Flydubai घटनेनंतर ‘कॉकपिट बॅकअप’ चर्चेत; दोन्ही पायलट जखमी झाले तर, विमान कोण उडवतं?

Flydubai Flight Hijack विमान हवेत असताना दोन्ही पायलट अचानक जखमी झाले किंवा विमान उडवण्याच्या स्थितीत राहिले नाहीत, तर पुढे काय होतं?

FlyDubai

FlyDubai

Flydubai Flight Hijack Update : विमान हवेत असताना दोन्ही पायलट अचानक जखमी झाले किंवा विमान उडवण्याच्या स्थितीत राहिले नाहीत, तर पुढे काय होतं? Flydubai च्या FZ1073 विमानातील घटनेनंतर हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. या घटनेत कॉकपिटमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही पायलट जखमी झाले आणि विमानाला सौदी अरेबियातील तबूक येथे आपत्कालीन लँडिंग करावी लागली. उपलब्ध माहितीनुसार, त्याच विमानातून प्रवास करणाऱ्या Flydubai च्या ऑन-ड्युटी/रिलीफ क्रू सदस्यांनी विमानाचा ताबा घेत सुरक्षित लँडिंग केले. मात्र, या घटनेतील नेमक्या घटनाक्रमाबाबत अधिकृत तपास सुरू आहे. पण प्रश्न आहे की, असं पुन्हा झालं तर, विमान कोण उडवणार? विमानात पायलट नसेल तर काय होतं? याबद्दस सोप्य भाषेत समजून घेऊया…

Flydubai Flight : हल्ला करणाऱ्या वैमानिकाचा गळा दाबला, बाहेर ओढलं…इस्रायली नागरिकाने थरार सांगितला

कॉकपिटमधला पायलटच एकमेव ‘बॅकअप’ नसतो…

प्रवासी विमानात दोन पायलट असतात एक Captain आणि दुसरा First Officer. दोघांपैकी एक पायलट अचानक आजारी पडला, जखमी झाला किंवा काम करण्याच्या स्थितीत राहिला नाही, तर दुसरा पायलट विमानाचं नियंत्रण घेऊ शकतो. यासाठीच दोन्ही पायलट एकमेकांच्या कामाची माहिती आणि विमानाच्या प्रणाली हाताळण्याचं प्रशिक्षण घेतात. विमानातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पायलट्सना ठराविक प्रक्रिया आणि चेकलिस्टचं प्रशिक्षण दिलं जातं. FAA देखील सांगते की, आपत्कालीन परिस्थितीत फ्लाइट क्रू चेकलिस्ट, प्रशिक्षण आणि ATC च्या मदतीचा वापर करतो. पण दोन्ही पायलटच एकाच वेळी काम करण्याच्या स्थितीत नसतील, तर परिस्थिती अधिक गंभीर होते. Flydubaiच्या या घटनेत हाच भाग सर्वाधिक महत्त्वाचा ठरला.

प्रकाशित वृत्तांनुसार, विमानात Flydubai चे आणखी दोन क्रू सदस्य होते, जे त्या फ्लाइटवर ऑन-ड्युटी/रिलीफ क्रू म्हणून प्रवास करत होते. परिस्थिती बिघडल्यानंतर त्यांनी कॉकपिटचा ताबा घेऊन विमान तबूक विमानतळावर उतरवलं. म्हणजेच, या प्रकरणात विमानातील प्रवाशांमध्येच प्रशिक्षित एव्हिएशन क्रू उपलब्ध होता. यामुळे एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो तो म्हणजे, विमानात ‘योग्य प्रशिक्षण असलेली व्यक्ती’ उपलब्ध असेल तर ती आपत्कालीन परिस्थितीत मोठी भूमिका बजावू शकते. पण, प्रत्येक फ्लाइटमध्ये अतिरिक्त पायलट असतीलच, असं नाही.

Hijack SOS : कॉकपिटमध्ये वैमानिक भिडले अन्… Flydubai विमानातील थराराची स्टोरी

Cabin Crew विमान उडवू शकतात का?

हा सर्वसामान्यांचा मोठा गैरसमज आहे. केबिन क्रू म्हणजे पायलट नाहीत. त्यांचं विमान उडवण्याचं प्रशिक्षण पायलटइतकं नसतं. त्यामुळे दोन्ही पायलट अक्षम झाले तर, एअर होस्टेस किंवा फ्लाइट अटेंडंट सहजपणे कॉकपिटमध्ये जाऊन Boeing 737 किंवा Airbus A320 उडवेल, असं समजणं चुकीचं आहे. मात्र, केबिन क्रू ला Pilot Incapacitationसारख्या आपत्कालीन परिस्थितीत काय करायचं, याचं प्रशिक्षण असतं. EASA च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये Incapacitated Pilot ला सुरक्षित ठेवणे, आवश्यक प्रथमोपचार करणे आणि उर्वरित Operating pilot ला मदत करणे यांचा समावेश आहे. म्हणजे केबिन क्रू ची भूमिका ‘विमान उडवणं’ नसून परिस्थिती नियंत्रणात ठेवणं, पायलटला मदत करणं आणि आवश्यक असल्यास कॉकपिट व केबिनमधील समन्वय साधणं ही असते.

