बीडमध्ये पीककर्जाच्या प्रश्नावर रास्ता रोको; बँकेच्या कारभाराविरोधात शेतकरी संताप

Beed Crop Loan Protest : बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे पीककर्ज मिळवताना अडथळे येत असल्याच्या आरोपावरून शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 16T163251.777

दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात (Beed) सापडले असताना पीककर्ज मिळवण्यासाठीही बँकांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप करत गुरुवारी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. जामीनदाराच्या खात्यावर कर्ज थकीत असल्याचं कारण देत शेतकऱ्यांच्या पीककर्जाची प्रक्रिया रोखली जात असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. शासनाकडून दुष्काळी मदतीच्या घोषणा होत असताना प्रत्यक्षात कर्ज मिळवताना अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

सामाजिक कार्यकर्ते आणि बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन झालं. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या लिंबागणेश शाखेत पीककर्जासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना वैयक्तिक कर्जाची थकबाकी किंवा जामीनदाराच्या खात्यावरील थकीत रकमेचा फटका बसत असल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित कर्जखाती नियमित केल्यानंतरच पुढील प्रक्रिया करता येईल, अशी भूमिका बँकेकडून घेतली जात असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं.

एकीकडे शासन दुष्काळ निवारणासाठी मदतीची घोषणा करत असताना दुसरीकडे कर्जप्रक्रियेत शेतकऱ्यांची अडवणूक होत असेल, तर या घोषणांचा उपयोग काय, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. बँका, मायक्रोफायनान्स कंपन्या, फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांकडून होणाऱ्या सक्तीच्या कर्जवसुलीला आळा घालावा, अशी मागणीही करण्यात आली. नियमबाह्य पद्धतीनं कर्जवसुली करणाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असं निवेदनात नमूद करण्यात आलं.

दुष्काळात आगीच्या झळा! बीड जिल्ह्यात गंजीला आग लागून सोयाबीनची राखरांगोळी

जामीनदार असलेल्या शेतकऱ्यांच्या अन्य कर्जखात्यांवरील थकबाकीचं कारण देऊन पीककर्ज नाकारण्यासंदर्भातील अटींमध्ये आवश्यक शिथिलता द्यावी, पात्र शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून द्यावं आणि नेकनूर डीसीसी बँकेतील कथित अडवणूक थांबवावी, अशा मागण्या करण्यात आल्या. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, महसूलमंत्री, कृषिमंत्री आणि विभागीय आयुक्त यांना निवेदन पाठवण्यात आलं. आंदोलनादरम्यान महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे उपविभागीय व्यवस्थापक योगेश गुप्ता, वरिष्ठ व्यवस्थापक प्रवीण मुळे, लिंबागणेश शाखेचे व्यवस्थापक सोन्याबापू रासकर आणि पाटोदा शाखेचे व्यवस्थापक एस. बी. शिंदे उपस्थित होते.

या वेळी मंडळ अधिकारी उच्चला राऊत, ग्राममहसूल अधिकारी गणपत पोतदार, पोलीस उपनिरीक्षक धायगुडे, पोलीस हवालदार नवनाथ मुंडे आणि तांबे यांच्या माध्यमातून निवेदन देण्याची प्रक्रिया पार पडली. रास्ता रोको आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव, कल्याण बापू वाणी, बाळकृष्ण थोरात, शिवशक्ती-भीमशक्ती विचारमंचाचे प्रदेशाध्यक्ष बालासाहेब मोरे पाटील, शेतकरी हक्क मोर्चाचे संयोजक राजेंद्र आमटे, इंटकचे बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले, अॅड. गणेश वाणी, विक्रांत वाणी, दामोदर थोरात, रमेश गायकवाड, अशोकराजे वाणी, शंकर वाणी, अंकुश गायकवाड, पप्पू आवसरे, सोनबा गिरे, विशाल येडे, कृष्णा वायभट आणि पोखरीचे सरपंच बिभीषण मुळीक सहभागी झाले.

तसेच पिंपरनईचे सरपंच बालासाहेब वायभट, रेवण मोरे, मुळुकवाडीचे माजी सरपंच कृष्णा पितळे, संतोष भोसले, संजय घोलप, कामगार नेते सुनील भोसले आणि विवेक बागल यांच्यासह अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीककर्ज मिळवताना येणारे अडथळे दूर करावेत आणि सक्तीच्या कर्जवसुलीबाबतच्या तक्रारींची दखल घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या प्रश्नांवर तातडीनं उपाययोजना न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

follow us