Download App

वाद चिघळला! Canada कडून ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी; भारतातील असुरक्षित राज्यांचा केला उल्लेख

Canada : जी 20 परिषदेतून कॅनडात (Canada) परतलेल्या पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी भारताविरोधात कारवायांचे सत्र सुरुच ठेवले आहे. खलिस्तानी अतिरेक्याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर त्यांच्या सरकारने पुन्हा एकदा भारताला डिवचले आहे. जस्टीन ट्रुडो सरकारने आपल्या नागरिकांसाठी ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. भारतातील जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) या राज्यात प्रवास टाळण्याचा सल्ला या अ‍ॅडव्हाजरीत देण्यात आला आहे.

सुरक्षेच्या कारणांमुळे कॅनडाच्या नागरिकांनी जम्मू आणि काश्मीरचा प्रवास करू नये. आ भागात दहशतवाद, अशांतता आणि अपहरणाचा धोका आहे, असे या अ‍ॅडव्हायजरीत म्हटले आहे. मात्र यामध्ये केंद्रशासित प्रदेश लद्दाखचा उल्लेख केलेला नाही. कॅनडाच्या नागरिकांनी इशान्य भारतातील मणिपूर, आसाम या राज्यांतही जाऊ नये असे कॅनडा सरकारने म्हटले आहे. या अ‍ॅडव्हाजरीने भारत सरकार संतप्त होणार हे निश्चित आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानच्या हद्दीला लागून असलेल्या राज्यांतही प्रवास टाळावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यांचा समावेश आगे. पाकिस्तानच्या सीमेपासून 10 किलोमीटर परिसरात जाऊ नये असे या अॅडव्हाजयरीत कॅनडा सरकारने म्हटले आहे.

खलिस्तानी अतिरेक्याच्या हत्येमागे भारत

कॅनडाच्या (Canada) नागरिकाच्या स्वतःच्या भूमीवर झालेल्या हत्येमध्ये अन्य कोणत्याही देशाचा किंवा परदेशी सरकारचा सहभाग खपवून घेतला जाणार नाही. हे आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. गेल्या काही आठवड्यांपासून कॅनडाच्या सुरक्षा एजन्सी कॅनडाचे नागरिक हरदीप सिंग निज्जर आणि भारत सरकार यांच्यातील संबंधांची चौकशी करत आहेत. जी 20 शिखर परिषदेतही कॅनडाने भारत सरकारच्या उच्च गुप्तचर अधिकाऱ्यांकडे चिंता व्यक्त केली होती. पंतप्रधान मोदी यांनी देखील कॅनडातील अतिरेकी घटकांकडून केल्या जात असलेल्या भारतविरोधी कारवायांबद्दल चिंता व्यक्त केली होती, असे ट्रुडो म्हणाले. खलिस्तानी अतिरेकी निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप ट्रुडो यांनी केला होता.

Canada : खलिस्तानी अतिरेक्याच्या हत्येत भारताचा हात; कॅनडाच्या पंतप्रधानांच्या वक्तव्याने खळबळ !

ट्रुडो यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त भारत सरकारनेही जशास तसे उत्तर दिले होते. तसेच कॅनडाच्या राजनयिकाला देश सोडण्याच्या सूचना दिल्या. अशा परिस्थितीत दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला आहे. कॅनडा सरकारने ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी करत या वादात आणखी तेल ओतण्याचे काम केले आहे. या वादावर आता भारत सरकारकडून काय प्रतिक्रिया येणार, कॅनडा सरकारने ज्या पद्धतीने डिवचण्याचे प्रकार सुरू केले आहेत तसेच उत्तर पुन्हा भारत सरकार देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us