विमानात पायलटच नसेल तर?

वरील सर्व प्रश्नांची माहिती घेतल्यानंतर आणखी एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, विमानात पायलटच नसेल तर? अशा परिस्थितीत ATC म्हणजे Air Traffic Control महत्त्वाची ठरते. विमानातील कोणताही प्रशिक्षित पायलट उपलब्ध नसेल, तर ATC कडून विमानाला रेडिओवर मार्गदर्शन मिळू शकतं. FAA च्या माहितीनुसार, एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स आपत्कालीन परिस्थितीत पायलटच्या विनंतीनुसार सुरक्षित आणि शक्य तितका योग्य मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी मदत करतात. अगदी प्रशिक्षित पायलट नसलेल्या व्यक्तीला लहान विमान उतरवण्यासाठी ATC ने रेडिओवरून मार्गदर्शन केल्याची वास्तविक उदाहरणंही आहेत. FAA ने 2022 मध्ये अशाच एका घटनेचा उल्लेख केला आहे. परंतु,  मोठं प्रवासी विमान आणि छोटं विमान यात मोठा फरक आहे. मोठं जेट विमान उतरवण्यासाठी विमानाची प्रणाली, वेग, उंची, फ्लॅप्स, लँडिंग गिअर, रनवे, हवामान आणि इतर अनेक बाबी हाताळाव्या लागतात. त्यामुळे ATC पायलटला फोनवरून विमान उतरवून देईल असं सरळ समीकरण नाही.

Autopilot आहे ना… मग पायलटची गरज काय?

आता तुमच्या मनात आलं असेल की, वरील सर्व गोष्टींचा आणि परिस्थिती बघितली तर, ऑटोपायलट ऑप्शन आहे ना. पण, हा देखील आणखी एक मोठा गैरसमज आहे. आधुनिक प्रवासी विमानांमध्ये अत्याधुनिक Autopilot आणि Flight Management Systems असतात. त्यामुळे विमान ठराविक मार्गावर, उंचीवर आणि वेगावर राहण्यास मदत होते. पण Autopilot म्हणजे ‘विमान स्वतःहून कोणत्याही परिस्थितीत उड्डाण आणि लँडिंग करणारा रोबोट पायलट’ नाही.

पायलटला विमानाच्या प्रणालींचं निरीक्षण करावं लागतं, परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात आणि आवश्यक तेव्हा ऑटोमेशन बदलावे किंवा बंद करावे लागते. EASA च्या कागदपत्रातही आधुनिक विमानांमध्ये ऑटोपायलट असला तरी, त्याचं निरीक्षण आणि योग्य व्यवस्थापन करण्यासाठी पायलटची भूमिका महत्त्वाची असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Flydubai मध्ये नेमकं काय झालं?

FZ1073 हे विमान दुबईहून तेल अवीवकडे जात होतं. प्रवासादरम्यान कॉकपिटमध्ये गंभीर घटना घडली. विमान मोठ्या प्रमाणात खाली आले आणि आपत्कालीन मेसेज प्रसारित झाले. त्यानंतर विमानाने मार्ग बदलून सौदी अरेबियातील तबूक येथे सुरक्षित लँडिंग केले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कॉकपिटमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रवासी आणि क्रूने हस्तक्षेप केला आणि त्यानंतर विमानातील रिझर्व्ह/ऑन-ड्युटी Flydubai क्रूने विमान सुरक्षितपणे तबूक येथे उतरवलं. या घटनेतील हल्ल्याचं नेमकं स्वरूप, कारण आणि संपूर्ण घटनाक्रमाबाबत तपास सुरू असल्याने अंतिम निष्कर्ष म्हणून कोणताही एक घटनाक्रम मांडणं सध्या योग्य ठरणार नाही. Flydubai नेही तपास पूर्ण होण्यापूर्वी निष्कर्ष काढण्यापासून सावध राहण्याचं म्हटलं आहे.

थोडक्यात काय तर, विमानाचा ‘कॉकपिट बॅकअप’ कसा काम करतो? तर, एक पायलट जखमी झाला तर, दुसरा पायलट नियंत्रण घेतो. दोन्ही पायलट अक्षम झाल्यास विमानातील प्रशिक्षित अतिरिक्त क्रू असल्यास त्यांची मदत घेतली जाते. अतिरिक्त पायलट नसल्यास केबिन क्रू परिस्थिती हाताळते अथवा ATC शी संपर्क केला जातो. त्याशिवाय विमानातील ऑटोमेशन विमान स्थिर ठेवण्यात मदत करू शकते. ATC योग्य विमानतळ, मार्ग आणि आपत्कालीन मदत उपलब्ध करून देण्यासाठी मदत करते. म्हणजे विमानात ‘एक पायलट गेला की सगळं संपलं’ अशी व्यवस्था नसते. विमानाची रचना, प्रशिक्षित क्रू, ऑटोमेशन, ATC आणि आपत्कालीन प्रक्रिया हे सगळे मिळून बॅकअप सिस्टम तयार करतात. परंतु, Flydubai च्या घटनेने याच ‘कॉकपिट बॅकअप’ची खरी गरज किती गंभीर क्षणी निर्माण होऊ शकते, हे पुन्हा चर्चेत आणलं आहे.

Exit mobile version