इराणसोबतची शस्त्रसंधी संपली! ‘नाटो’ परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, युद्ध पुन्हा भडकणार?
Ceasefire Iran ends Donald Trumps announcement अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी संपुष्टात आल्याची मोठी घोषणा केली आहे.
Ceasefire with Iran ends Donald Trumps major announcement at NATO summit will war flare up again :अमेरिका आणि इराण युद्ध पुन्हा एकदा गंभीर वळणावर पोहोचलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचा दावा केला आहे. नाटो शिखर परिषदेदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी इराणने कराराच्या अटींचे पालन केले नसल्याचा आरोप करत तेहरानशी पुढील चर्चा करण्याला आता अर्थ नसल्याचे म्हटले.
ट्रम्प म्हणाले, “इराणसोबत झालेला करार आता प्रभावी राहिलेला नाही. त्यांच्याशी चर्चा करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा त्याचा काहीही उपयोग होणार नाही.” त्यांनी असा आरोपही केला की, करारानंतर इराणने माध्यमांसमोर कराराबाबत विरोधाभासी भूमिका मांडली आणि पूर्वी झालेल्या चर्चेचाच इन्कार केला.
आखाती प्रदेशातील तणाव वाढला
ट्रम्प यांचे हे वक्तव्य अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा आखाती प्रदेशातील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनली आहे. इराणने दावा केला आहे की, अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून त्यांनी 85 अमेरिकी लष्करी तळांना लक्ष्य केले. इराणच्या मते, होर्मोझगान प्रांत आणि महशहर बंदर परिसरातील अमेरिकी कारवाईला उत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले.
मान्सूनच्या विलंबाचा मराठवाड्याला फटका; फक्त 24.55 लाख हेक्टर पेरणी, कुठं किती टक्के पाऊस?
या दाव्यानंतर संपूर्ण आखाती प्रदेशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बहरिन आणि कुवैत येथे हवाई हल्ल्याच्या इशाऱ्याचे सायरन वाजवण्यात आले असून, सुरक्षा यंत्रणा उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आल्या आहेत.
तात्पुरत्या करारावर प्रश्नचिन्ह
अलीकडेच अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष थांबवण्यासाठी तसेच अणु कार्यक्रमासह विविध वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा पुढे नेण्यासाठी तात्पुरता करार झाला होता. मात्र, ट्रम्प यांच्या ताज्या विधानामुळे अमेरिका हा करार आता संपल्याचे मानत असल्याचे संकेत मिळत आहेत.
जागतिक परिणामांची शक्यता
आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, या घडामोडींमुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढू शकतो. या प्रदेशात आधीच क्षेपणास्त्र हल्ले, ड्रोन हल्ले आणि सागरी सुरक्षेचे प्रश्न गंभीर बनले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा लष्करी संघर्ष वाढल्यास त्याचा परिणाम जागतिक ऊर्जा पुरवठा, कच्च्या तेलाच्या किमती आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर होण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांच्या या विधानानंतर अमेरिका-इराण संबंध पुन्हा एकदा तणावाच्या टप्प्यावर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. आता दोन्ही देशांमध्ये पुन्हा राजनैतिक संवाद सुरू होणार की परिस्थिती अधिक गंभीर स्वरूप धारण करणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.