फ्लोरिडामध्ये विमान अपघाताचा थरारक VIDEO! रस्त्यालगत कोसळताच आगीचा भडका, विमानातील सर्व 9 जणांचा मृत्यू
विमानात एकूण 9 जण प्रवास करत होते. विमान कोसळल्यानंतर झालेल्या भीषण दुर्घटनेत या सर्वांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Dramatic video of a plane crash in Florida : अमेरिकेतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. फ्लोरिडामध्ये एका खाजगी विमानाचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आकाशातून वेगाने खाली येणारे विमान थेट रस्त्याच्या मध्यभागी कोसळले आणि जमिनीवर आदळताच मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. काही क्षणांतच रस्त्यावर आगीच्या ज्वाळा पसरल्या आणि परिसरात काळ्या धुराचे मोठे लोट दिसू लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे एक खाजगी विमान होते. अपघाताच्या वेळी विमानात एकूण 9 जण प्रवास करत होते. विमान कोसळल्यानंतर झालेल्या भीषण दुर्घटनेत या सर्वांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, विमानाचे अवशेष रस्त्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात विखुरले गेले. तसेच ज्या ठिकाणी विमान आदळले, तिथे रस्त्यावर खोल खड्डा पडल्याचेही समोर आले आहे.
या अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, अपघाताच्या वेळी जवळून जाणाऱ्या एका कारमधील व्यक्तींनी हा संपूर्ण थरार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. या व्हिडिओमध्ये विमान आकाशातून अचानक वेगाने खाली येताना दिसते. त्यानंतर काही क्षणांतच विमान जमिनीवर आदळते आणि मोठा स्फोट होऊन आगीचा भडका उडतो. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरतात. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा येत आहे.
पुणे मेट्रोने प्रवास करायचा असेल तर खिशाला किती कात्री? हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाचे संपूर्ण तिकीट दरपत्रक जाहीर!
विशेष म्हणजे, हे विमान निवासी भागापासून अवघ्या काही अंतरावर कोसळले. जवळच घरे आणि रस्त्यावरून जाणारी वाहने असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. त्यामुळे अपघातानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातील नागरिकांना हलवण्याची कारवाईही करण्यात आली.
फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन अर्थात एफएएच्या माहितीनुसार, हे विमान टेक्सासमधील ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बहामासच्या दिशेने रवाना झाले होते. या खाजगी विमानाचा टेल नंबर N722BD असा होता. ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते जिम रेनॉल्ड्स यांनीही हे खाजगी विमान असल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी या दुर्घटनेला मोठी शोकांतिका म्हटले आहे.
दरम्यान, विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला, उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाला होता का किंवा अन्य कोणते कारण होते, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे. विमानातील मृत व्यक्तींची ओळख आणि अपघातामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. एकीकडे विमान वाहतूक सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत असतानाच, फ्लोरिडातील या भीषण दुर्घटनेने संपूर्ण अमेरिकेत हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या काही क्षणांत घडलेल्या या अपघातात 9 जणांचा जीव गेला असून, या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.