Download App

Canada : खलिस्तानी अतिरेक्याच्या हत्येत भारताचा हात; कॅनडाच्या पंतप्रधानांच्या वक्तव्याने खळबळ !

Canada : जी 20 परिषदेसाठी नुकतेच भारतात येऊन गेलेले कॅनडाचे (Canada) पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी मायदेशात जाताच आपला भारतविरोधी अजेंडा उघड केला आहे. त्यांनी खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येबाबत धक्कादायक वक्तव्य केल्याने भारताचा संताप झाला आहे. ओटावा येथील हाऊस ऑफ कॉमन्सला संबोधित करताना ट्रुडो म्हणाले,की कॅनडाच्या सुरक्षा एजन्सी भारत सरकार आणि कॅनेडियन नागरिक हरदिप सिंग निज्जर यांच्या हत्येतील संभाव्य संबंधांच्या आरोपांची चौकशी करत आहे. दरम्यान, 18 जून रोजी कॅनडात निज्जर याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

कॅनडाच्या (Canada) नागरिकाच्या स्वतःच्या भूमीवर झालेल्या हत्येमध्ये अन्य कोणत्याही देशाचा किंवा परदेशी सरकारचा सहभाग खपवून घेतला जाणार नाही. हे आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. गेल्या काही आठवड्यांपासून कॅनडाच्या सुरक्षा एजन्सी कॅनडाचे नागरिक हरदीप सिंग निज्जर आणि भारत सरकार यांच्यातील संबंधांची चौकशी करत आहेत. जी 20 शिखर परिषदेतही कॅनडाने भारत सरकारच्या उच्च गुप्तचर अधिकाऱ्यांकडे चिंता व्यक्त केली होती. पंतप्रधान मोदी यांनी देखील कॅनडातील अतिरेकी घटकांकडून केल्या जात असलेल्या भारतविरोधी कारवायांबद्दल चिंता व्यक्त केली होती, असे ट्रुडो म्हणाले. खलिस्तानी अतिरेकी निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप ट्रुडो यांनी केला. तसेच भारताच्या राजनयिकाची कॅनडातून हकालपट्टी केल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणा तपास करत असल्याचे ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत सांगितले.

 

भारतानेही दिले सणसणीत प्रत्युत्तर

यानंतर पंतप्रधान कार्यालयानेही उत्तर दिले. अतिरेकी शक्तींचा संघटीत गुन्हेगारी आणि मानवी तस्करीशी संबंध हा देखील कॅनडासाठी चिंतेचा विषय असला पाहिजे. कॅनडात भारतीय समुदाय आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य केले जात आहे, असे पीएमओने (PMO) म्हटले आहे. यानंतर भारत सरकारच्या विदेश मंत्रालयानेही निवेदन जारी केले. कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. कॅनडातील हिंसाचाराच्या कोणत्याही कृत्यात भारत सरकार असल्याचे आरोप खोडसाळ असून यात काहीच तथ्य नाही. आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत मजबूत प्रतिबद्धता आणि लोकतांत्रिक पद्धतीने राजकारण करणारे आहोत, असे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या 18 जून रोजी खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. निज्जर कॅनडातील सिख फॉर जस्टीस (SFJ) आणि खलिस्तानी टायगर फोर्स (KTF) संघटनांचा प्रमुख होता. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी खलिस्तानी दहशतवादी निज्जरवर दहा लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.

Tags

follow us