More than 7 thousand jobs have been lost : लंडनस्थित जागतिक बँकिंग क्षेत्रातील दिग्गज स्टॅंडर्ड चार्टर्डने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशनच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. बँक पुढील चार वर्षांत, म्हणजेच 2030 पर्यंत, जगभरातील 7 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कमी करण्याच्या तयारीत आहे. ही कपात प्रामुख्याने कार्पोरेट आणि बँक ऑफिस विभागांमध्ये केली जाणार असून एआय आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने कामकाज अधिक वेगवान, अचूक आणि कमी खार्चिक करण्यावर भर दिला जाणार आहे.
रॉयटर्सच्या अहवालानुसार, बँकेचे उद्दीष्ट 2030 पर्यंत आपल्या कॉर्पोरेट विभागांतील सुमारे 15 टक्के पदे कमी करण्याचे आहे. या निर्णयाचा परिणाम त्या विभागांमध्ये कार्यरत असलेल्या 52 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो. सध्या बँकेत जागतिक स्तरावर जवळपास 82 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिल विंटर्स यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय केवळ खर्च कपातीसाठी नसून बँकिंग क्षेत्रात वेगाने होत असलेल्या तांत्रिक बदलांचा भाग आहे. एआय आणि ऑटोमेशनमुळे भविष्यातील बँकिंग व्यवस्था पूर्णपणे बदलणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात’, संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर मुश्रीफांचा आक्षेप…
तसेच, जे कर्मचारी नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेऊन स्वतःला रिस्कील करू इच्छितात, त्यांना नव्या पदांमध्ये संधी दिली जाईल, असे देखील त्यांनी सांगितले. काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन इतर विभागांमध्ये स्थानांतरित करण्याची देखील तयारी बँकेने दर्शवली आहे. बँकेच्या माहितीनुसार, चेन्नई, बेंगळुरू, क्वालालंपूर आणि वॉर्सा येथील बँक-ऑफिस केंद्रांवर या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम होण्याची शकयता आहे. एआय आधारित प्रणालीच्या मदतीने अनेक पारंपरिक प्रक्रिया स्वयंचलित केल्या जाणार आहेत. बिल विंटर्स यांनी याला कमी मूल्याच्या मानवी श्रमाच्या जागी तंत्रज्ञान आणि गुंतवणूक आधारित भांडवलाचा वापर असे वर्णन केले.
या मोठ्या तांत्रिक बदलासोबतच बँकेने आपल्या दीर्घकालीन नफ्याच्या अंदाजात देखील वाढ केली आहे. 2028 पर्यंत टॅंजिबल इक्विटीवरील परतावा 15 टक्क्यांपेक्षा अधिक आणि 2030 पर्यंत जवळपास 18 टक्क्यांपर्यंत पोहोचले, असा बँकेचा अंदाज आहे. याशिवाय, वेल्थ मॅनेजमेंट आणि उच्च नफा देणाऱ्या रिटेल बँकिंग व्यवसायांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
दरम्यान, हा बदल केवळ एका बँकेपुरता मर्यादित नसून संपूर्ण जागतिक बँकिंग क्षेत्रात एआय आधारित तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असल्याचे दिसत आहे. जपानमधील प्रमुख वित्तीय संस्था मिझुहो फायनान्शियल ग्रुपने देखील ऑटोमेशन आणि नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढील दशकात 5 हजार नोकऱ्या कमी करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. त्यामुळे जागतिक बँकिंग उद्योग आणि स्पर्धात्मक आणि नफेखोर बनण्यासाठी एआय आणि ऑटोमेशनकडे वेगाने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
