‘गरीब की बीबी सबकी भाभी’ वक्तव्यावरून गदारोळ; महापौरांच्या मध्यस्थीनंतरही वाद न शमल्याने ठाकरे गट सभागृहाबाहेर!

महापालिकेच्या मूळ आणि वाढीव हद्दीच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्याला प्रसिद्धी देण्याच्या विषयावर सभागृहात राजकीय वातावरण तापले.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 22T164953.473

Uproar in Jalgaon Municipal Corporation’s special general meeting : जळगाव महापालिकेच्या विशेष महासभेत विकास आराखड्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेली चर्चा चांगलीच वादळी ठरली. महापालिकेच्या मूळ आणि वाढीव हद्दीच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्याला प्रसिद्धी देण्याच्या विषयावर चर्चा सुरू असतानाच सभागृहात राजकीय वातावरण तापले. शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजप आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.

इब्राहिम पटेल यांनी गरीब कि बीवी सबकी भाभी असे वक्तव्य केल्याने भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. यानंतर भाजपचे नगरसेवक विजय बांदल, इब्राहिम पटेल आणि शरद तायडे यांच्यात वादाची ठिणगी पडली. दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने सभागृहातील वातावरण तणावपूर्ण बनले. काही काळ एकमेकांवर आरोप करत नगरसेवकांनी सभागृह दणाणून सोडले.

परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच महापौर आणि उपमहापौरांनी मध्यस्थी करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी सभागृहात विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप केला. आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नसेल, तर महासभेत उपस्थित राहण्याचा उपयोग काय, असा सवाल इब्राहिम पटेल यांनी उपस्थित केला. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र झाला.

सचिन पिळगांवकर यांना मानद डॉक्टरेट पदवी, ITM विद्यापीठाकडून सहा दशकांच्या कारकिर्दीचा गौरव

अखेर या संपूर्ण प्रकारामुळे संतप्त झालेल्या इब्राहिम पटेल यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत त्यांनी महासभेवर बहिष्कार टाकत सभात्याग केला. त्यामुळे विकास आराखड्याच्या महत्वाच्या विषयावर चर्चा होण्याऐवजी राजकीय वादानेच महासभा गाजली.

महासभेतील वाद संपल्यानंतरही भाजप आणि ठाकरे गटातील संघर्ष थांबला नाही. सभागृहातून बाहेर पडल्यानंतर महापालिका कार्यालयात पुन्हा दोन्ही गटांच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. भाजपचे नगरसेवक विजय बांदल आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार वादावादी झाल्याने कार्यालयातील वातावरणही तापले. त्यामुळे महापालिकेच्या आवारात काही काळ राजकीय तणावाचे चित्र पाहायला मिळाले.

एकीकडे शहराच्या नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यावर चर्चा अपेक्षित असताना दुसरीकडे नगरसेवकांमधील वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय संघर्षामुळे महासभा चर्चेचा विषय ठरली. आता या प्रकरणावर महापालिका प्रशासन आणि दोन्ही राजकीय गटांकडून पुढे काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

follow us