अतिवृष्टीची शक्यता! धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन…

अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आलंय.

Heavy Rain

Ahilyanagar News : भारतीय हवामान विभागाने आज दि. २२ जुलै २०२६ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी यांनी केले आहे.

लोकसभा अध्यक्षांची मोठी कारवाई; तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचं पूर्ण अधिवेशनासाठी निलंबन

आज दुपारी १ वाजता भिमा नदीत दौंड पुलावरून १० हजार ९३८ क्युसेक, घोड नदीत घोड धरणातून ४ हजार क्युसेक, तर गोदावरी नदीत नांदूर मध्यमेश्वर धरणातून ४ हजार ७६९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाल्यास भिमा, घोड आणि गोदावरी नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊ शकते. तसेच जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून धरणांमध्ये पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे गोदावरी, भिमा, घोड, प्रवरा आणि मुळा नदीकाठच्या नागरिकांनी तसेच धरण परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी.

मेघगर्जना, वीज चमकणे अथवा वादळी वारे सुरू असताना झाडाखाली, मोकळ्या मैदानात, टॉवर, ध्वजस्तंभ, विजेचे खांब, धातूचे कुंपण किंवा रोहित्राजवळ थांबू नये. लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या किंवा केबलपासून सुरक्षित अंतर ठेवावे. अशा वेळी कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. मोकळ्या जागेत अडकल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हातांनी कान झाकावेत व डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवावे.

ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, दुचाकी तसेच इतर विद्युत सुवाहक वस्तूंपासून दूर राहावे. जाहिरात फलक कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने त्यांच्या आजूबाजूला थांबू नये. धरण परिसरात अथवा नदीपात्रात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी पाण्यात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी अथवा छायाचित्र घेऊ नये. नदी, ओढे व नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. पुलांवरून पाणी वाहत असल्यास ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.

Akshaya Naik : समृद्ध संपन्न पहिली वहिली वारी; अभिनेत्री अक्षया नाईकची इच्छापूर्ती

अतिवृष्टीमुळे भूस्खलन व दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. या काळात घाट रस्त्यांवरील प्रवास शक्यतो टाळावा. जुन्या, मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये. वादळी वारे, वीज आणि पावसापासून स्वतःचे तसेच जनावरांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून सुरक्षित स्थळी जावे.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाणे किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथील जिल्हा नियंत्रण कक्षाच्या ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४० या दूरध्वनी क्रमांकांवर किंवा ११२ आणि १०७७ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा.

follow us