जेन्सन हुआंग यांचं ट्रम्प कार्ड चाललं; 11 दिवसांनंतर जोरदार कमबॅक, भारतालाही फायदा…

Nvidia CEO Jensen Huang चीनशी संबंधित गुप्तहेरगिरीच्या आरोपांमुळे हुआंग वादात काय सापडतात अन् त्यांच्यासाठी ट्रम्प स्वतः मैदानात उतरतात

Jensen Huang

Jensen Huang

How Jensen Huang Come Back As a Nvidia CEO :  एका बाजूला चीनला रोखण्यासाठी अमेरिका संपूर्ण ताकद लावतेय… दुसऱ्या बाजूला चीनशी संबंधित गुप्तहेरगिरीच्या आरोपांमुळे वादात सापडलेल्या हुआंग यांना पुन्हा त्याच अमेरिकेची साथ मिळतेय आणि या संपूर्ण खेळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः मैदानात उतरतात…असचं काहीसं घडलयं Nvidia च्या जेन्सन हुआंग यांच्याबाबतीत कारण 11 दिवसांनंतर हुआंग यांची Nvidia च्या CEO पदी पुन्हा वर्णी लागली आहे. पण, खरचं पदावर पुन्हा येण्यासाठी हुआंग यांनी ट्रम्प कार्ड खेळलं का? आणि जेन्सन हुआंग यांच्यासाठी ट्रम्प यांनी एवढी ताकद का लावली? हा केवळ एका CEO च्या खुर्चीचा विषय आहे का? की, यामागे आहे अमेरिकेचं AI साम्राज्य, चीनशी सुरू असलेली तंत्रज्ञानाची स्पर्धा आणि अब्जावधी डॉलर्सची अर्थव्यवस्था? चला, समजून घेऊया या संपूर्ण प्रकरणामागचं राजकारण, अर्थकारण आणि टेक्नॉलॉजीचं गणित अगदी सोप्या भाषेत…

ट्रम्प यांच्या एका फोन कॉलनंतर जगातील सर्वात महत्त्वाच्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या Nvidia च्या बोर्डाचा निर्णय बदलतो… आणि अवघ्या 11 दिवसांत जेन्सन हुआंग यांची CEO पदावर पुन्हा नियुक्ती होते पण, प्रश्न हा आहे की, ज्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि चीनशी संबंधित आरोपांमुळे Nvidia मध्ये मोठं वादळ निर्माण झालं, त्याच व्यक्तीला पुन्हा कंपनीच्या सर्वोच्च पदावर आणण्यासाठी ट्रम्प यांनी एवढा आग्रह का धरला?

सुरुवात करूया जेन्सेन हुआंग यांच्यापासून. जेन्सन हुआंग हे Nvidia चे सहसंस्थापक आहेत. 1993 मध्ये त्यांनी कंपनीची स्थापना केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली Nvidia ने ग्राफिक्स कार्ड बनवणाऱ्या कंपनीपासून जगातील AI उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाच्या चिप्स पुरवणाऱ्या कंपनीपर्यंत मजल मारली. आज ChatGPT सारख्या AI सिस्टीमपासून ते मोठमोठ्या डेटा सेंटर्सपर्यंत अनेक तंत्रज्ञानामागे Nvidia च्या चिप्सची महत्त्वाची भूमिका आहे.

मात्र, नोव्हेंबर 2026 मध्ये कंपनीत मोठं वादळ निर्माण झालं. हुआंग यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही गंभीर गोष्टी समोर आल्या. त्यात अ‍ॅलिस हुआंग नावाच्या एका चिनी व्यावसायिक महिलेसोबतच्या कथित प्रेम संबंधांचाही समावेश होता. या महिलेचे चीनच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याचा अमेरिकन यंत्रणांना संशय असल्याचीही चर्चा झाली. याशिवाय Nvidia मधील कर्मचाऱ्यांसोबतच्या कथित संबंधांबाबतही बातम्या आल्या.

