Mojtaba Khamenei : अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्या अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर इराणची सत्ता मोजतबा खामेनी यांच्याकडे जाणार आहे. मोजतबा खामेनी यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड करण्यात आली आहे. असेंबली ऑफ एक्सपर्टने याबाबत मोठी घोषणा केली आहे.
इराण इंटरनॅशनल आणि इतर माध्यमांमधील वृत्तांनुसार, 88 वरिष्ठ धर्मगुरूंच्या या सभेने इराणची सूत्रे 56 वर्षीय मोजतबा खामेनी यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मोजतबा यांची निवडणूक इराणच्या शक्तिशाली इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या दबावाखाली झाली. युद्ध आणि संकटाच्या या काळात सैन्य आणि IRGC मोजतबा यांना सत्तेसाठी सर्वात योग्य आणि सुरक्षित पर्याय मानत आहे. मोजतबा खामेनी यांची सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली असली तरी याबाबत इराणी प्रशासनाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
मोजतबा खमेनी कोण आहेत?
मोजतबा हा अयातुल्ला खमेनी यांचा दुसरा मोठा मुलगा आहे. त्यांनी कधीही कोणतेही औपचारिक सरकारी पद भूषवले नाही, परंतु त्यांना त्यांच्या वडिलांच्या कार्यालयाचे द्वारपाल आणि एक अत्यंत प्रभावशाली रणनीतीकार मानले जाते. त्यांनी 1980 च्या दशकात इराण-इराक युद्धात भाग घेतला. सध्या त्यांचे आयआरजीसीच्या वरिष्ठ कमांडर आणि कट्टरपंथी गटांशी जवळचे संबंध आहेत. 2019 मध्ये अमेरिकेने मोजतबा यांच्यावर कठोर निर्बंध लादले. अमेरिकेने असा युक्तिवाद केला की कोणतेही अधिकृत पद नसतानाही ते सर्वोच्च नेत्याच्या वतीने महत्त्वाचे निर्णय घेतात.
इराण सध्या अभूतपूर्व लष्करी आणि राजकीय संकटाचा सामना करत आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान मोजतबा यांचे सत्तेत येणे हे सूचित करते की इराण त्यांच्या धोरणांमध्ये संयम आणणार नाही तर त्याऐवजी ते आणखी कट्टरपंथी बनू शकतात.
तर दुसरीकडे अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने अरब देशांवर जोरादार ड्रोन हल्ले करत अमेरिकेला इशारा दिला आहे. इराणने आतापर्यंत इस्त्रायलसह, सौदी अरेबिया, यूएई, कुवैत सारख्या देशांवर हल्ले केले आहे.
