Austraila Bans Deepseek : चीनच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्राम डीपसीकच्या अडचणी सातत्याने वाढत चालल्या आहेत. OpenAIसारख्या कंपनीला टक्कर देत जगभरात लोकप्रिय झालेला हा चीनी अविष्कार अनेक देशांना धोकादायक वाटू लागला आहे. आता ऑस्ट्रेलियानेही डीपसीकवर (Deepseek) बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षा कारणांचा हवाला देत ही बंदी घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने (Australia) मंगळवारी या निर्णयाची घोषणा केली. चीनच्या या एआय कंपनीचा राष्ट्रीय सुरक्षेला धोका होण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आले.
भारत स्वतःचं AI Model तयार करणार.. यावर्षीच लॉन्च होणार; केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा
ऑस्ट्रेलियाच्या गृह विभागाच्या सचिवांनी सरकारी संस्थांना निर्देश जारी केले आहेत. डीपसीकच्या कोणत्याही प्रॉडक्ट, अॅप्लिकेशन किंवा वेब सेवेचा वापर तत्काळ बंद करा. जर आधीचे इन्स्टॉल केले असतील तर डिलिट करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गृह विभागाचे मंत्री टोनी बर्के यांनी सांगितले की डीपसीक सरकारी तंत्रासाठी अस्वीकार्य जोखीम निर्माण करू शकते.
देशाची राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय हिताचा विचार करून डीपसीकवर बंदी घालण्यात आल्याचे बर्के यांनी सांगितले. सध्या हा नियम सरकारी कार्यालयांत लागू होणार आहे. देशातील नागरिकांसाठी मात्र कोणतीही बंदी नाही. नागरीक त्यांचे मोबाइल, लॅपटॉपवर डीपसीकचा वापर सहजतेने करू शकतात. ऑस्ट्रेलियन सरकारने फक्त सरकारी उपकरणांपुरतीच ही बंदी घातल्याचे स्पष्ट झाले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या आधी इटलीनेही डीपसीकवर बंदी घातली आहे. तैवाननेही सरकारी विभागांत डीपसीकच्या वापरावर बंदी घातली आहे. युरोप आणि अन्य देशांमध्ये डीपसीकच्य सुरक्षा संबंधींच्या धोक्यांवर बारकाईने तपास केला जात आहे. तसेच येथील काही सरकारे DeepSeek वर बंदी घालण्याची तयारी करत आहेत. ऑस्ट्रेलियाने दोन वर्षांपूर्वी चीनी सोशल मिडिया अॅप TikTok वर बंदी घातली होती. टीकटॉकही राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे कारण त्यावेळी देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया सरकारने डीपसीकवर बंदी घालत राष्ट्रीय सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
अब्जाधीशांना दणका! एकाच झटक्यात 9.34 लाख कोटी बुडाले; चीनचं कनेक्शन काय?