Pope Francis Passed Away : कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. व्हॅटिकनने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रोमन कॅथोलिक चर्चचे पहिले (Pope Francis) लॅटिन अमेरिकन नेते पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले आहे, असे एका निवेदनात म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते. अशा परिस्थितीत, पोप फ्रान्सिसबद्दलच्या १० मोठ्या गोष्टी जाणून घेऊया, ज्या तुम्हाला कदाचित माहित नसतील.
पोप फ्रान्सिस, ज्यांचा जन्म जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ ब्युनोस आयर्स, अर्जेंटिना येथे झाला, त्यांना 1969 मध्ये कॅथोलिक धर्मगुरू म्हणून नियुक्त करण्यात आले. ते जेसुइट ऑर्डरचे पहिले पोप तसंच, 8 व्या शतकापासून युरोपबाहेरून निवडलेले पहिले पोप होते. 13 मार्च 2013 रोजी, पोप बेनेडिक्ट XVI च्या राजीनाम्यानंतर झालेल्या पोप कॉन्क्लेव्हमध्ये कार्डिनल बर्गोग्लिओ यांची नवीन पोप म्हणून निवड झाली. असिसीच्या सेंट फ्रान्सिसच्या सन्मानार्थ त्यांनी ‘फ्रान्सिस’ हे नाव धारण केलं. आता त्यांच्या निधनानंतर, अधिकृतपणे 14 दिवसांचा शोक पाळला जाईल, त्यानंतर कार्डिनल परिषदेत नवीन पोप निवडण्याची प्रक्रिया सुरू करतील.
पोप फ्रान्सिसचे प्रारंभिक शिक्षण
पोप फ्रान्सिस यांचा जन्म १७ डिसेंबर १९३६ रोजी अर्जेंटिनामधील ब्युनोस आयर्स येथे झाला. त्यांनी तांत्रिक शाळेतून रासायनिक तंत्रज्ञ म्हणून पदवी संपादन केली आणि प्रयोगशाळेत रसायनशास्त्रज्ञ म्हणून काही काळ काम केलं.
धर्मशास्त्रात विशेष रस होता
1958 मध्ये, त्यांनी जेसुइट ऑर्डरमध्ये प्रवेश केला आणि चिलीमध्ये मानवतेचा अभ्यास केला. 1963 मध्ये, ते अर्जेंटिनाला परतले आणि सॅन जोसे कॉलेजमधून तत्त्वज्ञानाची पदवी प्राप्त केली. त्यानंतर 1967 ते 1970 या काळात त्यांनी याच महाविद्यालयातून धर्मशास्त्राची पदवी घेतली.
शाळांमध्ये शिकवले
1964 ते 1966 पर्यंत त्यांनी सांता फे आणि ब्युनोस आयर्स येथील जेसुइट शाळांमध्ये साहित्य आणि मानसशास्त्र शिकवलं. 1973 मध्ये, त्यांनी सोसायटी ऑफ जीझसमध्ये अंतिम शपथ घेतली आणि अर्जेंटिनामध्ये जेसुइट प्रांतीय प्रमुख म्हणून नियुक्त केलं गेलं. 1980 ते 1986 पर्यंत ते सॅन मिगुएलमधील कॉलेज ऑफ फिलॉसॉफी अँड थिओलॉजीचे रेक्टर होते.
पोप फ्रान्सिस यांच्याबद्दलच्या दहा गोष्टी
१. पोप फ्रान्सिस यांचा जन्म १७ डिसेंबर १९३६ रोजी जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ म्हणून झाला.
२. पोप फ्रान्सिस यांना तीन भाषा अवगत होत्य. त्यामध्ये स्पॅनिश, इटालियन आणि जर्मन.
३. फ्रान्सिस हा पहिला जेसुइट पोप होते. ते दररोज रात्री ९ वाजता झोपायचे आणि पहाटे ४ वाजता उठायचे.
४. पोप यांनी घटस्फोटित कॅथोलिकांना पुनर्विवाह करणाऱ्यांना धार्मिक मान्यता दिली.
५. पोप स्वतःचे जेवण स्वतः बनवत आणि एका लहान अपार्टमेंटमध्ये राहत.
६. पोप ८८ वर्षांचे होते आणि त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता.
७. पोप यांना फक्त एकच फुफ्फुस होते.
८. कॅथोलिक न्यूज सर्व्हिसनुसार, त्यांनी अध्यात्म आणि ध्यान यावर पुस्तके लिहिली.
९. २०१३ मध्ये टाइम मासिकाने पोप फ्रान्सिस यांना ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून घोषीत केले.
१०. पोप फ्रान्सिस साधे जीवन जगण्यासाठी ओळखले जात होते.