सांगली जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट; गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
Sangli Bank Election : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
Gopichand Padalkar Sangli Bank Election : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Bank) निवडणुकीसंदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. निवडणुकीसाठी त्यांनी दाखल केलेला अर्ज न्यायालयानं वैध ठरवला आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं हा अर्ज अवैध ठरवला होता. त्या निर्णयाला पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना बँकेची निवडणूक लढवता येणार आहे.
पडळकर यांनी जत सोसायटीच्या माध्यमातून सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्जासोबत जोडलेली कागदपत्रं बनावट असल्याचा आक्षेप माजी आमदार विक्रम सावंत आणि बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे यांनी घेतला होता. पडळकर हे कोणत्याही संस्थेचे संचालक नसल्याचा, तसेच ते दोन वर्षांपूर्वीपासूनचे सभासद नसल्याचा दावाही विरोधकांनी केला होता.
या आक्षेपांनंतरही बँकेच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पडळकर यांचा अर्ज वैध ठरवला होता. या निर्णयाविरोधात विक्रम सावंत आणि सुजय शिंदे यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान सादर झालेल्या पुराव्यांचा विचार करून खंडपीठानं पडळकर यांचा अर्ज अवैध ठरवला. त्यामुळे त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला होता.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलं. सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यांचा अर्ज वैध ठरवल्याने निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर पडळकर समर्थकांनी समाधान व्यक्त केलं. कार्यकर्ते महादेव पाटील यांनी सांगितलं की, विरोधकांनी उच्च न्यायालयात जाऊन पडळकर यांच्या अर्जावर स्थगिती मिळवली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर आता न्यायालयाचा निकाल पडळकर यांच्या बाजूने लागला असून, ते निवडणूक लढवू शकतील.