महावितरणच्या दिरंगाईचा शेतकऱ्यांना फटका; 8 दिवस वीज बंद, 30 हेक्टरवरील पिके करपली
Burnt Transformer : जळालेली डीपी बदलण्यास होत असलेल्या विलंबामुळे सालोबा मळ्यातील शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.
Burnt Transformer : सालोबा मळा परिसरातील 100 KV क्षमतेची (Electricity) वीज वितरण रोहित्र (डीपी) जळाल्याने मागील 8 दिवसांपासून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद आहे. वीज नसल्यामुळे विहिरी आणि कूपनलिकांमध्ये पाणी उपलब्ध असूनही ते पिकांपर्यंत पोहोचवता येत नाही. परिणामी, परिसरातील सुमारे 30 हेक्टर क्षेत्रावरील पिके करपून गेली असून 15 ते 20 शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. डोळ्यांसमोर पिकांचे नुकसान होत असताना महावितरणकडून डीपी बसवण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप वाढला आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्याचा परिणाम केवळ शेतीवरच नव्हे, तर जनावरांच्या पाण्याच्या व्यवस्थेवरही झाला आहे. पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांची उभी पिके वाळत आहेत, तर जनावरांची तहान भागवण्यासाठी त्यांना पाण्याच्या शोधात भटकावे लागत आहे. पिके वाचवण्यासाठी आणि जनावरांसाठी पाणी मिळवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दुसऱ्याच्या डिग्रीवर स्वतःचं नाव, बीडमध्ये बनावट डॉक्टरचा पर्दाफाश; १८ तासांच्या तपासानंतर अटक
या समस्येबाबत बाधित शेतकऱ्यांनी घोडेगाव येथील विद्युत उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधला. मात्र, तेथे सध्या 100 KV क्षमतेची डीपी उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. मंचर येथील कार्यकारी अभियंता कार्यालयाकडे नवीन डीपीची मागणी नोंदवण्यात आली असून, ती उपलब्ध होताच बसवून वीजपुरवठा सुरू केला जाईल, असे कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, डीपी जळून 8 दिवस उलटले तरी पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.
मंचर येथील मुख्य कार्यालयाकडून नवीन डीपी वेळेत उपलब्ध न झाल्याने 30 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वीजपुरवठा तातडीने सुरळीत करून जळालेल्या डीपीच्या जागी नवीन रोहित्र बसवावे, अशी त्यांची मागणी आहे. महावितरणच्या दिरंगाईमुळे शेती आणि पशुधन दोन्ही संकटात सापडल्याने शेतकऱ्यांनी आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.