हंताव्हायरसच्या भीतीनंतर आता नोरोव्हायरसचा उद्रेक; लक्झरी क्रूझ शिपवरील 115 जण बाधित

एका आलिशान क्रूझ शिपवर नोरोव्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने 100 हुन अधिक प्रवासी आजारी पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Untitled Design 11

Untitled Design 11

After the Hantavirus scare, now there is an outbreak of Norovirus : जगभरात हंता व्हायरसच्या भीतीची चर्चा सुरू असतानाच आता आणखी एका संसर्गजन्य विषाणूने चिंता वाढवली आहे. कॅरेबियन प्रिन्सेस नावाच्या एका आलिशान क्रूझ शिपवर नोरोव्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने 100 हुन अधिक प्रवासी आजारी पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेची आरोग्य संस्था सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अर्थात CDC ने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. सीडीसीच्या अहवालानुसार, जहाजावरील 102 प्रवासी आणि 13 कर्मचारी अशा एकूण 115 जणांमध्ये संसर्गाची लक्षणे आढळून आली आहेत. या सर्वांना मुख्यतः उलट्या, जुलाब, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास होत असून ही लक्षणे नोरोव्हायरसची प्रमुख लक्षणे मानली जातात.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या एका क्रूझ शिपवर हंताव्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने तिघांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर समुद्री प्रवास करणाऱ्या पर्यटकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण होते. अशातच आता नोरोव्हायरसच्या उद्रेकामुळे चिंता आणखी वाढली आहे. हे जहाज 28 एप्रिल रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा येथून 13 दिवसांच्या समुद्री प्रवासासाठी रवाना झाले होते. या क्रूझमध्ये तब्बल 3 हजार 116 प्रवासी आणि 1 हजार कर्मचारी सहभागी होते. बहामास, अरुबा आणि प्यूट्रो रिको यांसारख्या पर्यटनस्थळांवरून प्रवास सुरू असताना 7 मेपर्यंत आजारी पडणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली.

बंगळुरूत PM मोदींच्या सुरक्षेला धक्का? आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रमस्थळापासून अवघ्या 3 किमीवर स्फोटके आढळल्याने अलर्ट

सीडीसीच्या नियमांनुसार, जहाजावरील एकूण लोकसंख्येच्या 3 टक्क्यांहून अधिक लोक आजारी पडल्यास त्याची माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक असते. त्यानुसार क्रूझ प्रशासनाने तात्काळ आरोग्य संस्थेला याची माहिती दिली. दरम्यान प्रिन्सेस क्रूझ कंपनीने या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना हा संसर्ग सौम्य स्वरूपाचा असल्याचा दावा केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सर्व प्रवासी एकाच वेळी आजारी पडलेले नाहीत आणि अनेक जण उपचारानंतर पूर्णपणे बरे देखील झाले आहेत. तसेच जहाजावर स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि सॅनिटायझेशनची प्रक्रिया अधिक काटेकोरपणे राबवली जात असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

11 मे रोजी हे जहाज पोर्ट कॅनावेरल येथे पोहोचल्यानंतर त्याचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जहाजावरील काही प्रवाशांनी देखील सध्याची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले असून, क्रूझ कर्मचाऱ्यांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. नोरोव्हायरस हा अत्यंत संसर्गजन्य विषाणू मानला जातो. तो मुख्यतः पोट आणि आतड्यांवर परिणाम करतो. दूषित अन्न किंवा पाणी, अस्वच्छ पृष्ठभाग तसेच संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून हा विषाणू वेगाने पसरतो.

विशेषतः क्रूझ शिप, हॉटेल्स किंवा इतर बंदिस्त ठिकाणी याचा संसर्ग झपाट्याने वाढू शकतो. या विषाणूची प्रमुख लक्षणे म्म्हणजे उलट्या, जुलाब, पोटदुखी, मळमळ, हलका ताप आणि अंगदुखी. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचे आणि लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version