प्रांजल प्रमोद कापुडे, प्रथमेश प्रदीप करंजोलकर, रुद्र मंगेश दामले, सचिन विश्वकर्मा, उजमा सरफराज खान आणि व्हॅलेन्सिया रोजियार मधुरा यांचा समावेश आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर सायन्स, एआय आणि एमएल, इलेक्ट्रॉनिक्स, मास कम्युनिकेशन, रोबोटिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, एमसीए, फायनान्शियल मार्केट्स, आयटी आणि सायबर सिक्युरिटीसारख्या विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यश राज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी यांनी सांगितलं की, फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेल्या कुटुंबांच्या पुढच्या पिढीच्या आकांक्षांनुसार स्कॉलरशिप प्रोग्रामची व्याप्ती वाढणं महत्त्वाचं आहे.
यश चोप्रा फाउंडेशनच्या या उपक्रमातून फिल्म इंडस्ट्रीच्या पडद्यामागं काम करणाऱ्या टेक्निशियन, लाइटमन, स्पॉट बॉय आणि इतर डेली-वेज कामगारांच्या मुलांना शैक्षणिक मदत दिली जात आहे. हिंदी सिनेमाच्या उभारणीत या कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असून त्यांच्या मुलांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळाव्यात, हा या स्कॉलरशिप प्रोग्रामचा उद्देश आहे. टेक्नॉलॉजी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश केल्यानं आता या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधींचा आवाका आणखी वाढला आहे.