विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने १९९९ पासून अखिल भारतीय ब्राह्मणी भांडवली पुरुषसत्ताक मराठी साहित्य संमेलनाच्या विरोधात विद्रोही मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्यात येतात.
यावेळी हे विद्रोही मराठी साहित्य संमेलन मलिक अंबरी साहित्य नगरी छत्रपती संभाजीनगर शहरात भरवण्यात आले आहे.
आमखास मैदानावर उभारलेल्या मलिक अंबर साहित्य नगरीत २ भव्य सभामंडप उभारण्यात आली असून, ३ दालनांमध्ये बाल मंच, युवा मंच यासह एकूण ४ विचार मंचांवर विविध कार्यक्रम होणार आहेत.
दोन दिवसांमध्ये ६ परिसंवाद, १४ गटचर्चा, १ विशेष व्याख्यान होईल. काव्य पहाट मैफल, गजल संमेलन, अशी ४ कविसंमेलने व काही सत्रांत साहित्यिक, विचारवंत, पत्रकारांशी साहित्य संवाद होईल.
सांस्कृतिक व कला प्रकारात आदिवासी गाणी, कलादर्शन, लोककलांचे सादरीकरण व महाराष्ट्रदर्शन इ. सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. कथाकथनाच्या कार्यक्रमासह २ नाट्यवाचन, ३ एकपात्री प्रयोगासह २ एकांकिकांचे सादरीकरण या मंचावर होणार आहे. युवा कलाकारांचे रॅप गीतांचे सादरीकरण लक्षवेधी ठरेल.