Download App

रशियाला दणका! लहानशा देशानेही वटारले डोळे; रशियन पर्यटकांना नो एन्ट्री

नॉर्वेने म्हटले आहे की या महिन्याच्या अखेरपर्यंत रशियन पर्यटकांना देशात येण्यास बंदी घातली जाईल.

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील विनाशकारी युद्ध अजूनही (Russia Ukraine War) थांबलेले नाही. या युद्धात दोन्ही देशांचे अतोनात नुकसान झाले आहे. हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. शहरे उद्धवस्त झाली आहेत तरी देखील युद्धाचा निकाल लागलेला नाही. युक्रेनवर युद्ध लादले म्हणून अमेरिकेसह युरोपीय देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. रशियाची अब्जावधींची संपत्ती गोठवली आहे. आता याच संपत्तीचे व्याज युक्रेनला देण्याचा विचार युरोपियन युनियनने सुरू केला आहे. हा रशियासाठी मोठा झटका असतानाच आणखी एक अडचणीची बातमी आली आहे.

युरोपातील लहान देश नोर्वेने (Norway) रशियाला डोकेदुखी ठरणारा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. नॉर्वेने म्हटले आहे की या महिन्याच्या अखेरपर्यंत रशियन पर्यटकांना देशात येण्यास बंदी घातली जाईल. नॉर्वे सरकारच्या न्याय आणि सार्वजनिक सुरक्षा मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की प्रवेश नियम अधिक कठोर करण्याचा निर्णय रशियाच्या विरोधातील दृष्टिकोनाच्या अनुरूप असाच आहे. फक्त काही ठराविक कारणांसाठीच रशियन नागरिकांना देशात येण्याची परवानगी दिली जाईल. नोर्वेत राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांची भेट तसेच शिक्षणाच्या निमित्ताने देशात येऊ इच्छिणाऱ्या रशियन नागरिकांना परवानगी देण्यात येईल.

Russia China : चीन-रशियाकडून ‘डॉलर’ हद्दपार! द्विपक्षीय व्यापारासाठी तयार केला खास प्लॅन

नॉर्वेच्या न्याय मंत्रालयाने म्हटले आहे की युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे रशियन नागरिकांच्या नॉर्वेतील प्रवेशाचे नियम अधिक कठोर करण्यात येतील. परिणामी 29 मे पासून जवळपास सर्व प्रवेश बंद होतील. नॉर्वेच्या या निर्णयावर रशियाने प्रतिक्रिया दिली आहे. नॉर्वेचा हा निर्णय भेदभावपूर्ण असून याला प्रत्युत्तर नक्कीच दिले जाईल.

नॉर्वे नाटो संघटनेचा सदस्य देश आहे. ज्यावेळी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता त्याच वेळी नॉर्वेने रशिया पर्यटक व्हिसावर बंदी आणली होती. न्याय मंत्री एमिली एंगर मेहल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की पर्यटन किंवा अन्य अनावश्यक कारणांसाठी नॉर्वेत येऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना देशात प्रवेश करू दिला जाणार नाही.

दरम्यान, फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने यूक्रेनवर हल्ला केला होता. या गोष्टीला आता दोन वर्षे उलटून गेली आहेत. रशियाच्या या कारवाईमुळे पाश्चिमात्य देश आणि युरोपातील देश चांगलेच भडकले. त्यांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले. रशियाच्या अर्ध्यापेक्षा जास्त विदेशी संपत्तीवर टाच आणली. जवळपास ३२७ अब्ज डॉलर्स इतकी मोठी रक्कम आहे. यातील २१८ बिलियन डॉलर्स युरोपियन युनियनच्या ताब्यात आले. जप्त केलेली ही रक्कम आता व्याज देऊ लागली आहे. दोन वर्षात या रकमेवर 6 अब्ज डॉलर्स इतके व्याज जमा झाले आहे. हे व्याज युक्रेनला देण्याची योजना युरोपियन युनियनकडून आखली जात आहे.

पैसा रशियाचा पण, व्याज युक्रेनला? EU च्या प्लॅननं केली रशियाची कोंडी

follow us