India Canada Row : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरून कॅनडा आणि भारतातील संबंध (India Canada Row) ताणले गेले आहेत. दोन महिन्यांनंतर आता या संबंधात सुधारणा होतानाा दिसत आहे. कारण, केंद्र सरकारने नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने तब्बल दोन महिन्यांनंतर कॅनडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येत भारतीय गुप्तहेर संस्थांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केले होते. त्यानंतर दोन्ही देशांतील संबंध प्रचंड ताणले गेले होते.
भारत सरकारने दोन महिन्यांपूर्वी कॅनडाच्या (Canada) नागरिकांसाठीची व्हिसा सेवा बंद केली होती. कॅनडा सरकारने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र तरीदेखील भारत सरकारने हा निर्णय कायम ठेवला होता. आता मात्र दोन्ही देशांतील संबंंध हळूहळू पूर्ववत होताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारत सरकारने ई व्हिसा सेवा पुन्हा सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. फ्री प्रेस जर्नलने या संदर्भात वृत्त दिले आहे. या निर्णयामुळे आता कॅनेडियन नागरिकांना भारतीय आयुक्तालयात न जाता व्हिसासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला होता. भारताने कॅनडाचा आरोप मूर्खपणाचा आणि निराधार म्हणत फेटाळून लावला होता. निज्जरच्या हत्येचा आरोप केल्यानंतर कॅनडाने रॉच्या कॅनडातील केंद्र प्रमुखाची हकालपट्टी केली होती. त्यानंतर भारतानेही जशास तसं प्रत्युत्तर दिलं. यानंतर मात्र आता दोन्ही देशातील संबंध काही प्रमाणात सुधारताना दिसत आहेत.
India resumes e-visa services to Canadian nationals: Sources pic.twitter.com/CyMY0AIaMC
— ANI (@ANI) November 22, 2023
कोण होता हरदीप सिंग निज्जर?
निज्जर कॅनडातील सरे येथे राहत होता. ब्रिटिश कोलंबियाच्या पश्चिम कॅनेडियन प्रांतातील हे सर्वात मोठं शहर आहे. 1997 मध्ये तो पंजाबमधून कॅनडाला गेला. सुरुवातीला कॅनडामध्ये प्लंबर म्हणून काम केल्यानंतर, निज्जरने लग्न केले आणि कॅनडामध्ये स्थायिक झाले. थे त्याला दोन मुले आहेत. 2020 पासून, तो सरे येथील गुरुद्वाराचे प्रमुख होता. निज्जरचे मुळं पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील फिल्लोर तालुक्यातील भरसिंग पुरा गावातले आहेत. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपूर्वी निज्जरचे पालक या गावात आले होते, असे सांगण्यात येते.