US bans visas for foreign truck drivers : ट्रम्प प्रशासनाने व्यावसायिक ट्रक चालकांसाठी (Truck Drivers) सर्व प्रकारचे कामगार व्हिसा देण्यावर तात्काळ बंदी आणली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो (Marco Rubio) यांनी गुरुवारी 21 ऑगस्ट रोजी या निर्णयाची घोषणा केली. भारतातून बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश केलेल्या एका व्यक्तीमुळे जो अपघात झाला त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेत राहणारा हरजिंदर सिंग (Harjinder Singh) याच्यावर तीन लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी एक्स वर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, ‘अमेरिकन रस्त्यांवर मोठे ट्रॅक्टर-ट्रेलर, ट्रक चालवणाऱ्या परदेशी चालकांची वाढती संख्या अमेरिकन लोकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे. हे परदेशी चालक अमेरिकन ट्रक चालकांचे जीवनमान धोक्यात आणत आहेत. आम्ही व्यावसायिक ट्रक चालकांसाठी कामगार व्हिसा देणे तात्काळ प्रभावाने स्थगित करत आहोत.’
असे म्हटले जाते आहे की, फ्लोरिडातील महामार्गावर ट्रक चालवणारा भारतीय चालक हरजिंदर सिंग याने चुकीच्या ठिकाणाहून यू-टर्न घेतल्यामुळे एका कारचा अपघात झाला आणि या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर हरजिंदरवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.
अमेरिकेच्या संघीय अधिकाऱ्यांच्या मते, हरजिंदर सिंग हा भारतातील असून मेक्सिकोमार्गे बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ट्रम्प प्रशासनाने एप्रिल 2025 मध्ये पारित केलेल्या आदेशानुसार व्यावसायिक ट्रक चालकांना इंग्रजी भाषेच्या मानकांची पूर्तता करण्याच्या दीर्घकालीन आवश्यकताची अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे. ट्रम्प प्रशासनाच्या मते, हरजिंदर सिंग इंग्रजी बोलण्याच्या सूचनांचे पालन करू शकत नाहीत.
निवडणूक आयोग काम नीट करत नाही, एका ठिकाणी 140 लोकांचं मतदान; पवारांचा हल्लाबोल
ट्रम्पच्या रिपब्लिकन पक्षाने फ्लोरिडामध्ये हा मुद्दा बऱ्यापैकी उचलून धरला होता. या प्रकरणावरून अमेरिकेत राजकारण सुरू झाले आहे कारण हरजिंदर सिंग याला कॅलिफोर्नियामधून व्यावसायिक परवाना मिळाला आहे आणि तो रहायलाही तिथेच आहे. कॅलिफोर्नियावर ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी डेमोक्रॅटिक पक्षाचे नियंत्रण आहे, हा पक्ष अमेरिकन सरकारच्या इमिग्रेशनवरील कारवाईला विरोध करतो.
अमेरिकेच्या आकडेवारीनुसार, 2000 ते 2021 दरम्यान अमेरिकेत परदेशी ट्रक चालकांची संख्या दुप्पट होऊन 7,20,000 झाली आहे. अमेरिकन उद्योग समूहाच्या मते, परदेशी जन्मलेल्या ड्रायव्हर्सपैकी अर्ध्याहून अधिक ड्रायव्हर्स लॅटिन अमेरिकेतून येतात. अलिकडच्या काळात भारत, पूर्व युरोपीय देश आणि युक्रेनमधून मोठ्या संख्येने ड्रायव्हर्स आले आहेत. गेल्या काही दिवसांत भारतीय शीख समुदायातील ट्रक चालकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
लॉस एंजेलिस टाईम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात हजारो भारतीय ट्रक चालक आहेत. अमेरिकेत ड्रायव्हर्सची दीर्घकाळापासून असलेली कमतरता भरून काढण्यात या लोकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेक भारतीय ट्रक ड्रायव्हर्स केवळ वाहने चालवत नाहीत तर शाळा, व्यवसाय, रेस्टॉरंट्स देखील चालवतात.