20-year-old daughter dies along with parents : अमेरिकेतून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स राज्यातील वॉर्सेस्टर शहरात एका मोटेलला लागलेल्या भीषण आगीत भारतीय वंशाच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत आई, वडील आणि त्यांची 20 वर्षांची मुलगी यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. या घटनेने अमेरिकेतील भारतीय समुदायासह गुजरातमधील त्यांच्या मूळ गावात देखील शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये हितेशभाई सुथार, त्यांची पत्नी हीनाबेन सुथार आणि मुलगी ईशानी सुथार यांचा समावेश आहे. हे कुटुंब गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नडियाद येथील रहिवासी होते. चांगल्या भविष्याच्या आणि आर्थिक स्थैर्याच्या आशेने ते सुमारे 2 वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले होते. हितेशभाई वॉर्सेस्टर येथील इकोनो लॉज मोटेलमध्ये काम करत होते आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब मोटेलच्या आवारातच राहत होते.
रोनाल्डोचा ऐतिहासिक पेनल्टी गोल; चाळीशीनंतर विश्वचषक नॉकआऊटमध्ये गोल करणारा पहिलाच खेळाडू
रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास मोटेलमध्ये अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने मोठे रूप धारण केले आणि धुराचे लोट संपूर्ण इमारतीत पसरले. त्यावेळी सुथार कुटुंब झोपेत होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने मोटेलच्या फ्रंट डेस्कवर संपर्क साधून मदतीची विनंती केली. मिळालेल्या माहितीनुसार, फ्रंट डेस्कवरून त्यांना खोलीबाहेर पडणे धोकादायक असल्याने बाथरूममध्ये जाऊन स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच पाण्याचे नळ सुरू ठेऊन बचाव पथकाची वाट पाहण्यास सांगण्यात आले. कुटुंबाने या सूचनेचे पालन करत स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले.
सुनावणीत हायकोर्टाचा राजकीय टोला; तुमच्यावर गुन्हे आहेत? पक्ष बदला, तिथं वॉशिंग मशीन आहे
मात्र, आग इतकी भीषण होती की अग्निशामक दलाला घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू करण्यास वेळ लागला. तोपर्यंत संपूर्ण इमारतीत मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता. बाथरूममध्ये अडकलेल्या सुथार कुटुंबाला श्वास घेणे अशक्य झाले आणि धुरामुळे गुदमरून तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती नडियाद येथील त्यांच्या नातेवाईकांना मिळताच गावात शोककळा पसरली. अमेरिकन प्रशासनाने या भीषण आगीच्या कारणांचा तपास सुरू केला असून आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, मृत तिन्ही सदस्यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असून आवश्यक प्रक्रिया सुरू आहे. चांगल्या आयुष्याच्या आणि उज्ज्वल भविष्यासाठी अमेरिकेत गेलेल्या एका भारतीय कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
