अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शतक महोत्सवी सोहळ्याचा शुभारंभ, पाहा फोटो…
shruti letsupp
Akhil Bhartiy Marathi Natya Samelan:
पारंपारिक वेशभूषा केलेले पुरुष, नऊवारीत नटलेल्या महिला, सर्वांच्या डोक्यावर आकर्षक फेटे आणि माराठी रंगभूीवरील आजरामर अशा १०० कलाकृतीमधील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा.
दीडशे कलाकारांच्या सहभागाने रंगलेला भव्य ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे आकर्षण ठरले.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यात शुक्रवारी पार पडला. यावेळी पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरापासून ते गणेश कला क्रीडा मंचापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नाट्य यात्रा काढण्यात आली.
या भव्य नाट्य यात्रेत ५०० दुचाकी, १० रथावर विराजमान झालेले ज्येष्ठ कलाकार आणि १०० विविध नाटकांमधून रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या १०० व्यक्तिरेखांचा समावेश होता.
याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, नाटय परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पुणे शाखेचे विजय पटवर्धन, दीपक रेगे यांच्यासह पुण्यातील कलावंत, नाटय परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे रंगमंच पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी नाट्य परिषद अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या हस्ते तिसरी घंटा देऊन आज (शुक्रवार) होणाऱ्या कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. या नंतर हभप. चारुदत्त आफळे यांचे नाट्य संकीर्तन पार पडले.
शुभारंभ सोहळ्यात पुढें नितीन मोरे आणि दीडशे कलावंताच्या सहभागाने ‘ शिवराज्याभिषेक सोहळा ‘ रंगला. यामध्ये कलाकारांनी सादर केलेली वैविध्यपूर्ण नेत्रदिपक नृत्ये लक्षवेधी ठरली.