मुंबई : एका वर्षापूर्वी आनंद एल राय, क्षिती जोग निर्मित, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ घातला होता. आता पुन्हा या चित्रपटाचा दुसरा भाग बॉक्स ऑफिसवर पुन्हा धुमाकुळ घालण्यासाठी येतोय. ‘झिम्मा 2’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकतचं दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी या चित्रपटाची घोषणा करणारा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.
हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय या चित्रपटाची प्रस्तुती करणार आहेत. चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यु फिल्म्स निर्मित हा चित्रपट येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आनंद एल. राय आणि क्षिती जोग या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि सहनिर्माते आहेत विराज गवस, उर्फी काझमी, अजिंक्य ढमाळ.
या व्हिडीओत निर्मला (निर्मिती सावंत) पुन्हा एकदा फिरायला जाण्यासाठी साहेबांकडे (अनंत जोग यांच्याकडे) परवानगी मागताना दिसत आहेत. यावेळी साहेबांनीही ट्रीपला येण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यांना नकार देत, पुन्हा एकदा ‘बाया बायाच’ ट्रीपला जायची तयारी करत असल्याचं निर्मला समजावते. साहेब मात्र निर्मलाला सूनबाईंना बरोबर घेऊन जा, असं सांगतात… आता सूनबाई कोण? यावेळी ही ट्रीप कुठे जाणार आणि यात केवळ ‘त्याच’ मैत्रिणी असणार की, आणखी मैत्रिणींची भर पडणार ? हे लवकरच कळणार आहे.
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ‘झिम्मा’ वर प्रेक्षकांशी भरभरून प्रेम केले. यातील प्रत्येकीमध्ये गृहिणींनी, तरुणींनी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला. कधी दोन दिवसही एकट्या घराबाहेर न राहिलेल्या महिलांनी त्यांच्या मैत्रिणींसोबत आठवडाभर बाहेर जाण्याचे प्लॅन्स केले. ‘झिम्मा’ सर्वांनाच खूप जवळचा वाटला. आजही मी कुठे गेल्यावर मला अनेक जणी ‘झिम्मा’ आवडल्याचे आवर्जून सांगतात. अनेकींनी ‘झिम्मा 2’ लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन या, अशी मागणीही केली. त्या माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या प्रेमाखातरच मी ‘झिम्मा 2’ चा निर्णय घेतला आणि आता लवकरच ‘झिम्मा 2’ ही सीमोल्लंघन करण्यासाठी येणार आहे. या वेळी मजा डबल झाली असून हा चित्रपटही प्रेक्षक तितकाच एन्जॅाय करतील.