ऊस दरासाठी राजू शेट्टींचा एल्गार; महामार्ग रोखण्याची घोषणा, आंदोलन बेमुदत चालणार

Raju Shetti Protest : ऊस दर आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून राजू शेट्टी यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 01T211920.239

ऊसाला योग्य दर मिळावा आणि प्रलंबित (Raju Shetti) मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. साखर कारखानदार आणि सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्यावर रास्ता रोको करण्यात येणार आहे. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत होणारे हे आंदोलन बेमुदत असेल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी त्यांनी शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांतील गावांचा दौरा सुरू केला आहे.

या दौऱ्यात दत्तवाड, अब्दुललाट, आकिवाट, शिरटी, बुबनाळ, नांदणी, उदगाव, कोथळी, दानोळी, नरंदे, आळते आणि रुई या गावांमध्ये बैठका आणि कोपरा सभा घेण्यात आल्या. या गावांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. किणी टोल नाक्यावरील आंदोलनात प्रत्येक गावातून शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी शेट्टी यांनी आवाहन केले. शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांत या आंदोलनाची पूर्वतयारी वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे.

इजिप्तमधून कांदा आयात सुरूच राहिल्यास रस्त्यावर उतरू, राजू शेट्टींचा सरकारला इशारा

साखर कारखान्यांना साखर आणि उपपदार्थांच्या विक्रीतून चांगला नफा मिळत असताना ऊस उत्पादकांना वाढीव दर देण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. खुल्या बाजारात साखरेचे दर वाढले असून बगॅस आणि मोलॅसिसचे दरही उंचावले आहेत. तरीही शेतकऱ्यांच्या उसाला योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार आणि साखर कारखानदारांनी संगनमत करून शेतकऱ्यांना अडचणीत आणल्याचा दावाही शेट्टी यांनी केला.

राज्यातील शेतकरी महागाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत असून शेतीचा उत्पादन खर्च भरून काढणेही कठीण झाल्याचे शेट्टी म्हणाले. अशा परिस्थितीत उसाच्या वाजवी दरासाठी शेतकऱ्यांनी आपला हक्क मागितलाच पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. 3 नोव्हेंबरचे आंदोलन केवळ एक दिवसाचे नसून मागण्या मान्य होईपर्यंत सुरू राहणारी आरपारची लढाई असेल, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने किणी टोल नाक्यावर उपस्थित राहावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

follow us