Iran-US nuclear deal in final stages? : अमेरिका आणि इराण यांच्यात प्रस्तावित करारातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तेहरानने आपल्या उच्च संवर्धित युरेनियमच्या साठ्याचा त्याग करण्याची तयारी दर्शवल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. व्हाईट हाऊसकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दावा केला की, इराणसोबत युद्ध संपवणे आणि होर्मूझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याच्या दिशेने करार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. तथापि, या करारातील अटी किंवा उर्वरित अडथळ्यांबाबत त्यांनी कोणतीही सविस्तर माहिती दिली नाही.
अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रस्तावामध्ये इराणने आपल्या उच्च संवर्धित युरेनियमच्या साठ्याबाबत काही प्रमाणात माघार घेण्यास तत्त्वतः सहमती दर्शवली आहे. मात्र, हा साठा नेमका कशा पद्धतीने हटवला जाणार किंवा त्याचे काय केले जाणार यावर पुढील चर्चेत निर्णय होणार आहे. इराणने सुरुवातीला या युरेनियम साठ्याच्या मुद्द्याला कराराच्या दुसऱ्या टप्प्यात ठेवण्याची मागणी केली होती. पण अमेरिकन चर्चाकारांनी मध्यस्थांमार्फत स्पष्ट संदेश दिला की, प्रारंभीच्या करारात या मुद्द्याचा समावेश न झाल्यास अमेरिका चर्चेतून बाहेर पडेल आणि लष्करी कारवाई पुन्हा सुरू करेल.
दरम्यान, अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी इराणच्या युरेनियम साठ्यावर हल्ला करण्याचे पर्यायही तयार ठेवले होते. हा साठा प्रामुख्याने इस्फाहान येथील अणु केंद्रात असल्याचे मानले जाते. गेल्या वर्षी अमेरिकेने टॉमहॉक क्षेपणास्त्रांद्वारे या केंद्रावर हल्ला केला होता. त्यानंतर हा साठा जमिनीखाली गाडला गेला असल्याचे सांगितले जाते.
याच पार्श्वभूमीवर इस्फाहानवरील भूमिगत ठिकाणे उद्ध्वस्त करण्यासाठी ‘बंकर बस्टर’ बॉम्ब वापरण्याचाही पर्याय चर्चेत होता. तसेच, अमेरिकन आणि इस्रायली कमांडो कारवाईद्वारे हा साठा हस्तगत करण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेता अध्यक्ष ट्रम्प यांनी त्या मोहिमेला मंजुरी दिली नाही.
नरेंद्र दाभोळकरांना मीच कार्याध्यक्ष केलं, पण दोन वर्षांतच संघटना फोडली; श्याम मानवांचा खळबळजनक दावा
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या माहितीनुसार, इराणकडे सध्या सुमारे 970 पाउंड इतका 60 टक्के संवर्धित युरेनियमचा साठा आहे. हा साठा अण्वस्त्र निर्मितीसाठी वापरता येण्याच्या जवळचा मानला जातो. 2015 मध्ये तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात झालेल्या अणुकरारानुसार इराणने आपला युरेनियम साठा रशियाकडे सुपूर्द केला होता. त्याच धर्तीवर पुन्हा एकदा हा साठा रशियाकडे देण्याचा पर्याय चर्चेत आहे. दुसरा पर्याय म्हणजे या युरेनियमचे संवर्धन कमी पातळीवर आणणे, जेणेकरून त्याचा अण्वस्त्र निर्मितीसाठी वापर होऊ शकणार नाही.
आगामी काही आठवड्यांत किंवा महिन्यांत होणाऱ्या पुढील चर्चेत युरेनियम साठ्याचे भवितव्य आणि इराणच्या अणु संवर्धन कार्यक्रमावर सविस्तर चर्चा होणार आहे. अमेरिका इराणवर 20 वर्षांची संवर्धनबंदी लादण्याच्या भूमिकेत आहे, तर इराणने त्यासाठी तुलनेने कमी कालावधीचा प्रस्ताव दिला आहे. या संभाव्य करारातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे परदेशात गोठवून ठेवलेल्या इराणच्या अब्जावधी डॉलरच्या मालमत्तेची सुटका. अंतिम अणुकरार झाल्यानंतरच इराणला या निधीचा मोठा भाग उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे इराणला चर्चेच्या टेबलावर कायम राहण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचे मानले जात आहे.
