Donald Trump’s open threat : मध्य पूर्वेतील युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा महत्त्वाचा मित्रदेश असलेल्या ओमानला थेट लष्करी कारवाईची धमकी दिल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली राहील. ती आंतरराष्ट्रीय जलमार्ग आहे. ओमानने इतर देशांप्रमाणेच वागले पाहिजे, अन्यथा आम्हाला त्यांना उडवून द्यावे लागेल, असे वादग्रस्त विधान केले.
ट्रम्प यांच्या या वक्तव्यामागे इराण आणि ओमान यांच्यात होर्मुझ सामुद्रधुनीवरील जहाज वाहतुकीसंदर्भात सुरू असलेल्या चर्चांचा संदर्भ असल्याचे मानले जात आहे. इराणी सरकारी माध्यमांनी असा दावा केला होता की, संभाव्य करारानुसार इराण आणि ओमान मिळून या सामुद्रधुनीतील जहाज वाहतूक व्यवस्थापन करू शकतात आणि जहाजांकडून शुल्क आकारणीची व्यवस्था लागू केली जाऊ शकते. मात्र ट्रम्प यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत कोणत्याही एका देशाला या सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवू दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले.
होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक मानली जाते. जगातील जवळपास 20 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गाने होते. त्यामुळे येथे निर्माण झालेला कोणताही संघर्ष जागतिक अर्थव्यवस्था आणि इंधन दरांवर थेट परिणाम करतो. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे या भागातील व्यापारी जहाज वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.
शांतता चर्चेदरम्यान अमेरिकेचा इराणवर हल्ला, होर्मुझ परिसरातील लष्करी ठिकाणे केली उद्ध्वस्त
दरम्यान, अमेरिकेने इराणविरोधात नव्या लष्करी कारवायाही केल्या आहेत. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने इराणमधील ड्रोन नियंत्रण केंद्रांवर हल्ले केले असून होर्मुझ परिसरात उड्डाण करणारे अनेक इराणी ड्रोन पाडण्यात आले आहेत. अमेरिकेने या कारवायांना संरक्षणात्मक उपाय असे म्हटले असले तरी इराणने त्याला युद्धविरामाचे उल्लंघन असल्याचा आरोप केला आहे.
ओमान हा अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करणारा महत्त्वाचा देश मानला जातो. याआधी अनेक अणुकरार चर्चांमध्ये ओमानने मध्यस्थाची भूमिका बजावली होती. त्यामुळे ट्रम्प यांनी अशा मित्रदेशालाच उघड धमकी दिल्याने जागतिक स्तरावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनेक आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढू शकतो.
याचदरम्यान ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत बोलताना चुकून इराणऐवजी व्हेनेझुएलाचा उल्लेख केल्याचाही दावा काही माध्यमांनी केला आहे. त्यांनी त्या देशाकडे आता नौदल किंवा हवाई दल उरलेले नाही, असे वक्तव्य केले, जे इराणसंदर्भातील पूर्वीच्या त्यांच्या भाषणांशी साधर्म्य दर्शवते. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी आणि होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा पूर्णपणे खुली करण्यासाठी चर्चा सुरू असल्या तरी त्यात अजूनही कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी करार जवळ आल्याचा दावा केला होता, मात्र प्रत्यक्षात दोन्ही देशांतील मतभेद कायम असल्याचे चित्र आहे.