या सगळ्या घडामोडींमध्ये 12 नोव्हेंबरला जेन्सन हुआंग यांनी Nvidia मधील CEO पदाचा राजीनामा दिला. पण त्यानंतर अवघ्या 11 दिवसांत चित्र पूर्णपणे बदललं. 23 नोव्हेंबरला Nvidia च्या बोर्डाने हुआंग यांची पुन्हा CEO म्हणून नियुक्ती केली आणि या निर्णयामागे ट्रम्प प्रशासनाचा हस्तक्षेप महत्त्वाचा ठरल्याचं समोर आलं.

आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न… ट्रम्प यांनी एका खासगी कंपनीच्या CEO च्या पुनर्नियुक्तीसाठी एवढा रस का दाखवला? याचं उत्तर समजून घ्यायचं असेल तर Nvidia चं अमेरिकेसाठी असलेलं महत्त्व समजून घ्यावं लागेल. Nvidia ही फक्त चिप बनवणारी कंपनी नाही तर, ती अमेरिकेच्या AI सामर्थ्याचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.

आज जगात AI च्या वर्चस्वासाठी अमेरिका आणि चीन यांच्यात मोठी स्पर्धा सुरू आहे. AI मॉडेल्स कोण बनवणार, त्यासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक चिप्स कोण पुरवणार, डेटा सेंटर्सवर कोणाचं नियंत्रण असणार आणि भविष्यातील तंत्रज्ञानाची दिशा कोण ठरवणार, यावर या दोन्ही देशांचं लक्ष आहे आणि या संपूर्ण स्पर्धेत Nvidia ची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

येथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे आणि ती म्हणजे AI मॉडेल तयार करणं ही एक बाजू आहे. पण, ते मॉडेल चालवण्यासाठी लागणारी प्रचंड संगणकीय क्षमता निर्माण करणं ही दुसरी बाजू आहे. यासाठी अत्याधुनिक GPU चिप्स, डेटा सेंटर्स आणि संपूर्ण हार्डवेअर इकोसिस्टम लागते आणि इथेच Nvidia चं नाणं अगदी खणखणीत वाजतयं. त्यामुळे जेन्सेन हुआंग यांचं कंपनीतून बाहेर पडणं म्हणजे केवळ एका CEO ची एक्झिट नव्हती, तर अमेरिकेच्या AI उद्योगाच्या नेतृत्वाबाबत निर्माण झालेली अनिश्चितता होती जी ट्रम्प प्रशासनाला परवडणारी नव्हती.

आता या प्रकरणाची दुसरी बाजू समजून घेऊया. ती म्हणजे शेअर बाजार…जेन्सेन हुआंग यांनी राजीनामा दिल्यानंतर Nvidia च्या नेतृत्वाबाबत अनिश्चितता निर्माण झाली. त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर आणि AI क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या भावनांवर झाला. कंपनीचा प्रमुखच बाहेर पडल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण होणं स्वाभाविक होतं. कारण गुंतवणूकदारांसाठी Nvidia ही केवळ एक कंपनी नाही. ती संपूर्ण AI उद्योगाच्या वाढीशी जोडलेली कंपनी आहे.

मात्र, 23 नोव्हेंबरला हुआंग यांच्या पुनर्नियुक्तीची घोषणा झाली आणि बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. Nvidia च्या शेअर्समध्ये एका ट्रेडिंग सत्रात सुमारे 31.5 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. एवढेच नव्हे तर, कंपनीच्या बाजारमूल्यात जवळपास 950 अब्ज डॉलर्सची भर पडल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच काय तर, हुआंग यांच्या पुनरागमनामुळे गुंतवणूकदारांचा कंपनीच्या नेतृत्वावरचा विश्वास पुन्हा वाढल्याचं बाजारातील प्रतिक्रियेतून दिसलं.

आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात संवेदनशील मुद्द्यावर येऊया तो म्हणजे चीन…ज्या महिलेबाबत चीनच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, तिचं नाव आहे अ‍ॅलिस हुआंग. या प्रकरणात अ‍ॅलिसच्या कथित संबंधांबाबत आणि Megaspeed या सिंगापूरस्थित कंपनीच्या व्यवहारांबाबत तपास सुरू असल्याचं वृत्त आहे. पण,  संशय असणं आणि आरोप सिद्ध होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अमेरिकेच्या वाणिज्य आणि न्याय विभागाने Megaspeed संदर्भातील निर्यात नियंत्रण नियमांच्या संभाव्य उल्लंघनाची चौकशी सुरू केली होती. या चौकशीचा संबंध Nvidia च्या प्रगत AI चिप्सच्या पुरवठ्याशीही जोडला जात आहे.

पण, इथे अमेरिकेची खरी अडचण समजून घेणं महत्त्वाचं आहे. अमेरिका चीनला अत्याधुनिक चिप्स मिळू नयेत यासाठी निर्यात नियंत्रणाचे कठोर नियम लागू करते. कारण या चिप्सचा वापर लष्करी तंत्रज्ञान, प्रगत AI आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कामांसाठी होऊ शकतो.

पण दुसरीकडे, अमेरिकेच्या स्वतःच्या AI उद्योगाचं नेतृत्व करणाऱ्या कंपनीवरच निर्यात नियंत्रण आणि संभाव्य सुरक्षाविषयक प्रश्न उपस्थित होत आहेत. म्हणजे अमेरिकेसमोर दोन उद्दिष्टं आहेत. एक म्हणजे चीनला तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत वरचढ होऊ द्यायचं नाही आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या कंपन्यांचं जागतिक नेतृत्व टिकवायचं. या दोन्ही उद्दिष्टांमध्ये समतोल साधणं हे ट्रम्प प्रशासनासाठी मोठं आव्हान आहे. Nvidia च्या बोर्डाने पुनर्नियुक्तीच्या निर्णयात अमेरिकन सरकारच्या वरिष्ठ स्तराकडून मिळालेल्या माहितीचा विचार केल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. मात्र हुआंग यांच्याबाबतची स्वतंत्र चौकशी सुरूच राहणार असल्याचंही कंपनीने सांगितलं आहे.

आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न… Nvidia च्या बोर्डाने आधी हुआंग यांचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर काही दिवसांतच त्यांना पुन्हा CEO बनवलं. मग बोर्डाचा निर्णय नेमका कशामुळे बदलला? कंपनीच्या अधिकृत निवेदनानुसार, बोर्डाने हुआंग यांच्यासोबत अनेक बैठका आणि चर्चा केल्या. या चर्चेनंतर त्यांच्या प्रामाणिकपणाबाबत आणि कंपनीचं नेतृत्व करण्याच्या क्षमतेबाबत बोर्ड समाधानी असल्याचं सांगण्यात आलं. याशिवाय अमेरिकन सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीचाही विचार करण्यात आला अखेर  बोर्डाने एकमताने जेन्सेन हुआंग यांच्या पुनर्नियुक्तीला मंजुरी दिली.

मात्र, या निर्णयासोबत काही महत्त्वाचे बदलही करण्यात आले. ते म्हणजे…

– कंपनीने राष्ट्रीय सुरक्षा आणि निर्यात नियंत्रणासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली.
– कंपनीच्या नियमपालनावर देखरेख ठेवण्यासाठी Chief Compliance Officer नेमण्याची प्रक्रिया सुरू केली.
– हुआंग यांच्याबाबतची स्वतंत्र चौकशी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
– म्हणजेच हुआंग यांची खुर्ची परत मिळाली असली, तरी कंपनीसमोरील प्रश्न संपलेले नाहीत.

आणि इथेच कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. एखाद्या कंपनीचा CEO कितीही प्रतिभावान असला, तरी कंपनीचे नियम, संचालक मंडळाची जबाबदारी आणि राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न यापेक्षा तो मोठा असू शकतो का? हा प्रश्न आता Nvidia च्या निर्णयामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

आता या संपूर्ण घडामोडींचा भारताशी काय संबंध? तर, पहिला मुद्दा म्हणजे AI चिप्सची उपलब्धता. भारतामध्ये AI, डेटा सेंटर्स, क्लाउड कम्प्युटिंग आणि डिजिटल तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. या क्षेत्रासाठी Nvidia सारख्या कंपन्यांच्या अत्याधुनिक चिप्स महत्त्वाच्या आहेत. अमेरिका आणि चीनमधील तंत्रज्ञानाची स्पर्धा आणखी तीव्र झाली, तर चिप्सच्या निर्यातीसंदर्भातील नियम बदलू शकतात. त्याचा परिणाम भारतीय कंपन्यांच्या चिप्स खरेदीवर आणि AI प्रकल्पांच्या खर्चावर होऊ शकतो.

