मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द
मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या विशाखा राऊत यांना मोठा राजकीय धक्का बसला असून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे.
Vishakha Raut’s corporator membership cancelled : मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या विशाखा राऊत यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांचे मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिसूचना राज्याच्या नगरविकास विभागाने जारी केली असून, सोमवारी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या महासभेत त्यांच्या नगरसेवकपदाच्या अपात्रतेची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. मुंबई महापालिकेतील अनुभवी नगरसेविका आणि माजी महापौर म्हणून राऊत यांची ओळख असल्याने हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. या निर्णयानंतर त्यांच्या नगरसेवकपदावर अपात्रतेची टांगती तलवार होती. समितीच्या निर्णयाच्या आधारे मुंबई महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारशी पत्रव्यवहार करून राऊत यांच्याविरोधात अपात्रतेची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती. या प्रक्रियेला राऊत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द होणार हे जवळपास निश्चित झाले होते. आता नगरविकास विभागाने अधिकृत अधिसूचना जारी केल्याने त्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत सोमवारी राऊत यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेच्या चिटणीस विभागाकडून आवश्यक तयारी करण्यात आल्याचे समजते. यापूर्वी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे मुंबई महापालिकेतील चार नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. राऊत यांच्या अपात्रतेची घोषणा झाल्यानंतर ही संख्या पाचवर पोहोचली आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला मोठ यश! आंदोलनात बलिदान दिलेल्या वारसांबाबात सरकारचा मोठा निर्णय
विशाखा राऊत या दादरमधील प्रभाग क्रमांक 191 मधून निवडून आल्या होत्या. सिद्धिविनायक मंदिर, शिवाजी पार्क आणि दादर पश्चिम या महत्त्वाच्या परिसरांचा या प्रभागात समावेश होतो. 2026 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी नागरिकांच्या मागासवर्गासाठी राखीव असलेल्या या प्रभागातून विजय मिळवला होता. मात्र, जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 मधील कलम 16 नुसार त्यांना नगरसेवकपदासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार विशाखा राऊत यांना 20 ऑगस्ट 2026 पासून सहा वर्षांसाठी नगरसेवक म्हणून निवडून येण्यास तसेच नगरसेवक म्हणून पदावर राहण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यांच्या अपात्रतेमुळे संबंधित जागा रिक्त झाल्याचेही राजपत्रात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी एमआयएमचे रोशन शेख व शमीर पटेल, ठाकरे गटाचे दीपक सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुशरा मलिक यांचे नगरसेवकपद जात प्रमाणपत्राच्या कारणावरून रद्द झाले आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीच्या चार नगरसेवकांचे पद रद्द करताना नगरविकास विभागाने स्वतंत्र अधिसूचना जारी केली नव्हती. मात्र, विशाखा राऊत यांच्या प्रकरणात स्वतंत्र अधिसूचना जारी करण्यात आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. माजी महापौर आणि ठाकरे गटातील ज्येष्ठ नेत्या असलेल्या राऊत यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने मुंबईतील राजकीय समीकरणांवरही या निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.