Download App

मोठी बातमी : तोषखाना प्रकरणात इम्रान खान दोषी, न्यायालयाकडून 3 वर्षांची शिक्षा; लाहोरमधून अटक

  • Written By: Last Updated:

Pakistan Ex PM Imran Khan Toshakhana Case : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोषखाना प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. इस्लामाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने इम्रान खानला तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने इम्रान खान यांना  एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला असून, न्यायालयाच्या शिक्षेनंतर इस्लामाबाद पोलिसांनी इम्रान खान विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. तर दुसरीकडे खान यांना त्यांच्या जमान पार्क येथील घरातून अटक करण्यात आल्याचे त्यांच्या पक्षाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

पाकिस्तानात लवकरच निवडणुका होणार आहेत. मात्र, त्याआधी तोशाखान प्रकरणात इम्रान खान दोषी आढळल्याने आता पुढील पाच वर्षे इम्रान खान निवडणूक लढवू शकणार नाही. येत्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये खान यांना त्यांचा पक्ष विजयी होईल असा विश्वास होता. परंतु, न्यायालयाच्या या निकालामुळे याचा फटका इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाला बसणार आहे. याआधीही ९ मार्च रोजी इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण पाकिस्तानात इम्रान खान यांच्या समर्थकांकडून प्रचंड हिंसाचार झाला होता.

इम्रान खानवर नेमके आरोप काय?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर 2018 ते 2022 या कालावधीत पदाचा गैरवापर करून सरकारी भेटवस्तू खरेदी-विक्रीसाठी आपल्या अधिकाराचा वापर केल्याचा आरोप आहे. या भेटवस्तू इम्रान खान यांना त्यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान मिळाल्या होत्या. या सर्व वस्तुंची किंमत 140 दशलक्ष रुपये म्हणजेच ($635,000) पेक्षा जास्त होती. यानंतर, ट्रायल कोर्टाने सुनावणी घेतल्यानंतर इम्रान खानला मालमत्ता लपवणे आणि सरकारी भेटवस्तू विकल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. मात्र, इम्रान खानच्या वकिलांनी यापूर्वीच ट्रायल कोर्टाच्या न्यायाधीशांवर पक्षपातीपणाचा आरोप केले होते. त्यानंतर आता या प्रकरणात न्यायालयाने इम्रान खान यांना दोषी ठरवल तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये पुन्हा गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags

follow us