ना पाऊस ना ढगफुटी तरीही महापुरात वाहून गेल्या इमारती, नेपाळमध्ये नेमकं काय घडलं?

Nepal Floood नेपाळमध्ये बुधवारी सकाळी अचानक आलेल्या महापुराने मोठी हानी झाली आहे. मात्र, या पुरामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Nepal Flood

Nepal Flood

Nepal Floood No rain, no cloudburst, yet buildings were swept away in massive flood what happened in Nepal : नेपाळमध्ये बुधवारी सकाळी अचानक आलेल्या महापुराने मोठी हानी झाली आहे. तिबेटकडून आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने नेपाळमधील रसुवा आणि धाडिंग या दोन जिल्ह्यांना मोठा फटका बसला. या पुराच्या तडाख्यात वाहने, रस्ते, पूल आणि वीजेचे टॉवर वाहून गेले. या दुर्घटनेचा परिणाम काठमांडूजवळील नुवाकोट जिल्ह्यावरही झाला आहे.

नेपाळमधील महापुरामध्ये युपी-बिहारला अलर्ट! मुख्यमंत्री योगींचे प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश

तिबेटच्या दिशेने झालेल्या मुसळधार पावसामुळे किंवा हिमस्खलनामुळे हा पूर आला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या पुरामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, रसुवा भागात मोठा पाऊस झाल्यामुळे हा पूर आलेला नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तिबेटमध्ये झालेला मुसळधार पाऊस, हिमस्खलन किंवा हिमनदीशी संबंधित एखादी घटना यामागे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ना मुसळधार पाऊस, ना ढगफुटी; मग पूर आला कसा?

नेपाळमध्ये मोठा पाऊस किंवा ढगफुटी झाल्याचे समोर आलेले नसताना अचानक एवढा मोठा पूर कसा आला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे निश्चित उत्तर अद्याप मिळालेले नाही. मात्र, तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार, तिबेटमध्ये हिमस्खलन किंवा हिमनदीशी संबंधित घटना घडल्यामुळे भोटेकोशी नदीत अचानक पाण्याचा मोठा प्रवाह आला असण्याची शक्यता आहे. काठमांडू विद्यापीठाचे प्राध्यापक आणि हवामान संशोधक रिजन भक्त कायस्थ यांनी प्राथमिक पाहणीतून एका हिमस्खलनामुळे ल्हेंडे नदीचा प्रवाह अडला असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे.

ओबीसी क्रिमी लेअरचा पेच; UPSCच्या 958 उमेदवारांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह

हा अडथळा अचानक तुटल्याने भोटेकोशी नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी आले असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्याच काळात तिबेटच्या परिसरात भूकंपही झाल्याची माहिती आहे. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, सकाळी 8.37 वाजता तिबेटमध्ये 4.4 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. हा भाग गोसाईंकुंडपासून सुमारे 47 किलोमीटर उत्तरेला असल्याचे सांगण्यात आले. हिमनदीतील एखादे सरोवर फुटले होते का, हे निश्चित होण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. याच परिसरात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. 8 जुलै 2025 रोजी भोटेकोशी नदीत आलेल्या अचानक पुरामागे ल्हेंडे नदीतील हिमनदीचे सरोवर फुटल्याचे कारण सांगण्यात आले होते.

‘हा नेहमीचा पूर नव्हता’

तज्ज्ञांनी मुसळधार पावसाला या पुराचे प्रमुख कारण मानण्यास नकार दिला आहे. नदीच्या वरच्या भागात अचानक निर्माण झालेला अडथळा तुटल्याने मोठ्या वेगाने पाणी खाली आले असावे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा सामान्य स्वरूपाचा पूर नसून, अचानक मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह वाढल्याचे संकेत मिळत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. नेपाळच्या जलविज्ञान आणि हवामान विभागानेही नेपाळ किंवा तिबेटच्या परिसरात एखादे हिमनदीचे सरोवर फुटले असण्याची शक्यता नाकारलेली नाही.

भारतालाही पुराचा धोका?

या घटनेमुळे भारतातही विशेषतः बिहारमध्ये चिंता वाढली आहे. तिबेटमध्ये भोटेकोशी नदीला ल्हेंडे नदी म्हणून ओळखले जाते. पुढे ही नदी त्रिशूली नदीला मिळते. त्यानंतर विविध उपनद्यांच्या माध्यमातून तिचा प्रवाह गंडक नदीशी जोडला जातो. गंडक नदी पुढे बिहारमध्ये प्रवेश करते. त्यामुळे बिहार प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नद्यांच्या पाणीपातळीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पाण्याची पातळी वाढल्यास नागरिकांना वेळेत माहिती देणे आणि गरज भासल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

बिहारमधील परिस्थितीवरही लक्ष

बिहारमध्ये सध्या गंगा, गंडक, कोसी, बूढी गंडक आणि घाघरा यांसारख्या अनेक नद्यांच्या पाणीपातळीवर लक्ष ठेवले जात आहे. अशा परिस्थितीत नेपाळमधून अतिरिक्त पाणी आल्यास बिहारमधील काही भागांची चिंता वाढू शकते. विशेषतः उत्तर बिहारमधील नेपाळ सीमेलगतच्या जिल्ह्यांवर प्रशासनाची नजर आहे. कारण नेपाळमधून येणाऱ्या अनेक नद्या थेट या भागात प्रवेश करतात. सध्या नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसली तरी पुढील 24 ते 48 तास महत्त्वाचे मानले जात आहेत. नेपाळमधून येणाऱ्या पाण्यामुळे गंडक किंवा इतर नद्यांची पातळी वाढल्यास बिहारच्या सीमावर्ती भागात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो.

Exit mobile version