विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणा-या 68 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ ने आज सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश आहे.राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रात अमूल्य योगदानासाठी ‘पद्मभूषण’ (मरणोत्तर) पुरस्कारने आज गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र श्री. उन्मेश जोशी यांनी स्विकारला.
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जयपुर-अतरौली घराण्याच्या ख्याल गायकी परंपरेतील आघाडीच्या गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांना शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
देवनागरी लिपीच्या कलेला नवसंजीवनी देणारे प्रसिद्ध कॅलिग्राफर अच्युत पालव यांना कला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी सुभाष शर्मा यांना कृषी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले.
70 वर्षीय डॉ. विलास डांगरे यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. होम्योपैथीच्या माध्यमातून त्यांनी गरजूंच्या आरोग्यसेवेत अतुलनीय योगदान दिले आहे.