दुसरा मुद्दा म्हणजे भारताची AI क्षेत्रातील स्वायत्तता. भारताला स्वतःची AI क्षमता विकसित करायची असेल, तर केवळ परदेशी कंपन्यांच्या चिप्सवर अवलंबून राहून चालणार नाही. स्वतःची संगणकीय क्षमता, संशोधन, सेमीकंडक्टर उत्पादन आणि AI इकोसिस्टम विकसित करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

तिसरा मुद्दा म्हणजे जागतिक टेक टॅलेंटची स्पर्धा. अमेरिका आणि चीन यांच्यातील स्पर्धा जसजशी वाढेल, तसतशी भारतीय इंजिनिअर्स, संशोधक आणि स्टार्टअप्ससाठी नव्या संधी निर्माण होऊ शकतात. मात्र, त्यासाठी भारताने स्वतःची तंत्रज्ञानविषयक ताकद वाढवणं आवश्यक आहे.

म्हणजेच काय तर, या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिलं, तर तीन गोष्टी स्पष्ट होतात.

पहिली गोष्ट, आजच्या जगात AI हे केवळ तंत्रज्ञान राहिलेलं नाही. ते आर्थिक आणि सामरिक सामर्थ्याचं साधन बनलं आहे. दुसरी गोष्ट, Nvidia सारख्या कंपनीचं महत्त्व इतकं वाढलं आहे की, तिच्या नेतृत्वातील बदलाचा परिणाम केवळ कंपनीपुरता मर्यादित राहत नाही, तर जागतिक शेअर बाजार आणि देशांच्या तंत्रज्ञानविषयक धोरणांवरही होतो आणि तिसरी गोष्ट, अमेरिकेच्या राजकारणात आता खासगी टेक कंपन्यांच्या निर्णयांनाही राष्ट्रीय हिताच्या चष्म्यातून पाहिलं जात आहे.

पण या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. तो म्हणजे जर, एखादी व्यक्ती देशाच्या तंत्रज्ञानविषयक महत्त्वाकांक्षेसाठी अपरिहार्य बनली, तर त्या व्यक्तीला नियमांच्या बाबतीत वेगळी वागणूक दिली जाऊ शकते का? ट्रम्प यांनी हुआंग यांच्या पुनरागमनासाठी प्रयत्न केले. Nvidia च्या बोर्डाने त्यांना पुन्हा CEO बनवलं. शेअर बाजारानेही या निर्णयाचं स्वागत केलं. पण राष्ट्रीय सुरक्षा, कॉर्पोरेट पारदर्शकता आणि निर्यात नियंत्रणासंबंधीच्या चौकशा अजूनही सुरू आहेत.

म्हणूनच हा केवळ जेन्सेन हुआंग यांच्या खुर्चीवर परतण्याचा विषय नाही. हा अमेरिकेच्या AI वर्चस्वाचा, चीनशी सुरू असलेल्या तंत्रज्ञान युद्धाचा आणि राजकारण व कॉर्पोरेट जगत यांच्यातील वाढत्या संबंधांचा विषय आहे. कारण भविष्यातील जगावर ज्याचं AI तंत्रज्ञानाचं नियंत्रण असेल, जागतिक महासत्ता म्हणून त्याचं स्थान अधिक मजबूत होणार आहे आणि हेच वर्चस्व टिकवण्यासाठी ट्रम्प यांना Nvidia आणि जेन्सेन हुआंग यांची गरज असल्याचं कमबॅकवरून अधोरेखित झालं आहे.

Exit mobile version