पडळकर यांचा बळीचा बकरा करायचा प्लॅन ठरला.. सांगलीतल्या नेत्यांनी डाव टाकलाच
Sangli District Bank Election सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांनी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा केला. पण...
Sangli District Bank Election : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला. अनेक दिग्गजांनी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा केला. पण भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी जतचा आखाडा मात्र खुलाच राहिला. विनोद पवार यांच्याविरोधात पडळकरांना आता थेट लढत द्यावी लागणार आहे. त्यामुळे सांगलीच्या राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा रंगलीये ती म्हणजे 17 जागांवर तडजोडीचं राजकारण झालं, मग पडळकरांसाठी कुणी शब्द टाकला नाही का? स्वकीयांनी हात आखडता घेतला की, पडद्यामागचं राजकीय गणितच वेगळं आहे? एवढचं नव्हे तर घडलेल्या घडमोडी बघता पडळकर यांना सांगलीच्या साऱ्या नेत्यांनी वाऱ्यावर सोडले आहे का? असादेखील प्रश्न उपस्थित होत आहे. नेमकं सांगलीत काय घडलं त्याबद्दल जाणून घेऊया…
नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वर्चस्व मिळवण्यासाठी विविध राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता होती. मात्र, निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात प्रमुख नेत्यांनी एकत्र येत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्याचं वृत्त आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकांमध्ये जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, विश्वजीत कदम, राहुल महाडिक यांच्यासह विविध पक्षांचे नेते सहभागी झाले होते.
या चर्चेत भाजपला चार, राष्ट्रवादी काँग्रेसला सात, अजित पवार गटाला एक, काँग्रेसला सहा आणि शिवसेनेच्या शिंदे गटाला तीन जागा देण्याचं सूत्र ठरल्याचं सांगितलं जात आहे. या जागावाटपामुळे 21 पैकी 17 जागांवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्र आहे. मात्र, उर्वरित जागांवरील लढतींमुळे निवडणुकीतील राजकीय चुरस कायम आहे. बहुतांश जागांवर तडजोडीचा मार्ग स्वीकारला जात असताना जत सोसायटी गटातील पडळकरांची लढत मात्र कायम राहिली. त्यामुळे इतर ठिकाणी राजकीय सहमती घडवून आणणाऱ्या नेत्यांना पडळकरांच्या बाबतीत तोडगा का काढता आला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिग्गजांची गणितं जुळली, पडळकरांचं काय?
सांगलीच्या राजकारणात जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित नसते. बँकेवरील वर्चस्वातून स्थानिक राजकीय ताकद आणि नेत्यांची जिल्ह्यातील पकडही अधोरेखित होते. त्यामुळे 17 जागांवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होणं हे प्रमुख नेत्यांच्या वाटाघाटींचं महत्त्वाचं फलित मानलं जात आहे. मात्र, या सगळ्या राजकीय जुळवाजुळवीत पडळकरांच्या जत गटातील लढतीवर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे दिग्गजांनी आपापली राजकीय गणितं जुळवली, मग पडळकरांसाठी कुणी पुढाकार घेतला का? हा प्रश्न चर्चेत आला आहे.
पडळकरांना जाणीवपूर्वक एकाकी पाडण्यात आलं, असा ठोस निष्कर्ष काढण्यासाठी पुरेशी माहिती समोर आलेली नाही. मात्र, जागावाटपाच्या चर्चेनंतरही त्यांची लढत कायम राहिल्याने राजकीय चर्चेला वाव मिळाला आहे. विशेष म्हणजे, पडळकरांच्या विरोधात असलेले स्थानिक नेते एकत्र येतात का आणि या लढतीत त्यांना कोणाचं पाठबळ मिळतं, याकडे लक्ष लागलं आहे.
पडळकरांविरोधात विरोधकांची मोट बांधली जाणार?
जत सोसायटी गटात पडळकर यांच्याविरोधात लढणारे विनोद पवार हे राजकारणी नसून व्यापारी आहेत. ते हैदराबाद सोने-चांदी असोसिएशनचे अध्यक्ष असल्याची माहिती आहे. त्यांचे बंधू सुनील पवार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे या लढतीत स्थानिक राजकीय संबंधांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. दुसरीकडे, माजी आमदार विलासराव जगताप आणि विक्रम सावंत हे पडळकरांचे राजकीय विरोधक मानले जातात. तमनगौडा पाटील यांचाही पडळकरांना विरोध असल्याचं सांगितलं जात आहे. हे नेते आणि इतर विरोधक एकत्र येऊन पडळकरांविरोधात मोट बांधतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जत सोसायटी गटात केवळ 84 मतदार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मतांची संख्या मर्यादित असली, तरी प्रत्येक मताला महत्त्व असणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पडळकर पहिल्यांदाच उतरले आहेत. या गटातील स्थानिक राजकीय समीकरणं आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित नेत्यांचं प्राबल्य लक्षात घेता, त्यांच्यासमोरचं आव्हान सोपं मानता येणार नाही. जत भागात दुष्काळाची तीव्रता असताना ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, निवडणूक होणार असल्याने स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त होत असल्याचं सांगितलं जात आहे. जिल्हा बँकेची निवडणूक आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात असल्याने या लढतीत स्थानिक हितसंबंध आणि राजकीय ताकदीची समीकरणं निर्णायक ठरू शकतात.
