Download App

कधी विषबाधा, कोण खिडकीतून पडले तर कोणाला गोळ्या घातल्या… गुढरित्या संपले पुतीन यांचे टीकाकार

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात बंड करणाऱ्या खासगी लष्कर वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवेजनी प्रिगोझिन (Yevgeny Prigozhin) यांचा काल (23 ऑगस्ट) एका विमान अपघातात मृत्यू झाला. प्रिगोझिन यांच्यासोबत विमानातील दहा जण ठार झाल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिले आहे. प्रिगोझिन यांच्या मृत्यूनंतर जगभरात एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या असल्याचा दावा जगभरातून केला जात आहेत. (Many critics of Russian President Vladimir Putin have died mysteriously)

पुतीन यांच्यावर टीका करणाऱ्या किंवा त्यांच्याविरोधात बंड करणाऱ्या अनेकांचा आजवर झालेला रहस्यमय मृत्यू हे या चर्चांना कारण ठरले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही ही हत्या असल्याचे अप्रत्यक्षपणे म्हंटले आहे. बायडेन म्हणाले की, या अपघाताच्या बातमीने मला आश्चर्य वाटत नाही. रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशिवाय काहीही घडत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

इतिहासात रहस्यमय मृत्यूने झालाय अनेक टीकाकारांचा शेवट :

पावेल अँटोनोव्ह, 2022

रशियन उद्योगपती पावेल अँटोनोव्ह यांचा अलिकडेच भारतात रहस्यमय मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह भारतातील ओडिशा येथील एका हॉटेलमध्ये सापडला होता. 65 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते भारतात आले होते. अँटोनोव्ह यांनी नुकताच युक्रेन हल्ल्याबाबत पुतीन यांचा विरोध केला होता. या वर्षी जूनमध्ये युक्रेनमध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा त्यांनी निषेध केला होता. ज्यामध्ये सात वर्षांची मुलगी ठार झाली, तिची आई जखमी झाली आणि तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता.

डेनिस वोरोनेन्कोव्ह, 2016

रशियाचे माजी खासदार डेनिस वोरोनेन्कोव्ह यांचा मृत्यू आजही एक रहस्यच आहे. 2016 मध्ये रशियातून बाहेर पडल्यानंतर डेनिस यांनी पुतिन यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. यानंतर युक्रेनची राजधानी कीवमध्ये डेनिसची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्याकांडामागे रशियाचा हात असल्याचा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरेशेन्को यांनी केला होता. मात्र, रशियाने युक्रेनचे आरोप फेटाळून लावले होते.

बोरिस नेमत्सोव्ह, 2015

माजी उपपंतप्रधान बोरिस नेमत्सोव्ह पुतिन यांचे कट्टर विरोधक मानले जात होते. भ्रष्टाचार उघड करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. अशातच 2014 मध्ये रशियाने पूर्व युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केल्याने ते सरकारला विरोध करणारे प्रमुख व्यक्ती बनले होते. पण 27 फेब्रुवारी 2015 रोजी बोरिस नेमत्सोव्ह यांची मॉस्कोमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. डेनिस यांच्या मृत्यूबाबतचे गुढ कायम आहे.

बोरिस बेरेझोव्स्की, 2013

एकेकाळी सत्तेत महत्त्वाची भूमिका बजावणारे बेरेझोव्स्की काही काळानंतर पुतिन यांचे सर्वात मोठे विरोधक बनले. पुतीन यांच्याशी मतभेद झाल्यानंतर ते 2000 मध्ये ब्रिटनमध्ये गेले. पण 2013 मध्ये लंडनमधील बर्कशायर येथील त्यांच्या घरात ते मृतावस्थेत आढळून आले होते. बेरेझोव्स्की यांचा मृतदेह गळ्यात पट्टी बांधलेल्या अवस्थेत बाथरूममध्ये आढळून आला होता.

