America’s direct claim to the Moon : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा त्यांच्या नव्या दाव्यामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी थेट चंद्रावर अमेरिकेचा दावा सांगणारी पोस्ट केली आहे. ट्रुथ सोशलवर चंद्राचे जवळून दृश्य आणि त्यामागे पृथ्वी दिसणारे छायाचित्र शेअर करत ट्रम्प यांनी अमेरिकेच्या ध्वजासह ‘चंद्र आपला आहे’ असे कॅप्शन दिले. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
याचदरम्यान ट्रम्प यांनी अमेरिकेच्या स्पेस फोर्सच्या नव्या सर्व्हिस ड्रेस युनिफॉर्मचे डिझाइनही सादर केले. राखाडी आणि काळ्या रंगसंगतीतील या गणवेशात गडद राखाडी कॉलर असलेले जॅकेट आणि पॅन्ट, काळा पट्टा, बूट आणि त्याला साजेशी टोपी दिसते. पोस्टमध्ये हा गणवेश ‘स्टारशिप ट्रूपर’च्या शिस्त आणि कार्यक्षमतेपासून प्रेरित असल्याचे सांगण्यात आले असून, ‘अवकाश क्षेत्राच्या रक्षकांसाठी’ त्याचे आधुनिक स्वरूप तयार केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ट्रम्प यांच्या पोस्टनंतर X वर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. काही वापरकर्त्यांनी या गणवेशाची तुलना साय-फाय चित्रपटांमधील पात्रांच्या वेशभूषेशी केली, तर काहींनी त्याच्या डिझाइनवरून उपरोधिक प्रतिक्रिया दिल्या. एका वापरकर्त्याने अमेरिका ग्रीनलँड किंवा आइसलँड मिळवू शकली नाही, त्यामुळे आता चंद्राकडे वळली आहे, अशी खोचक टिप्पणी केली. दुसऱ्या वापरकर्त्याने हा गणवेश ‘स्टार ट्रेक’ आणि नाझी वेशभूषेपासून प्रेरित एआय डिझाइनसारखा दिसत असल्याचे म्हटले. काही वापरकर्त्यांनी या पोस्टचा संबंध एपस्टाईन फाईल्सवरील चर्चेपासून लक्ष विचलित करण्याच्या प्रयत्नाशीही जोडला.
मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द
दरम्यान, ट्रम्प यांच्याशी संबंधित आणखी एका पोस्टने सोशल मीडियाचे लक्ष वेधले. व्हाईट हाऊसने ट्रम्प यांचा ‘ग्रीन लँटर्न’पासून प्रेरित एआय-निर्मित व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्या हातातील पॉवर रिंगमधून हिरवा प्रकाश बाहेर पडताना दाखवण्यात आला आहे. डीसी कॉमिक्समधील काल्पनिक ‘ग्रीन लँटर्न कॉर्प्स’च्या संकल्पनेवर आधारित या व्हिडिओसोबत सुपरहिरोच्या प्रसिद्ध शपथेचा संदर्भ देणारे कॅप्शनही पोस्ट करण्यात आले.
एआय व्हिडिओमध्ये ट्रम्प चमकणारी हिरवी रिंग हातात घेऊन तिच्या शक्तीचा वापर स्थलांतर रोखण्यासाठी करताना दाखवण्यात आले आहे. तसेच एका खडकाळ टेकडीवर उभे राहून ‘अमेरिकन मॅन्युफॅक्चरिंग’ असे लेबल असलेल्या औद्योगिक परिसरावर हिरवा प्रकाश टाकतानाही ते दिसतात. या व्हिडिओवरही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या. काही वापरकर्त्यांनी अमेरिकन सरकारच्या अधिकृत खात्यावर अशा प्रकारचा एआय व्हिडिओ प्रसिद्ध झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले, तर काहींनी या संपूर्ण प्रकाराची खिल्ली उडवली.
चंद्राबाबतची पोस्ट, स्पेस फोर्सच्या नव्या गणवेशाचे डिझाइन आणि ‘ग्रीन लँटर्न’ एआय व्हिडिओ अशा एकामागोमाग आलेल्या पोस्टमुळे ट्रम्प आणि व्हाईट हाऊसची सोशल मीडिया रणनीती पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