जतपुरताच पेच, की आणखी ठिकाणी रंगणार लढत?
कवठेमहांकाळ सोसायटी गट: माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि टी. व्ही. पाटील यांच्यात लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तासगाव सोसायटी गट: माजी खासदार संजय पाटील आणि माजी आमदार सुमन पाटील यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे.
मिरज सोसायटी गट: अण्णासाहेब कोरे यांच्यासमोर अनिल शेगुणसे यांनी उमेदवारी दाखल केल्याची माहिती आहे.
जत सोसायटी गट: भाजप आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध विनोद पवार.
या संभाव्य लढतींचं अंतिम चित्र उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघारीनंतर स्पष्ट होईल. त्यामुळे सध्या बिनविरोध निवडींची चर्चा असली, तरी काही गटांमध्ये निवडणुकीची चुरस कायम राहू शकते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जतबरोबरच कवठेमहांकाळ, तासगाव आणि मिरज येथील संभाव्य लढतींकडेही लक्ष लागलं आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बहुतांश जागांवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी काही गटांतील लढतींमुळे राजकीय चुरस कायम आहे. कवठेमहांकाळमध्ये घोरपडे आणि पाटील यांच्यातील संभाव्य लढतीकडे लक्ष लागलं आहे. मात्र, जतच्या लढतीला वेगळं राजकीय महत्त्व आहे. कारण, बिनविरोध निवडीच्या फॉर्म्युल्यातून अनेक ठिकाणी संघर्ष टळला असताना पडळकरांना थेट मतांच्या मैदानात उतरावं लागणार आहे.
तासगावमध्ये संजय पाटील-सुमन पाटील यांच्यात लढत?
तासगाव सोसायटी गटात माजी खासदार संजय पाटील आणि माजी आमदार सुमन पाटील यांच्यात लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दोघांमधील सामना प्रत्यक्षात होतो का, हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर स्पष्ट होईल. त्यामुळे तासगावमधील निवडणुकीकडेही जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
मिरजमध्ये अण्णासाहेब कोरे यांच्यासमोर अनिल शेगुणसे यांचं आव्हान?
मिरज सोसायटी गटात अण्णासाहेब कोरे यांच्या विरोधात अनिल शेगुणसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. त्यामुळे या गटातही निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर अंतिम लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे.
पडळकरांसाठी प्रतिष्ठेची लढाई
आक्रमक राजकीय भूमिकांमुळे कायम चर्चेत असलेल्या गोपीचंद पडळकरांसाठी जिल्हा बँकेची ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरू शकते. ही लढत केवळ एका जागेपुरती मर्यादित नसून जतच्या स्थानिक राजकीय समीकरणांची आणि पडळकरांना मिळणाऱ्या पाठबळाचीही परीक्षा ठरू शकते.
दुसरीकडे, माजी खासदार संजयकाका पाटील यांच्याबाबत पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यात एकमत होऊ शकलं नसल्याची माहितीही या राजकीय घडामोडींच्या संदर्भात महत्त्वाची ठरते. याउलट, विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील यांच्यासह काही राजकीय घराण्यांतील उमेदवारांचा बिनविरोध निवडीच्या प्रक्रियेत समावेश झाल्याचं सांगितलं जात आहे.
सगळ्यांचं जमलं, पडळकरांचं का नाही? जिल्ह्यातील दिग्गजांनी तडजोडीच्या राजकारणातून आपापला मार्ग सुकर केला, पण पडळकरांना जतच्या आखाड्यात थेट लढतीला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे त्यांना खरोखरच स्वकीयांनी वाऱ्यावर सोडलंय, की या लढतीमागे सांगलीच्या राजकारणातील आणखी काही वेगळी गणितं आहेत? याचं उत्तर निकालातून मिळेलच असं नाही; मात्र या निवडणुकीत पडळकरांना किती पाठबळ मिळतं आणि जतचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष नक्कीच असेल.