सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट; पडळकर आणि काँग्रेस आमनेसामने

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतपत्रिकांवरून नवा वाद निर्माण झाला असून, जत गटातील मतदान प्रक्रियेवर काँग्रेसने गंभीर आक्षेप घेतला आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 01T172329.429

Sangli District Bank Election : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Bank) सहा जागांसाठी सुरू असलेल्या निवडणुकीत जत सोसायटी गटातील मतदानावरून वाद निर्माण झाला आहे. मतदान प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली नसल्याचा आरोप करत काँग्रेसने संपूर्ण मतदान पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. माजी आमदार विक्रम सावंत आणि काँग्रेसचे उमेदवार विनोद पवार यांनी सत्तेचा गैरवापर करून दबावाखाली मतदान घडवून आणल्याचा आरोप केला. जत गटातील मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मतदान केंद्रावर कवठेमहांकाळ गटाच्या दोन अतिरिक्त मतपत्रिका आढळल्याचा मुद्दा विक्रम सावंत यांनी उपस्थित केला. एका गटाच्या मतदान केंद्रावर दुसऱ्या गटाच्या मतपत्रिका कशा पोहोचल्या, याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली. हा प्रकार लोकशाही प्रक्रियेच्या विरोधात असल्याचं सांगत जत सोसायटी गटातील निवडणूक रद्द करून पुन्हा मतदान घ्यावं, अशी भूमिका सावंत यांनी मांडली. या प्रकरणामुळे मतदानाच्या पारदर्शकतेबाबत संशय निर्माण झाल्याचं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे.

Video : ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात जावं लागेल! इंडिया आघाडीच्या महारॅलीतून राहुल गांधींचा थेट वार

काँग्रेसकडून करण्यात आलेले आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी फेटाळले आहेत. उलट विरोधकांनीच निवडणुकीत जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक शांततेत आणि लोकशाही पद्धतीने पार पडल्याचं सांगतानाच कवठेमहांकाळ गटाच्या मतपत्रिका जत गटाच्या केंद्रावर कशा आल्या, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पडळकर यांनी केली. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिकाही त्यांनी मांडली आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 21 जागांपैकी 15 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून उर्वरित 6 जागांसाठी मतदान सुरू आहे. जत गटात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात काँग्रेसचे विनोद पवार मैदानात आहेत. तर तासगाव गटात माजी खासदार संजयकाका पाटील आणि माजी आमदार सुमन आर. आर. पाटील यांच्यात लढत होत आहे. या सहा जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल 3 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.

follow us