Israel Airstrike on Gaza : इस्रायलच्या संरक्षण दलांच्या माहितीनुसार हवाई दल (Gaza) गाझामधील हमासच्या तळांवर हवाई हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत २३२ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून ३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. १९ जानेवारी रोजी इस्रायल-हमास युद्धबंदी सुरू झाल्यानंतर गाझामध्ये इस्रायलचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.
अखेर गाझा युद्ध संपलं! लवकरच होणार युद्धविराम; वाचा इस्त्रायल-हमास युद्धाची टाइमलाइन
इस्रायली सैन्याच्या म्हणण्यानुसार, ते हल्ल्याची योजना आखणाऱ्या दहशतवाद्यांना लक्ष्य करत होते. गेल्या दोन आठवड्यांपासून इस्रायलने गाझाला अन्न, औषध, इंधन आणि इतर साहित्याचा पुरवठा रोखला आहे आणि हमासने युद्धबंदी करारातील बदल स्वीकारावेत अशी मागणी केली आहे. हमासने इस्रायली हवाई हल्ल्यांना युद्धबंदीचे उल्लंघन म्हटले आहे. हमासने धमकी दिली आहे की या कारवाईमुळे त्यांच्या ताब्यात असलेल्या इस्रायली ओलिसांचे जीवन धोक्यात येईल. इस्रायलने कोणत्याही चिथावणीशिवाय हे हल्ले केले असल्याचे हमासने म्हटले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले की, युद्धबंदीच्या चर्चा प्रगतीपथावर नसल्याने हल्ल्यांचे आदेश दिले. नेतन्याहू यांनी अनेक वेळा पुन्हा युद्ध सुरू करण्याची धमकी दिली आहे. त्याच वेळी, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इशारा दिला आहे की जर ओलिसांना सोडले नाही तर गाझामध्ये नरकाचे दरवाजे उघडले जातील.
युद्धबंदीचा पहिला टप्पा १ मार्च रोजी संपला. पहिल्या टप्प्यात, हमासने ३३ ओलिसांची सुटका केली आहे. दरम्यान, इस्रायलने २००० हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांना मुक्त केले आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदीच्या दुसऱ्या टप्प्यातील चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. या टप्प्यात सुमारे ६० ओलिसांची सुटका होणार होती. तसेच, युद्ध पूर्णपणे संपवण्यावर चर्चा होणार होती. हमासकडे सध्या २४ जिवंत ओलिस आणि ३५ मृत आहेत.