पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान (Pakistan) यांची जेलमध्येच हत्या करण्यात आली असा दावा करण्यात येत होता, या दाव्यामुळे पाकिस्तामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर इमरान खान यांचा पक्ष असलेल्या पीटीआय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानात जोरदार आंदोलनाला सुरुवात केली, ज्या जेलमध्ये इमरान खान यांना ठेवण्यात आलं आहे.
त्या जेलबाहेर मोठ्या संख्येनं पीटीआयचे कार्यकर्ते जमा झाले, अखेर दबाव वाढल्यानं त्यावर जेल प्रशासनाकडूनच स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. इमरान खान हे सुरक्षित आहेत, तसेच त्यांना कुठेही दुसरीकडे हलवण्यात आलं नाही, असं जेल प्रशासनाने म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे आता इमरान खान यांच्या पक्षाकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. इमरान खान यांना अदियाला जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे, तिथे इमरान खान यांचा प्रचंड छळ करण्यात येत आहे.
इम्रान खान जिवंत आहेत का? मृत्यूच्या अफवांमध्ये बहिणींना मारहाण; पाकिस्तानमध्ये गोंधळ
इमरान खान यांना सर्वांपासून दूर एका कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना आपल्या कुठल्याही कुटुंबातील व्यक्तीला भेटू दिलं जात नाहीये, इमरान खान यांच्या वकिलाला देखील त्यांना भेटू दिलं जात नाही. इमरान खान यांची बहीण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भेटीचा प्रयत्न करत आहे, मात्र तिची देखील भेट झालेली नाहीये, असा आरोप पीटीआयकडून करण्यात आला आहे. दरम्यान, दुसरीकडे आता इमरान खान यांचा पक्ष असलेल्या पीटीआयचे नेते आणि कार्यकर्ते अधिक आक्रमक बनले आहेत.
खैबर पख्तूनख्वामध्ये पीटीआयची सत्ता आहे, खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल अफरीदी यांनी आता थेट इमरान खान असलेल्या जेलसमोर जाऊन धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे, त्यामुळे आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, दुसरीकडे इमरान खान यांच्या बहिणीने देखील एका वृत्तवाहिनीशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत. इमरान खान यांना जेलमध्ये काही तरी दगा फटका होऊ शकतो असं संशय त्यांच्या बहिणीने व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे मात्र इमरान खान हे जेलमध्ये सुरक्षित असल्याचा दावा पाकिस्तानच्या सरकारकडून करण्यात येत आहे.