स्टॅनिस्लाव मार्केलोव्ह आणि अनास्तासिया बाबुरोवा, 2009

स्टॅनिस्लाव मार्केलोव्ह आणि अनास्तासिया बाबुरोवा हे देखील पुतीन यांचे प्रखर टीकाकार होते. स्टॅनिस्लाव मार्केलोव्ह हे मानवाधिकार वकील होते. त्यांनी पॉलितकोव्स्काया आणि इतर पत्रकारांचे प्रतिनिधित्व केले. 2009 मध्ये क्रेमलिनजवळ एका मुखवटाधारी व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्याचवेळी अनास्तासियाने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावरही गोळीबार करण्यात आला. यात दोघांचाही मृत्यू झाला.

सेर्गेई मॅग्निटस्की, 2009

नोव्हेंबर 2009 मध्ये सर्गेई मॅग्निटस्की या रशियातील प्रसिद्ध वकिलांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. करचुकवेगिरीचे प्रकार करणाऱ्यांविरोधात ते काम करत होते.
करचुकवेगिरीत पोलिसांचाही हात असल्याचा त्यांचा दावा होता. त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली. यादरम्यान त्यांना खूप मारहाण करण्यात आली. त्यांना वाईट वागणूक दिली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.

नताल्या एस्तेमिरोवा – 2009

नताल्या एस्तेमिरोवा यांचीही 2009 मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. एस्तेमिरोवा यांनी चेचन्यातील अपहरण आणि हत्यांवर रिपोर्टिंग केले होते. चेचन्यामध्ये रशिनय सैन्याने काही कथित इस्माली दहशतवाद्यांवर कारवाई केली होती. यात या दहशतवाद्यांना क्रुर पद्धतीने मारण्यात आले होते.

एस्तेमिरोवा यांचे एक दिवस घरातून अपहरण करण्यात आले आणि डोक्यात पॉइंट-ब्लँक गोळ्या घालण्यात आल्या. यानंतर त्यांना मृतदेह जवळच्या जंगलात फेकून देण्यात आला होता. त्यांच्या हत्येबद्दल कोणालाही दोषी ठरविण्यात आले नाही.

अन्ना पॉलितकोव्स्काया, 2006

अण्णा पोलितकोव्स्काया या रशियातील पत्रकार होत्या. नोवाया गॅझेटासाठी काम करताना त्यांनी पुतिन यांच्यावर अनेकदा त्यांनी टीकात्मक लेख लिहिले होते. त्यांच्या ‘पुतिनचा रशिया’ या पुस्तकात त्यांनी पुतिन यांच्यावर रशियाला पोलीसांचे राज्य बनवल्याचा आरोप केला होता. 2006 मध्ये त्यांच्याच इमारतीच्या लिफ्टमध्ये त्यांना गोळ्या घालून मारण्यात आले होते.

अलेक्झांडर लिटविनेन्को, 2006

अलेक्झांडर लिटविनेन्को हे केजीबीचे माजी एजंट होते. पण 2006 मध्ये लंडनच्या एका हॉटेलमध्ये ते मृतावस्थेत आढळून आले होते. एक कप चहा पिल्यानंतर तीन आठवड्यांनंतर त्यांचा मृत्यू झाला होता. तपासामध्ये त्यांच्या या चहात पोलोनियम-210 हे विष आढळून आले होते. एफएसबी एजंट आंद्रेई लुगोवोई आणि दिमित्री कोव्हटुन यांनी पुतीन यांच्या आदेशानंतरच ही हत्या केली असे बोलले गेले होते.

सेर्गेई युशेन्कोव्ह, 2003

सर्गेई युशेन्कोव्ह हे रशियन राजकारणी होते. रशियातील राजकीय नेता म्हणून उदारमतवादी चळवळीत सामील होते. मात्र मॉस्कोमध्ये त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. 1999 मधील अपार्टमेंट बॉम्बस्फोटामागे पुतिन सरकारचा हात असल्याचा त्यांचा विश्वास होता. यासाठी युशेन्कोव्ह पुरावे गोळा करत होते.

युरी शेकोचिखिन, 2003

युरी शेकोचिखिन यांनी 1999 मध्ये नोव्हाया गॅझेटासाठी अपार्टमेंट बॉम्बस्फोटांचे रिपोर्टिंग केले होते. मात्र 2003 मध्ये अमेरिकेला जाण्याच्या काही दिवस आधी त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्यांना एक गूढ आजार झाल्याचे सांगण्यात आले होते.

follow us