मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला मोठ यश! आंदोलनात बलिदान दिलेल्या वारसांबाबात सरकारचा मोठा निर्णय

कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांना ओबीसी जात प्रमाणपत्र मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 07T144332.916

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बलिदान (Jarange) दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संबंधित कुटुंबातील एका सदस्याला MIDC मध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या धोरणात्मक निर्णयानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मृत आंदोलकांच्या वारसांची प्राथमिक पडताळणी करण्यात आली असून, पात्र ठरलेल्या वारसांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. बीड जिल्हा प्रशासनाने संबंधित कागदपत्रांची छाननी पूर्ण करून नियुक्तीसाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

दरम्यान, कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांना ओबीसी जात प्रमाणपत्र मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 10वा दिवस असून अन्न आणि पाण्याचा त्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर कुणबी प्रमाणपत्राच्या प्रश्नावर मराठा उपसमितीची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीला मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड उपस्थित आहेत.

मराठवाड्यातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला गती देण्याबाबत बैठकीत चर्चा केली जात आहे. मराठवाड्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले आहेत. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेबाबत सरकारकडून कोणते निर्णय घेतले जातात, याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्याच्या विविध भागांतून पाठिंबा मिळत आहे. लातूर जिल्ह्यातील बोरगाव काळे येथे मराठा आंदोलकांनी लातूर-बार्शी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. याच ठिकाणी एका आंदोलकाचे उपोषणही सुरू असून त्याचा आज 4था दिवस आहे. रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.

follow us